‘नारळ विक्रेत्याची टिचकी’ हा अग्रलेख (७ ऑगस्ट) म्हणजे मराठी साहित्यिक आणि शासन यांच्यातील साटेलोटे, खासगी संबंध, उपकृततेला लालचावलेली मानसिकता आणि दांभिक गुणग्राहकता यावर टाकलेला क्ष-किरणच आहे. अर्थात हाच क्ष-किरण अपवाद करता सर्वच राज्यांच्या सत्तांनी तिची परीक्षा करण्यास पुरेसा आहे.

आज राज्यात सत्तारूढ असलेले सरकार आणि या पूर्वीची सरकारे यांचा सार्वजनिक जीवनातला दर्जा साधारणपणे सारखाच खालावत जाणारा आहे. इथे प्रत्येक पक्षाची एकच नीती, एकच कार्यात्मक अग्रक्रम दिसतो आणि तो म्हणजे आपल्या वळचणीला असलेल्या, तत्त्व आणि नतिकता यांचे जोखड सहज फेकून देऊ शकणाऱ्या, सत्तेच्या चमचाभर प्रसादासाठी जीव पाखडणाऱ्या आणि कमअस्सल वकूब असणाऱ्या ‘पालखीच्या भोयां’चे जमेल तसे चांगभले करण्याचा! अशांच्या नेमणुका केल्या की हे उपकृत ‘बोलके पोपट’ त्या त्या राज्यकर्त्यांना हवे तसे आणि हवे तेच बोलू लागतात आणि करूही लागतात. अर्थात असे करताना ते नतिकतेचा, विद्वत्तेचा, पारदर्शीपणाचा डांगोरा पिटत राहतात. जो किळसवाणाच असतो.
ज्या पक्षाची सत्ता आज राज्यात आणि देशात आहे त्यांच्या नतिकतेचे आणि अंगभूत गुणांचे जे ललित-दर्शन रोज घडते आहे ते पाहून त्यांचे पारदर्शी नागवेपण आता चांगलेच स्पष्ट झाले आहे. दिल्ली ते गल्लीपावेतो विविध कळीच्या पदांवर ज्या नेमणुका होत आहेत आणि ज्या कमअस्सलांना सत्ताशेंदूर फासून प्रतिष्ठित केले जाते आहे ते पाहिले की, निवडकांनाच ‘चांगले दिवस’ येत राहणार हे आता उघड झाले आहे. त्यामुळेच ‘ज्ञानेश्वर विद्यापीठा’ची पदवी प्राप्त केलेल्या ज्ञानमहर्षीना आडवाटेला पडलेली भांडीकुंडीच दिसली आणि आवडली तर आश्चर्य वाटायला नको. अशा भांडय़ांच्या गर्दीत डॉ. बाळ फोंडके, डॉ. प्रदीप कर्णिक, प्रा. प्रकाश परब, डॉ. नीरज हातेकर, डॉ. हेमचंद्र प्रधान यांच्यासारखी अद्याप मोल टिकवून असलेली मोलाची भांडी सापडावीत याचे सखेद आश्चर्य वाटते. जे सरकार साहित्याच्या बाजाराची सूत्रे हाती घेऊ पाहणाऱ्या बाबाला अध्यक्षपदी विराजमान करते त्या सरकारच्या हेतूविषयी संशय घेणे आणि त्यावर टीका करणे हे संपादकांचा मूल्याग्रह व्यक्त करणारे तर आहेच पण ते अत्यावश्यक कर्तव्यही आहे. सरकार कोणतेही असो आणि त्याची कार्यप्रणाली, तात्त्विकप्रणाली कोणतीही असो काही लाभलोलुप सर्वत्र दिसतातच. असे काही योगभ्रष्ट खादीधारी तावडे यांना सहज गाठता आले, हा योगायोग नक्कीच नाही. त्यांना आता शरणार्थी डावे होऊन प्रामाणिक उजवे होण्याची महान संधी आहे. ‘भाषा सल्लागार समिती’, विश्वकोश मंडळ आणि महाराष्ट्र साहित्य व संस्कृती मंडळ यांनी आजवर कोणते दिवे लावले आणि मराठी भाषा आणि साहित्याचा कोणता विकास केला, हा यक्षप्रश्न अनुत्तरितच राहणार आहे ही बाब अलाहिदा!
विजय तापस, मुंबई</strong>

