गेले दोन दिवस राहुल गांधींच्या महाराष्ट्र दौऱ्यात त्यांची प्रवचने ऐकणाऱ्यांना काही प्रश्न सतावत राहणे शक्य आहे. देशाच्या राजकारणात साफसफाई करणे असा एककलमीच कार्यक्रम असल्याचे त्यांचे म्हणणे असताना औरंगाबादेतील त्यांच्या सभेत माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्याबरोबर ते व्यासपीठावर कसे काय बसले? याच चव्हाण यांना वाचवण्यासाठी राज्याच्या विधिमंडळात संमत करण्यात आलेल्या ‘आदर्श’ अहवालाबाबत याच राहुल गांधी यांनी स्पष्ट शब्दांत नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची जी केविलवाणी अवस्था झाली होती, तीही साऱ्या महाराष्ट्राने पाहिली होती. मग असे काय घडले, की ज्यामुळे राहुल गांधी यांचे मनपरिवर्तन झाले, हे कळण्यास मार्ग नाही. राजकारणात सारे काही चालते, अशी सारवासारव तरी ते करणार नाहीत, असे म्हणायचे, तर तसेही नाही. केंद्रातील सरकार ज्यांची प्रत्येक सूचना शिरोधार्य मानून तिचे आदेशात रूपांतर करण्यासाठी आकांत करते, त्या सरकारला वाकवून आपल्याला जे हवे, ते घडवण्यापासून राहुल यांना गेल्या दहा वर्षांत कोणीच अडवले नव्हते. आपला प्रत्येक शब्द कृतीत आणण्याचा विडा घेतलेले अनेक जण आसपास असतानाही त्यांना राजकारणातील सफाई शक्य झाली नाही. त्यांच्याच पक्षातील जे जे भ्रष्टाचारात अडकले, त्यांच्यावर थेट कारवाई करण्यास त्यांच्याच सरकारने कुचराई केली, तेव्हाही राहुल यांना काही बोलावेसे वाटले नाही. न्यायालयांनीच पुढाकार घेऊन अशा भ्रष्ट लोकांना तुरुंगात धाडले, तरीही हे गप्पच होते. मग एकदम अशोक चव्हाण यांच्या आदर्श घोटाळ्याच्या वेळीच त्यांनी अशी ओरड का बरे करावी? तेव्हा येणाऱ्या निवडणुकीत काय वाढून ठेवले आहे, याचे भान त्यांना नव्हते, की ते असूनही केवळ जनलज्जेखातर त्यांनी महाराष्ट्र सरकारला ‘आदर्श’ अहवालावर घूमजाव करण्यास भाग पाडले? असे अनेक प्रश्न सामान्यांना पडणे अगदीच स्वाभाविक आहे. निवडून येण्याची क्षमता एवढा एकच निकष लावायचे ठरवले, तर राहुल गांधी यांचे स्वच्छतेचे राजकारण बाराच्या भावात जाईल, हे राजकारणात नव्याने आलेला कार्यकर्ताही सांगू शकेल. केवळ कागद टराटरा फाडून आपले हेतू सिद्ध करता येत नाहीत, त्यासाठी कृती करावी लागते, हे सांगण्याएवढे धैर्य काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांमध्येही एकवटलेले नाही. औरंगाबाद येथील सभेतभाजपवर टीका करताना कर्नाटकातील भ्रष्टाचारावर टीका करणाऱ्या राहुल यांना व्यासपीठावरच बसलेले अशोक चव्हाण कसे बरे दिसले नाहीत, असाही प्रश्न तिथे उपस्थित असलेल्यांना पडला असेल. मुंबईत पत्रकारांशी बोलताना हेच राहुल गांधी म्हणतात, की पक्षात आपलेच सारे काही चालते, असे नाही. काही वेळा पक्षाला तडजोडही करावी लागते. अशी तडजोड करायचीच होती, तर मग यापूर्वी एवढी तडतड तरी कशाला करावी! मुंबईतल्या कोळी समाजाच्या प्रतिनिधींशी बोलताना, तुमचा एकही आमदार कसा नाही? असा प्रश्न विचारणाऱ्या राहुल यांना आपल्याच पक्षाने केलेला हा अन्याय उघडय़ावर आणण्यात काहीच गैर वाटले नाही.  महाराष्ट्र हा काँग्रेसचा गड आहे, असे नुसते म्हणायचे आणि येथील काँग्रेसजनांना सतत टोचायचे, अशा वृत्तीने हा गड कसा शाबूत राहणार, याची चिंता फक्त पृथ्वीराज चव्हाणांनीच करण्याऐवजी राहुल यांनीही केली असती, तर कदाचित काही वेगळे चित्र दिसलेही असते. महाराष्ट्रात राष्ट्रवादीचे घोंगडे गळ्यात घेऊन सत्ताकारण करताना येणाऱ्या अडचणी समजावून घेण्याची गरज दिल्लीतील नेत्यांना कधी वाटली नाही. पक्षाचे प्रभारी त्यामध्ये लक्ष घालण्यास सक्षम नाहीत आणि राष्ट्रवादीचा रेटा मात्र वाढतोच आहे, अशा या शर्यतीत आपलाच भिडू पहिला यावा, असे वाटण्याला तरी काय अर्थ?