लीला सॅम्सन यांनी ‘संगीत नाटक अकादमी’च्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. तो का दिला आणि केंद्र सरकारनेही तो का स्वीकारला, याचे तपशील दोघांनीही दिलेले नाहीत. एरवी राजीनामा देणारा किंवा घेणारा यांपैकी एकाला ‘वादग्रस्त’ ठरवण्याचा खेळ माध्यमे खेळतात, तो सॅम्सन यांनी खेळू दिलेला नाही. भरतनाटय़म नर्तिकेचा डौल त्यांच्या कृतींमधूनही दिसतो, तो असा. अर्थात, नृत्यगुरू रुक्मिणीदेवी यांच्या ‘कलाक्षेत्र’मध्ये शिकलेल्या, पुढे नृत्यदिग्दर्शनही करणाऱ्या सॅम्सन केवळ एक भरतनाटय़म नर्तिका एवढीच त्यांची ओळख नव्हे. अरुंडेल यांचे अभ्यासपूर्ण चरित्र त्यांनीच लिहिले, किंवा सेन्सॉर बोर्डाच्या (केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळ) विद्यमान अध्यक्ष म्हणून त्यांची कारकीर्द लक्षात राहण्याजोगी ठरते आहे, हे त्यांच्या कर्तृत्वाच्या आलेखाचे अन्य पैलू. पण डौल तोच.. भरतनाटय़मने दिलेला. शिस्तीचे पक्के भान असणारा, तरीही लालित्यपूर्ण. अनुभव आणि शिक्षण, दोहोंमधून सिद्ध झालेला.
‘कलाक्षेत्र’चे संचालकपद २००५ पासून सांभाळून २०१२ साली त्या पायउतार झाल्या, तेव्हाही हा डौल दिसला होताच. तेव्हा कोणताही वाद झाला नव्हता. अगदी गेल्या आठवडय़ात ‘इंडियन एक्स्प्रेस’च्या मुलाखतीत हा विषय निघाला तेव्हा त्या म्हणाल्या- ‘मला चाकोरीपेक्षा निराळा विचार करायला आवडते. ती माझी शैली अनेकांना (कलाक्षेत्रात) पसंत नव्हती. अखेर मीच बाजूला झाले’. ही मुलाखत देण्यापूर्वीच- सप्टेंबरअखेर ‘संगीत नाटक अकादमी’चा राजीनामा सॅम्सन यांनी दिलेला होता, पण या राजीनाम्याबद्दल त्यांनी अवाक्षर काढले नाही.
संगीत नाटक अकादमीचे अध्यक्षपद आणि सेन्सॉर बोर्डाचेही प्रमुखपद अशा दोन पदांवर असणाऱ्या सॅम्सन यांची ‘लायकी काय?’ हा प्रश्न (साक्षात मनुष्यबळ विकास मंत्र्यांचीही लायकी काढू शकणाऱ्या) आपल्या लोकशाही देशात कुणी विचारला नव्हता, याला कारणेही तशीच आहेत. सुमारे २५ वर्षांपूर्वीच (१९९०) पद्मश्री, पुढे २००० साली ‘संगीत नाटक अकादमी पुरस्कार’, या सन्मानांसह कलाविषयक चिंतन आणि मुख्य म्हणजे कलाविषयक व्यवस्थापन यांतही त्यांची चमक दिसली होती. याचा थेट परिणाम दिसू लागला तो, सेन्सॉर बोर्डावर त्यांनी केलेल्या कामातून. कमल हासनच्या ‘विश्वरूपम’वर मद्रास उच्च न्यायालयाने घातलेली बंदी चुकीची ठरते, अशी ठाम भूमिका त्यांनी घेतली होती..  ‘आयटम साँग’ना त्यांचा विरोधही असाच कमी शब्दांत, पण ठाम होता. मुंबईत सेन्सॉर बोर्डाचा एक अधिकारी लाचखोरीत पकडला गेला, तेव्हा तातडीने कारवाई करतानाच ‘ही परिस्थिती या मंडळातील काही अधिकाऱ्यांच्या नेमणुका रखडल्यामुळे उद्भवली आहे’ हेही त्यांनी सुनावले होते. कदाचित, यापुढे या मंडळावरूनही त्या दूर होतील, पण त्याही शांतपणे!