X

शब्दभाषा आणि चित्रभाषा

दैनंदिन जीवनात जरी शब्दभाषा आणि चित्रभाषा या एकत्रित गुंफल्या गेल्या तरीही चित्रभाषेचं, दृश्यभाषेचं एक स्वतंत्र अस्तित्व आहे.

दैनंदिन जीवनात जरी शब्दभाषा आणि चित्रभाषा या एकत्रित गुंफल्या गेल्या तरीही चित्रभाषेचं, दृश्यभाषेचं

एक स्वतंत्र अस्तित्व आहे. चित्रभाषेचा स्वभाव हा बोली-लिखित भाषेच्या स्वभावाहून खूप वेगळा आहे.

बोली-लिखित भाषा ही संक्षिप्त कमी वेळात, जलदगतीने ‘सांगते’ तर चित्रभाषा शास्त्रीय संगीतातील विलंबित लयीप्रमाणे हळू, संथपणे गोष्टी दाखविते..

आज आपण सुरुवातीलाच एक प्रयोग करू. सूचना वाचा आणि डोळे मिटा. सूचना- डोळे मिटून अ‍ॅपल आणि प्लेट किंवा सफरचंद आणि प्लेट या प्रतिमा दाखविण्याची आपल्या मेंदूला आज्ञा द्या. पाहा तो कोणती प्रतिमा दाखवितो? डोळे मिटून, डोळ्यांसमोर स्पष्ट प्रतिमा दिसली की डोळे हळू उघडा.. तुम्हाला लाल सफरचंद दिसलं का? त्याला देठ होता का? देठाला पानही होतं का? सफरचंदाच्या सालीवर चमकणारा प्रकाशाचा गोल बिंदूही दिसला का? सफरचंद पांढऱ्या, पोर्सेलिनच्या गोल आकाराच्या कडा असलेल्या प्लेटमध्ये ठेवलं होतं का? जर का आपल्याला वर उल्लेखिल्याप्रमाणे प्रतिमा दिसली असेल तर समजा की, आपण बोली, लिखित भाषेने प्रभावित झालेलं, बद्ध झालेलं दृश्यं, प्रतिमा पाहिली. अगदी अक्षरओळख तक्त्यातील चित्रांप्रमाणे आता आपण डोळे बंद केल्यावर दिसलेल्या प्रतिमेचं थोडंसं विश्लेषण करू या. ही प्रतिमा भाषेने प्रभावित झालेली आहे म्हणजे काय ते समजण्याचा प्रयत्न करू.

आपण रोजच्या जीवनात सफरचंद अर्ध कापलेलं, सफरचंदाच्या फोडी, हिरवी साल असलेलं सफरचंद, कापून ठेवल्याने, उघडं राहिल्याने तांबूस झालेलं अशा अनेक अवस्थांमध्ये पाहिलेले असतं. काही वेळा सफरचंदाच्या सालीवर रेषा, बिंदूंची एक जाळीही पाहिलेली असते. इतकंच काय पोर्सेलिन, स्टील, मेलामाइन, लाकूड, पितळ, अ‍ॅल्युमिनिअम अशा कित्येक माध्यमांत बनलेली, गोल,चौकोन, लंबगोल अशा कित्येक आकारांतील प्लेट आपण पाहिलेली असते आणि वापरतही असतो, पण ‘प्लेट’ असा इंग्रजी शब्द वापरला की, पांढरीशुभ्र, कोणतंही डिझाइन नसलेली सिरॅमिकची प्लेटच डोळ्यांसमोर येते.

भाषेची गंमतही आहे की, इंग्रजी प्लेट या शब्दाऐवजी ताटली किंवा बशी म्हटलं की, मेंदू ज्या प्रतिमा दाखवील त्या तत्काळ बदलतील. अगदी प्राचीन काळापासून माणसाच्या दोन भाषा एकमेकांशी जोडल्या गेल्या आहेत. एक चित्र-शिल्प आदी प्रतिमांची दृश्यभाषा व दुसरी बोली-लिखित भाषा. दृश्य प्रतिमांद्वारे माणूस जगाला पाहतो आणि समजून घेतो. जे पाहिलं त्याचा अर्थ शब्दामध्ये, बोली-लिखित भाषेत स्पष्ट करतो, ठरवितो, समजतो.

