महत्त्वाकांक्षी मंगलयान अंतराळात झेपावण्यास आता काही तासांचाच अवधी आहे. ते मंगळाच्या कक्षेत सुरक्षित विसावले, की यंदाचा दीपोत्सव अधिकच प्रकाशमान भासेल यात शंका नाही.

कोणताही सण हा अखेर तमाच्या तळाशी दिवे लावण्याचाच उत्सव असतो. दिवाळी हा तर अधिकच. तो दिव्यांचा उत्सव आजपासून आपण साजरा करतो आहोत. हे खरे की बाहेर भ्रष्टाचार माजलेला आहे. गुन्हेगारी आहे. दहशतवाद, नक्षलवाद आहे. सामान्यांच्या सुरक्षेचे प्रत्यही तीनतेरा वाजत आहेत. धोरणलकवा, वैचारिक दारिद्रय़ तर आजचा जणू कालधर्म आहे आणि हे सगळे दुर्लक्षून आपल्या चार िभतींत गपगुमान जगू म्हणावे, तर साध्या जगण्याचीही भाववाढ झाली आहे. नकारात्मकतेचा शून्य नंबरचा चष्मा डोळ्यांवर चढवला, तर अशी अनंत कृष्णविवरे दिसू शकतील. ती आहेत आणि तरीही आपण जगत आहोत. कारण उमेद, जिद्द, हिम्मत, ताकद यांवर आपण जगत असतो. त्या उमेदीचे, जिद्दीचे ‘पुनर्भरण’ करणे हाच तर दीपोत्सवाचा हेतू. आज ‘पहिली अंघोळ’ आहे, याचा अर्थ यापूर्वी आपण अंघोळ केलेली नाही असा नाही. मनातली सारी जाळीजळमटे धुऊन टाकून नव्याने शुचिर्भूत बनायचे, असा याचा अर्थ. ते स्नान खरे मनाचेच असते आणि शुभ आणि मांगल्याच्या विचाराने करायचे असते. मग येणारा प्रत्येक क्षण नवाच आहे, अशा भावनेने धूमधडाक्यात आयुष्याला भिडायचे, हा दीपोत्सवाचा अर्थ आहे. हा दीपोत्सव केवळ लोकांचाच आहे असे नव्हे. देशाच्या आयुष्यातही असे उत्सव येत असतात. यंदाही आपला देश याच काळात एक वेगळाच दीपोत्सव साजरा करणार आहे. येथे हे पहिल्यांदा स्पष्ट केले पाहिजे की यंदाचे आणि पुढचे वर्ष निवडणुकांचे असले तरी हा उत्सव त्याचा नाही. निवडणुकांतून लागणारे दिवे जरा वेगळेच असतात. तेव्हा ते यंदाच्या दीपोत्सवाचे कारण नाही. याचे कारण आहे भारताची मंगळ मोहीम. दिवाळीत होणाऱ्या फटाक्यांच्या आतषबाजीत या वर्षी या मोहिमेतील खऱ्याखुऱ्या रॉकेटची भर पडणार आहे. या वर्षी एकंदरच अर्थव्यवस्थेची गती मंदावली आहे. धनलक्ष्मीची प्रकृती नाजूक झाली आहे. परंतु तरीही तिची पूजा टाळता येत नाही. तेव्हा सर्व देश उद्या लक्ष्मीपूजनाच्या तयारीत मग्न असेल. त्याच दिवशी सकाळी सहा वाजून आठ मिनिटांच्या ‘मुहूर्ता’वर बहुधा श्रीफल वगरे वाढवून भारतीय अवकाश संशोधन संस्थेतील (इस्रो) वैज्ञानिक आणि तंत्रज्ञ मंगळ मोहिमेची क्षणमोजणी सुरू करतील. भाऊबीजेच्या दिवशी दुपारी दोन वाजून ३८ मिनिटांनी श्रीहरिकोटा येथून ध्रुवीय उपग्रह प्रक्षेपक यान मंगळभेटीस उड्डाण करील. आणि भारताच्या अवकाश संशोधन इतिहासाला एक सुवर्णपान जोडले जाईल.
१९७५ मध्ये इस्रोने आर्यभट्ट हा उपग्रह अवकाशात सोडला. भारत या क्षेत्रात इतकी प्रगती करील हे तेव्हा कुणाच्या स्वप्नातही आले नसेल. मात्र यात काहीही आश्चर्य नाही. हे भारताबाबत नेहमीच घडलेले आहे. स्वातंत्र्यानंतर हा देश टिकेल की त्याची शकले उडतील? येथे लोकशाही रुजेल की त्याचे ‘बनाना रिपब्लिक’ होईल? अशा शंकाकुशंका मुखर करणाऱ्यांची तेव्हाही कमतरता नव्हती. आजही व्ही. एस. नायपॉल यांच्यासारखे शंकासुर आहेत आणि काळच त्यांना परस्पर उत्तर देतो आहे. स्वातंत्र्य मिळवून आपण एवढे काय दिवे लावले? गोरे साहेब गेले आणि काळे साहेब आले, अशी हेटाळणीखोर विधाने करणारे तर आजही आपल्या आजूबाजूला आहेत. अर्थात प्याला अर्धा भरलेला आहे असे म्हणायचे की अर्धा रिकामा, हा ज्याच्या-त्याच्या दृष्टिकोनाचा प्रश्न आहे. कुपोषणाचे, दारिद्रय़ाचे, भ्रष्टाचाराचे आकडे तोंडावर फेकून कोणीही भारताच्या प्रगतीपुढे प्रश्नचिन्ह निश्चितच लावू शकेल. परंतु मग सर्वच स्तरांतील बहुसंख्य लोकांचे जीवनमान उंचावले आहे, त्याकडे कोणत्या नजरेने पाहायचे हा सवाल उभा राहतो. त्याचे काय करायचे? भारताने अवकाश संशोधन क्षेत्रात केलेल्या प्रगतीबाबत मात्र असा कोणताही प्रश्न निर्माण करता येणार नाही. मंगळाच्या कक्षेत पाठविण्यात येणारे मंगलयान हे त्या प्रगतीचे अभिमानास्पद असे प्रतीक आहे.
