आयपीएल नामक क्रिकेट सर्कशीचे ‘गॉडफादर’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ललित मोदी यांच्या क्रिकेटमधील प्रशासकीय कारकिर्दीचा बुधवारी शेवट झाला. बीसीसीआयने आजीवन बंदी घालून त्यांची ‘हिट विकेट’ काढली. मारिओ पुझो यांच्या ‘गॉडफादर’मध्ये, प्रत्येक यशामागे एक गुन्हा असतो, अशा अर्थाचे एक वाक्य आहे. ललित मोदी यांनी भारतीय क्रिकेटला जे आर्थिक यश मिळवून दिले, त्यामागील गुन्हे उजेडात आल्यानंतर हे होणारच होते. त्यासाठी बीसीसीआयला एवढा वेळ का लागला, हा खरे तर प्रश्न आहे. आयपीएलमधील ‘स्पॉट फिक्सिंग’ प्रकरण हे ललित मोदी यांच्यानंतरचे. तेव्हा फिक्सिंगमध्ये अडकलेल्या क्रिकेटपटूंवरील कारवाईपूर्वी मोदी यांच्यावर कारवाई होणे अपेक्षित होते. परंतु उशिरा का होईना, कारवाई झाली. हे अधिक महत्त्वाचे. या कारवायांमुळे भारतीय क्रिकेटमध्ये शिरलेल्या गुन्हेगारी आणि भ्रष्ट प्रवृत्तींच्या साफसफाईची मोहीम सुरू झाली आहे, असे कोणासही वाटण्याची शक्यता आहे. मात्र भारतीय क्रिकेटमधील राजकारणाचा इतिहास पाहता, असे वाटणे हा भ्रम ठरू शकतो. मोदी यांच्याआधी आपल्या क्रिकेटविश्वाने दालमिया पर्व पाहिलेले आहे. ‘डॉलरमियाँ’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जगमोहन दालमिया यांनीच खरे तर भारतीय क्रिकेटमध्ये पैशांची गंगा आणली. पुढे तेही अनेक आर्थिक प्रकरणांमध्ये अडकले. दालमिया बीसीसीआयचे अध्यक्ष असताना मोदी यांनी आयपीएल ट्वेंटी-२०चा प्रस्ताव आणला होता. तो दालमियांनी फेटाळला. परंतु त्यांना हटवून बीसीसीआयचे अध्यक्ष बनलेल्या शरद पवारांनी तो मान्य केला. त्यातून क्रिकेटचे एक खेळ म्हणून किती भले झाले हा वादाचा मुद्दा. क्रिकेटच्या कारभाऱ्यांचे उखळ मात्र त्याने पांढरे झाले. आयपीएलसाठी नेमण्यात आलेल्या प्रशासकीय समितीचा कारभार मोदींच्या हाती होता. त्यांनी आयपीएलच्या माध्यमातून बीसीसीआयला सातपटीने श्रीमंत केले. तेव्हा मोदी म्हणजे क्रिकेटला पडलेले एक सुंदर स्वप्न अशा पद्धतीनेच त्यांच्याकडे पाहण्यात येत होते. २०१०मध्ये तो फुगा फुटला. कोची संघाच्या समभागधारकांची नावे ट्विटरवरून जाहीर केल्यानंतर मोदी आणि शशी थरूर यांच्यात वाद झाला. त्याने सर्वाचेच मनोरंजन झाले. त्यातून थरूर यांना केंद्रीय मंत्रिपद गमवावे लागले. पण मोदीही अडचणीत आले. गोपनीयतेचा भंग केल्याप्रकरणी बीसीसीआयने त्यांच्यावर ठपका ठेवला. त्यानंतर बीसीसीआयने येनकेनप्रकारेण त्यांची प्रशासकीय कारकीर्द संपुष्टात आणण्याचा विडाच उचलला. एकीकडे सरकारी यंत्रणा पिच्छा पुरवत होत्या, तर दुसरीकडे बीसीसीआयने अनेक घोटाळ्यांमधील मोदी यांचा सहभाग उघड केला. यामागील राजकारणाचे धागेदोरे अद्याप पुरेसे स्पष्ट झालेले नाहीत. बंदीच्या निर्णयानंतर ‘मी त्यांना (म्हणजे बीसीसीआयला) सोडणार नाही. या प्रकरणाचा शेवटही मीच करणार आहे,’ अशी धमकी मोदी यांनी दिली आहे. त्यांनी तसे जरूर करावे. त्यामुळे क्रिकेटमध्ये कोणते खेळ चालतात, हे तरी लोकांना समजेल. क्रिकेट संघटनांच्या निवडणुकांत राजकारण्यांना एवढा रस का असतो, याचे ज्ञानही लोकांना होईल. किमान यापुढे तरी क्रिकेट हा सभ्य गृहस्थांचाच खेळ राहावा, असे वाटणाऱ्या कोटय़वधी रसिकांसाठी हे आवश्यक आहे.