या दोन्ही भाषा सयामी जुळ्यांप्रमाणे एकमेकांत गुंफल्या गेल्या आहेत. या गुंफणीतून जगाचा स्पष्ट, स्थिर अर्थ- रूप आपण तयार करीत असतो.

अर्थातच लहानपणापासून बोली-लिखित भाषा शिकण्यावरती भर असल्याने, भाषा शिकण्याकरिता चित्रांचे तक्ते आपण वापरतो. म्हणूनच अ‍ॅपल व प्लेट प्रयोगामध्ये या अक्षर-चित्रं तक्त्यामधलं समोरून पाहिलेलं सफरचंद आपला मेंदू आपल्याला दाखवितो. कारण रोजच्या जीवनात पाहिलेली असंख्य अवस्थांतील सफरचंदांची रूपं या तक्त्यामध्ये नसतात. अशा रीतीने शिकल्याने आपण बोली-लिखित भाषेतील अर्थाप्रमाणेच जगाच्या रूप-रंग-ध्वनी रूपांकडे पाहतो. बोली-लिखित भाषा आपल्या सर्व संवेदनांचा ताबा घेते. त्यांच्यावर वर्चस्व मिळविते. गंमत करा, गुगलही भाषाप्रधान शोध घेणारं सर्च इंजिन आहे. गुगल इमेजेसमध्ये जा आणि apple and plate टाइप करा आणि पाहा कितव्या प्रतिमेत हिरव्या सालीचं, कापलेलं प्लेटमध्ये न ठेवलेलं सफरचंद ते दाखवतं?

ही एवढी सगळी चर्चा करायचं कारण हे की, चित्रकाराची चित्रभाषा विकसित होताना बोली-लिखित भाषा आणि प्रतिमांची भाषा यांची गुंफण तो थोडी सैल करतो. चित्राचा, दृश्याचा भाषाप्रधान विचार करीत नाही. प्रतिमेचा स्वतंत्र विचार करतो. कारण त्याचं चित्र हे भाषा शिकताना वापरायचा तक्ता नसतो. त्याला जे चित्रात दर्शवायचं आहे ते दिसण्यातून, दृश्य अनुभवातून निर्माण करायचं असतं. लहान मुलं जसं बऱ्याच वेळेला प्रतिमांच्या खाली त्यांचं बोली-लिखित भाषेतील नाव लिहितात तसं तो लिहू शकत नाही. व ही गोष्ट अत्यंत महत्त्वाची आहे, कायम लक्षात ठेवायला हवी की, चित्रं हे तक्त्याप्रमाणे पाहायची गोष्ट नाही. त्यामध्ये काय रंगवलंय हे ओळखता आलं की चित्रं समजलं असं होत नाही. चित्राची भाषा ही प्रतिमांची भाषा आहे. प्रतिमांचा दृश्यानुभव घेणं त्यात महत्त्वाचं असतं. आपण ही गोष्ट जरा तपशिलात पाहू या..

