कैद्यांचे म्हणणे तुरुंगाधिकाऱ्यांच्या अटी न पाळताच प्रसारित केले, असा ठपका लेस्ली उद्विनवर भारत सरकारतर्फे  जाहीरपणे ठेवण्यात येत आहे. प्रत्यक्षात अद्याप तिच्यावर करारभंगाचा किंवा अन्य गुन्हा दाखल झालेला नाही आणि त्या अर्थी ती कोणाही अन्य लघुपटकाराइतकीच स्वतंत्र आणि सध्या निरपराध गणली जात आहे. तिने पत्रकार परिषदेतच स्वतविषयी सांगितलेला काही तपशील तिच्या प्रामाणिकपणाला दाद द्यावी असा होता. त्यामुळे तिची आजवरची कारकीर्द नेमकी कशी आहे, याविषयीचे कुतूहल वाढले आहे.
लंडनजवळील बर्मिगहॅममध्ये म्हणजे दक्षिण आशियाई वस्तीत जन्मलेल्या आणि वाढलेल्या लेस्लीला अभिनयाची आवड अगदी लहानपणापासून होती. वयाच्या तिसऱ्या वर्षी घरानजीकच चित्रपटाचे चित्रीकरण सुरू असता आपण कॅमेऱ्यांच्या दिशेने धावत जाऊन ‘मलापण काम करायचे’ असा हट्ट धरल्याची आठवण स्वत लेस्ली यांनी ब्रिटिश कौन्सिलमधील मुलाखतीत (२०११) सांगितली आहे. चित्रपटाच्या मानाने रंगभूमीची फार आवड नसूनही, सर शेक्सपियरच्या मॅकबेथमध्ये अलेक गिनेससह लेडी मॅकबेथची आव्हानदायी भूमिका, तसेच अन्य गाजलेल्या व्यावसायिक नाटकांत त्यांनी अभिनय केला. चित्रपटातील पहिली संधीदेखील अभिनयाचीच मिळाली. विशेष म्हणजे, तो चित्रपटही कैद्याबद्दलच होता. नायक राजकीय कैदी. नायिका त्याची पत्नी, तुर्कस्तानातली. ही भूमिका लेस्ली यांनी साकारली. मात्र ‘केवळ अभिनयासाठी या क्षेत्रात राहायचे ही आपल्या क्षमतांची नासाडीच ठरेल’ असे वाटल्याने लेस्ली चित्रपट-निर्मितीकडे वळल्या. सुरुवात एका लघुपटासाठी कॅमेरा-सल्लागार म्हणून झाली. ‘माझ्यावरदेखील लहानपणी अत्याचार झाला होता’ असे भारतीय पत्रकारांना हल्लीच लेस्ली यांनी ज्याबद्दल म्हणाल्या, त्या घरमालकाबद्दलचा आणि पर्यायाने लेस्ली यांच्याच कहाणीवर आधारित हा लघुपट होता : ‘सिटिंग टार्गेट्स’ चित्रपटनिर्माती म्हणून खरोखरचे मोठे पाऊल लेस्ली यांनी उचलले, ते ‘ईस्ट इज ईस्ट’ या नाटकावर आधारित त्याच नावाचा चित्रपट काढून. भारतातही या चित्रपटाला दर्दीचा प्रतिसाद मिळाला होताच. ब्रिटनमध्ये तर तेथील चित्रपट व चित्रवाणी क्षेत्रातील सर्वात महत्त्वाचा अकादमी पुरस्कार ‘बाफ्टा अ‍ॅवॉर्ड’देखील या पहिल्याच चित्रपटाने मिळवला. पुढला चित्रपट ‘वेस्ट इज वेस्ट’ हा होता. याही चित्रपटाला प्रतिसाद मिळाला. विषयाच्या निवडीपासून हाताळणीपर्यंत लक्ष पुरवणाऱ्या लेस्ली यांच्या मते, चित्रपट हा दिग्दर्शकाइतकाच निर्मात्याचाही असतो. रिचर्ड अ‍ॅटनबरोंच्या ‘गांधी’ चित्रपटाचा आदर्श ठेवणाऱ्या लेस्ली, ‘चित्रपटाने काहीतरी म्हटले पाहिजे, सांगितले पाहिले’ अशाही मताच्या आहेत.