चीन युद्धानंतर आजतागायत वाहून गेलेल्या ५१ वर्षांनी आपणास काहीच शिकवलेले नसून इतिहास आणि त्यातील व्यक्तींचे उदात्तीकरण वा उपरोधीकरण करणे एवढेच आपल्याला जमते हे हेंडरसन ब्रूक्स अहवाल फुटल्यानंतरच्या प्रतिक्रियांतून दिसून येते..
बुद्धीस बाजूला सारून केवळ भावनेच्या आधारे इतिहासाचा अर्थ लावू गेल्यास वर्तमानाचा गुंता होतो आणि तो भविष्यात अडचणीचा ठरतो. भारतात हेच होते. १९६२ च्या चीन युद्ध अहवालाच्या निमित्ताने जी काही माहिती प्रकाशात आली आहे तीवरील प्रतिक्रिया हेच दर्शवतात. भारताच्या स्वातंत्र्योत्तर इतिहासातील ठसठसती जखम म्हणजे १९६२ चे चीन युद्ध. त्या युद्धाने आपल्या राष्ट्रीय चारित्र्यावर भोंगळपणाचा पडलेला डाग आज पाच दशकांनंतरही जायला तयार नाही. या युद्धात भारताचे पानिपत झाले. पराजय हा कधीही वेदनाच देतो. परंतु या पराजयाने त्या अधिक दिल्या. कारण अंतिम निकालापेक्षा ज्या पद्धतीने आपणास त्या निकालाकडे जावे लागले, ते अधिक लाजिरवाणे होते. तेव्हा या पराभवांच्या कारणांचा शोध घेण्यासाठी युद्धानंतर लगेच तत्कालीन लष्करप्रमुख जनरल जे एन चौधरी यांनी लष्कराचे उपप्रमुख लेफ्टनंट जनरल हेंडरसन ब्रूक्स यांची समिती स्थापन केली होती. ब्रिगेडियर पी एस भगत हेदेखील या समितीचे सदस्य होते आणि भारताच्या पराभवामागील कारणांचा शोध घेऊन अहवाल तयार करणे हे या समितीचे उद्दिष्ट होते. पुढच्याच वर्षी म्हणजे १९६३ सालातील एप्रिल महिन्यात या समितीने आपला अहवाल संरक्षण मंत्रालयास सादर केला. आज ५१ वर्षांनंतरदेखील तो गुलदस्त्यात आहे. नेव्हिल मॅक्सवेल या पत्रकार लेखकाने भारत-चीन युद्धाचा इतिहास लिहिताना हा अहवाल मिळवला आणि बावळट गोपनीयता नियमाचा भंग करीत तो इंटरनेटच्या माध्यमातून प्रकाशित केला. त्यानंतर त्या अहवालावर अपेक्षेप्रमाणेच प्रतिक्रिया आल्या असून तो अहवाल ६३ सालीच प्रकाशित झाला असता तर जो गदारोळ उडाला असता तसाच धुरळा २०१४ साली उडताना दिसतो. या अहवालात भारताच्या तत्कालीन नेतृत्वावर आणि त्या नेतृत्वाच्या लष्करी समजेवर बोट ठेवण्यात आले आहे. म्हणजेच तत्कालीन पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू यांचे गोंधळलेले नेतृत्व त्या युद्धातील पराभवास कारणीभूत आहे असे हा अहवाल सुचवतो. तेव्हा भाजपने लगेच पं. नेहरू यांच्यावर टीकेची झोड उठवणे आणि काँग्रेसने ओशाळे होत त्या टीकेस उत्तर देण्याचा प्रयत्न करणे यास सुरुवात झाली आहे. वास्तविक १९६२ साली ज्या काही गफलती झाल्या त्याची ओळख करून घेण्यासाठी या अहवालाचीच गरज होती असे नाही. त्या काळात आपल्या कोणत्या नेतृत्वाच्या काय चुका झाल्या यावर अनेकांनी सविस्तरपणे लिहिले आहे. अनेक लष्करी अधिकाऱ्यांनीदेखील या युद्धाचे सखोल विश्लेषण केले असून त्यासंबंधी अनेक पुस्तके प्रसिद्ध आहेत. पं. नेहरू यांचे चीनकडे रम्य नजरेने पाहणे हे या पराभवाच्या मुळाशी होते आणि प्रशासन आणि लष्कर यांच्यातील संवादाचा अभाव हे आपल्या सज्जतेच्या अभावामागील कारण होते, हे जगजाहीर झाले आहे. तेव्हा ब्रूक्स यांच्या अहवालामुळे काही आकाश कोसळणार होते असे नाही. तरीही आपण हा अहवाल प्रकाशित करण्याचे धाडस दाखवले नाही. तेव्हा यावरून दिसते ते हेच की युद्धानंतर आजतागायत वाहून गेलेल्या ५१ वर्षांनी आपणास काहीच शिकवलेले नसून इतिहास आणि त्यातील व्यक्तींचे उदात्तीकरण वा उपरोधीकरण करणे एवढेच आपल्याला जमते हे दिसून येते. 