समजा, चित्रकाराला सफरचंदाचं चित्र काढायचं आहे. त्याचं फक्त ओळख रूप रंगवायचं आहे. तरीही त्याला हा विचार करावा लागतो की, ते कसं दिसावं. त्याचा आकार काय, कुठच्या कोनातून त्याला दर्शवावं, किती लाल किंवा कुठचा रंग असावा, ते चित्रात कुठे मांडावं मध्यभागी- थोडं वर, डावीकडे- उजवीकडे, ते अखंड असावं की कापलेलं, त्याच्या पाश्र्वभूमीला काय असावं, त्यावर प्रकाश कोणत्या बाजूने पडतोय असं दाखवावं, इत्यादी. आता या सर्व गोष्टींचा चित्रकार सराईतपणे, सहज विचार करतो; पण तुम्ही पाहाल की, या सर्व गोष्टी दिसण्याशी, त्यातून मिळणाऱ्या, देता येणाऱ्या अनुभवाशी संबंधित आहेत. आता फक्त सफरचंद या शब्दातून फळाचं नाव, ओळख कळते, दृश्याचे हे सर्व घटक स्पष्ट होत नाहीत. त्यांचा या अशा दृश्य गोष्टींचा विचार चित्रभाषा करते. अशा गोष्टींच्या विचारातूनच ती विकसित होते. तरी इथं चित्र फक्त फळाच्या ओळखीचं आहे; दृश्यरूपाचं आहे, त्याद्वारे एखादी भावना व्यक्त करायची नाहीये. नाही तर अजून काही दृश्य गोष्टींचा विचार करावा लागेल. तसंच चित्रकार कुठचे, कशा प्रकारचे रंग वापरतोय तीही गोष्ट चित्राचं दृश्यरूप ठरविते, त्यावर परिणाम करते.. थोडक्यात, हे लक्षात घ्यायला हवं की, दैनंदिन जीवनात जरी या दोन भाषा एकत्रित गुंफल्या गेल्या तरीही चित्रभाषेचं, दृश्यभाषेचं एक स्वतंत्र अस्तित्व आहे. चित्रभाषेचा स्वभाव हा बोली-लिखित भाषेच्या स्वभावाहून खूप वेगळा आहे. बोली-लिखित भाषा ही संक्षिप्त कमी वेळात, जलदगतीने ‘सांगते’ तर चित्रभाषा शास्त्रीय संगीतातील विलंबित लयीप्रमाणे हळू, संथपणे गोष्टी दाखविते. या दोन भाषांचं वेगळेपण ओळखण्यात गल्लत झाली की काय होतं त्याचं एक मजेशीर उदाहरण पाहू.

इटलीत चर्चमध्ये लावण्याकरिता कॅराव्हॅज्जिओ या चित्रकाराला चित्र रंगवायला सांगितलं. ही गोष्ट आहे सतराव्या शतकाच्या सुरुवातीची. कॅराव्हॅज्जिओच्या चित्रांत तो अतिशय तपशिलाने भरलेली, वास्तववादी चित्रं रंगवायचा. त्याला विषय दिला गेला- संत मॅथ्यूच्या जीवनातील प्रसंग. प्रसंग असा की, मॅथ्यूला देवदूत संदेश देत आहे व मॅथ्यू लिहीत आहे. कॅराव्हॅज्जिओने चित्रं रंगवलं. (ते दुसऱ्या महायुद्धात नाहीसं झालं. त्याचे कृष्णधवल फोटो आहेत.) त्यात संत मॅथ्यू एखाद्या साध्या शेतकरी, हमालाचं काम करणाऱ्या माणसाप्रमाणे देहयष्टी असलेला. सामान्य रूप असलेला. स्टुलावर हातात वही घेऊन बसलाय व त्याला एखाद्या लहान मुलाला शिकवतात त्याप्रमाणे बोट धरून अगदी जवळ उभं राहून देवदूत शिकवतोय. झालं, चर्चला हे मान्य झालं नाही. त्यांनी ते चित्र नाकारलं. कॅराव्हॅज्जिओला ते परत वेगळ्या पद्धतीने रंगवायला लावलं. कॅराव्हॅज्जिओने ते पुन्हा रंगविताना या ‘चुका’ केल्या नाहीत. त्याने देवदूताला आकाशात तरंगताना दर्शवलं व त्याच्या येण्याने मॅथ्यूचं लिखाणातलं लक्ष त्याकडे वेधलं गेलंय. देवदूत मॅथ्यूला सांगतोय, संदेश देतो व मॅथ्यू भरभर लिहितोय! आता या चित्राला चर्चने मान्यता दिली. कारण भाषिक विचारानुसार या चित्रातला देवदूत, संत हे प्रेरणादायी, दैवी, तेज:पुंज वाटत होते. त्याचं रूप भाषिक वर्णनानुसार योग्य होतं. याउलट पहिलं चित्र दृश्यानुभवातून विकसित झालं होतं. दोन्ही चित्रं चित्रभाषेची व बोली-लिखित भाषाविचाराचा, दृश्यचित्र भाषेवरील वर्चस्वाची मासलेवाईक उदाहरणं ठरतात.

*लेखक चित्रकला महाविद्यालयांचे अभ्यासक्रम सल्लागार आणि कलासमीक्षक आहेत.