अर्थात भारताच्या मंगळ मोहिमेकडेही हा खुळा नाद आहे, या दृष्टीने पाहणाऱ्यांची संख्या कमी नाही. यातील अनेकांचा मंगळाशी संबंध तर पत्रिकेपुरताच येत असतो. तेव्हा त्या अ-मंगळ ग्रहाचे संशोधन करण्यासाठी तब्बल ४५० कोटी रुपये खर्च का करायचे हा त्यांचा प्रश्न वाह्य़ात म्हणता येणार नाही. त्यांना फक्त एवढेच लक्षात आणून द्यावे लागेल, भारतातील २२ टक्के लोकसंख्या दारिद्रय़रेषेखाली जीवन जगत असताना मोबाइल दूरध्वनी, थ्री-जी, फोर-जी, झालेच तर रंगीत टीव्ही अशा ‘चैनी’च्या गोष्टींवर खर्च का करायचा असा प्रश्नही यावर कोणी उपस्थित करू शकतो! मुद्दा असा आहे, की जगाची लोकसंख्या वाढतच आहे आणि नसíगक साधनसंपत्ती नाहीशी होत चाललेली आहे. हे लक्षात घेता मानवप्राण्याचे पुढचे वसतिस्थान हे अन्य ग्रह असू शकणार आहे. त्या दृष्टीने संशोधकांची चाचपणीही सुरू आहे. इस्रोचे अध्यक्ष डॉ. के. राधाकृष्णन यांच्या मते तर येत्या २० ते ३० वर्षांतच मंगळावर मानवी वस्ती होण्याची शक्यता आहे. मार्स-वन नावाच्या एका डच संस्थेने तर मंगळावरील वस्तीसाठी नावनोंदणीही सुरू केली आहे आणि त्यात आठेक हजार भारतीयांचा समावेश आहे. परंतु एकदा पायाखालचेच तेवढे पाहण्याची सवय लागली की दूरची नजर धूसर होते. तेव्हा अशा टीकाकारांकडे दुर्लक्ष केलेले चांगले. मात्र डॉ. जी माधवन नायर यांच्यासारखे अवकाश संशोधकही याबाबत ‘अजुनि खुळा हा नाद’ हे िझझोटी रागातील नाटय़गीत आळवत आहेत. ते इस्रोचे माजी अध्यक्ष आहेत आणि या मोहिमेच्या तयारीत त्यांचाही सहभाग होता. अशी व्यक्ती या मोहिमेवर टीका करते तेव्हा तिची दखल घेणे आवश्यक ठरते. येथे एक बाब लक्षात घ्यायला पाहिजे, की डॉ. नायर मंगळ मोहीम अनावश्यक आहे, असे म्हणतच नाहीत. चंद्रानंतरचे तेच दुनियेचे लक्ष्य आहे. तेव्हा त्याचा अभ्यास झालाच पाहिजे, असेच त्यांचे मत आहे. त्यांचा विरोध आहे तो केवळ या मोहिमेच्या स्वरूपाला. ही मोहीम पुरेशा तयारीविना करण्यात आली आहे. इस्रोचे मंगलयान मंगळाची परिक्रमाही वर्तुळाकार कक्षेत करणार नसून अंडाकृती कक्षेत, मंगळापासून किमान ३६० आणि कमाल ८० हजार किलोमीटरचे अंतर राखत ही फेरी असेल. त्यामुळे त्यास मंगळाचे योग्य निरीक्षण करता येणार नाही, असा त्यांचा आक्षेप आहे. आक्षेप तांत्रिक असले, तरी इस्रोने ते फेटाळल्याचे अद्याप ऐकिवात नाही. तेव्हा, हा संशोधनाबरोबरच भारताच्या प्रतिष्ठेचाही प्रश्न बनलेला आहे हे इस्रोचे अध्यक्ष कितीही नाकारत असले, तरी उघड आहे. मंगळावर स्वारी करणाऱ्या सहा राष्ट्रांच्या पंक्तीत बसण्याची भारताची प्रबळ इच्छा आहे. मोहीम यशस्वी झाल्यास ती पुरी होणार आहे.
महत्त्वाकांक्षी मंगलयान अंतराळात झेपावण्यास आता काही तासांचाच अवधी आहे. ते व्यवस्थित झेपावले आणि मंगळाच्या कक्षेत सुरक्षित विसावले, की यंदाचा दीपोत्सव अधिकच प्रकाशमान भासेल यात शंका नाही. अखेर दर दिवाळीतच रॉकेटे उडत असतात. असे रॉकेट मात्र कधी तरीच उडते. भारतीयांचा आत्मविश्वास आणि अभिमान वृिद्धगत करणारी अशीच ही सर्व दिशा मंगळ करणारी घटना असेल. त्यासाठी आपल्याच आपणांस हार्दीक शुभेच्छा!