याचे कारण आपल्या कमकुवत समजुतीमध्ये आहे. आपले इतिहासाचे आकलन हे नायक वा खलनायक अशा दोन टोकांच्या भूमिकांतूनच होत असते आणि त्यातील एकाकडे नायकाची भूमिका दिली की त्याचे काही चुकूच शकणार नाही असा एक निर्बुद्ध समज आपण करून घेतो. पं. नेहरू हे स्वातंत्र्यलढय़ाचे आणि स्वतंत्र भारताचे नि:संशय नायक होते. परंतु नायकाच्या हातूनदेखील काही चुका होऊ शकतात हे समजून घेण्याचा सांस्कृतिक समंजसपणा आपल्या रक्तात नसल्याने तो शिकून घ्यावा लागतो. हा उमदेपणाचा अभाव सार्वत्रिक आहे. त्यामुळे पं. नेहरू ज्या पक्षाचे होते त्या काँग्रेसच्या नजरेतून नेहरूंचे काहीही चुकले नाही तर आणि काँग्रेसविरोधी असलेल्या भाजपच्या मते त्यांचे सर्व काही चुकलेच. वास्तविक अन्य कोणाही व्यक्तीप्रमाणे उत्तुंग व्यक्तिमत्त्वेदेखील हाडामासाची माणसेच असतात आणि ती सर्वसामान्यांइतकीच स्खलनशील असू शकतात. तेव्हा चूक-बरोबर, योग्य-अयोग्य वा नायक-खलनायक या काळ्यापांढऱ्या चौकटीतच या मंडळींना बसवणे हा त्यांच्यावर अन्याय आहे. तो आपण सातत्याने करीत आहोत. इतिहासाचे आकलन करताना केवळ कोण चूक वा कोण बरोबर इतकाच उद्देश नसतो. तर त्या चुकांतून शिकत, पुढे जात भविष्यात त्यांची पुनरावृत्ती कशी टाळता येईल हे समजून घेणे गरजेचे असते. परंतु इतिहासातील नायकांना मर्यादित चौकटीत ठाकूनठोकून बंदिस्त केल्याने आपल्या या महत्त्वाच्या शिक्षणाकडे दुर्लक्ष होते. परिणामी इतिहासातील चुका वर्तमानात आपण करीत राहतो. ही खास तिसऱ्या जगाची मानसिकता. जगाच्या बाजारात महासत्ता होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या भारताने ती आता सोडावयास हवी. दुसऱ्या महायुद्धातील विजयाचे शिल्पकार जनरल आयसेनहॉवर यांनी अमेरिकेच्या अध्यक्षपदी निवड झाल्यावर ब्रिटिश पंतप्रधान विन्स्टन चर्चिल यांच्या कच्छपि लागून इराणमध्ये क्रांती घडवली आणि इराणी पंतप्रधान महंमद मोसादेघ यांना सत्तात्याग करण्यास भाग पाडले. अमेरिकी गुप्तचर यंत्रणेचे कर्मिट रूझवेल्ट यांची या घडवून आणलेल्या उठावात महत्त्वाची भूमिका होती. मोसादेघ यांना पदच्युत करण्यात अमेरिकी गुप्तचरांना यश आले तरी रीतसर निवडून आलेल्या नेत्याविरोधात क्षुल्लक कारणांसाठी असा उठाव घडवून आणणे ही अमेरिकेची ऐतिहासिक घोडचूक होती. त्यानंतर जवळपास पन्नास वर्षांनी अमेरिकेच्या परराष्ट्रमंत्री मॅडेलीन अलब्राइट यांनी ती जाहीरपणे मान्य केली आणि त्याबद्दल इराणची माफी मागितली. त्या वेळी कोणाही अमेरिकी नागरिकाने जनरल आयसेनहॉवर यांच्यावर शिंतोडे उडवल्याची टीका अलब्राइटबाईंवर केली नाही. कारण चुका होऊ शकतात हे मान्य करण्याचा प्रामाणिकपणा त्या व्यवस्थेत आहे. आपल्याकडे नेमका त्याचाच अभाव आहे. त्यामुळे आपले राष्ट्रपुरुष, मग ते छत्रपती शिवाजी महाराज असोत वा महात्मा गांधी वा अन्य कोणी, यांच्या कार्याचे बुद्धिनिष्ठ मूल्यमापन करणे आपणास जमत नाही. एखाद्याने तसा प्रयत्न केला वा धारिष्टय़ दाखवलेच तर त्यावर संबंधित तुटूनच पडतात आणि अखेर अशा स्वतंत्र विचाराने माघार घेतल्यानंतरच शांत होतात. आपले हे वैचारिक अपंगत्व कधी दूर होणार हा या निमित्ताने सुबुद्धांना पडत असलेला गंभीर प्रश्न आहे.
त्याच्या उत्तराची सुरुवात या अहवालाच्या निमित्ताने करण्याची संधी आपणास आहे. जगातील सर्व प्रगत, व्यवस्थाभिमुख देशांत ठरावीक कालांतराने सर्व सरकारी दस्तावेज हा खुला होतो. इतिहासाभ्यासकांना त्यामुळे गतकाळातील घटनांचा अन्वयार्थ लावता येतो. आपल्याकडील व्यक्तिकेंद्रित व्यवस्थेत अशा सरकारी नोंदी खुल्या करण्याची प्रथा नाही. ती सुरू करावयास हवी. कारण अधिकृतपणे तपशील उपलब्धच जर करून दिला नाही तर इतिहासकालीन घटनांच्या दंतकथा होतात आणि आपापल्या सोयीनुसार नायक/ खलनायकांच्या भोवती त्या गुंफल्या जातात. त्यांची मगरमिठी मग सुटता सुटत नाही. त्यामुळे इतिहासातील वास्तवास आपल्याकडे मोकळा श्वास घेताच येत नाही. आपल्या समज-गैरसमजांच्या पिंजऱ्यातून इतिहास मोकळा व्हायला हवा.