तावडे यांनी आपली संस्कृती दाखवावी

‘नारळाची विक्रेत्याची टिचकी’ हा अग्रलेख वाचला. बाबा भांड यांच्याविषयी आणखी दोन तपशील देणे महत्त्वाचे वाटते. भांड यांना राज्य शासनातर्फे दिला जाणारा ‘उत्कृष्ट प्रकाशक’ पुरस्कार तर मिळाला आहेच, पण विशेष म्हणजे बालसाहित्यातील ‘विशेष योगदाना’बद्दल त्यांना साहित्य अकादमी पुरस्कारही मिळाला आहे. त्यावेळी साहित्य अकादमीच्या निवड समितीचे प्रमुख भालचंद्र नेमाडे होते. आता प्रश्न असा की, राज्य किंवा केंद्राने पुरस्कार देण्याआधी भांड यांची काही चौकशी केलीच नव्हती की त्यांनी त्या सर्वाना व्यवस्थित गुंडाळून ठेवले होते. नारळाविषयी शंका असेल तर नारळाला टिचकी मारतात. इथे नारळात गोटा आहे याची खात्री असतानाच नारळाला टिचकी मारल्याने, टिचकी मारणाऱ्याच्या हातालाच इजा होऊ शकते. आता प्रश्न उरतो बाकीच्या ‘ससाणी’ नारळांचा. या नारळांना टिचकी न मारता ते जरासे हलवले तरी ‘त्यात किती पाणी आहे’ हे सांगायला ज्योतिषांची गरज नाही. अजून वेळ गेलेली नाही. निवडक नारळ निवडून आणि बाकीचे विसर्जति करून तावडेंनी आपली संस्कृती दाखवून द्यावी.
नीना जोशी, डोंबिवली

साहित्य आणि संस्कृतीचे संवर्धन कसे होणार?

अग्रलेखातून महाराष्ट्रातील सद्य:स्थितीचे स्वरूप नेमके मांडले आहे. साहित्य संस्कृती मंडळाच्या सभासद आणि अध्यक्षांचा कार्यकाळ किती वर्षांचा असतो याची बहुतेकांना माहिती नाही. त्यामुळे महाराष्ट्रात नवीन सरकार, मग ते कोणत्याही पक्षाचे असो, येईपर्यंत मंडळाच्या अध्यक्षपदी बाबा भांड कायम राहणार आहेत. कारण झालेली किंवा केलेली नेमणूक बदलण्याची शक्यता आणि अपेक्षा विनोद तावडे यांच्याकडून नाही. या नेमणुकीला साहित्य वर्तुळातून विरोध होत असल्याचे बोलले आणि लिहिले जात आहे. साहित्य नावाचे एकच एक वर्तुळ नाही. अनेक कंपू, अनेक गट, अनेक स्वयंभू महान लोकांनी हे वर्तुळ खच्चून भरले आहे. त्यामध्ये प्रत्येक कंपू व गट वेगवेगळ्या दिशेने आवर्तने घेत फिरत राहतात. साहित्य संस्कृती क्षेत्राचे काही भले व्हावे यासाठी कोणी पुढे येत नाही. त्यामुळेच सरकारने केलेल्या नेमणुकीला रीतसर, लेखी, साधार विरोध करण्याचे धाडस कोणी दाखवणार नाही. उलट साहित्य वर्तुळातून विरोध या शब्द प्रयोगातून आपसूक मिळणारी प्रतिष्ठा मात्र स्वत:ची कमाई आहे अशी धारणा गर्वाने मिरवली जाईल. मुख्य प्रश्न आहे तो बाबा भांड यांच्या नेतृत्वाखाली पुढील काही र्वष महाराष्ट्रातील साहित्य आणि संस्कृती यांचे संवर्धन कसे होणार हा! अर्थात कोणत्याही संवर्धनासाठी आíथक भक्कम आधाराची गरज असते, त्यासाठी सरकारची अनुदाने असतात. नवीन अध्यक्ष या अनुदान कर्तव्यात कसूर करणार नाहीत याची खात्री आहेच.
सुनील बडूरकर

मानवतेला सलाम!

५ ऑगस्टचा दिवस. साधारण दुपारी १२ वा.ची वेळ. चर्नीरोड रेल्वे स्थानकात गाडी शिरताच कोणी तरी अज्ञात इसमाने आत्महत्येच्या उद्देशाने कसाबसा पेंटोग्राफमध्ये घुसण्याचा प्रयत्न केला व तात्काळ दोन स्फोट झाल्याचा आवाज आला. २५ हजार व्होल्टचा झटका बसल्याने पूर्णपणे भाजून निघाला. त्यातूनही १० मिनिटांनी त्याच्यात जीव आहे हे कळल्याबरोबरच काही तरुणांनी त्यातूनही त्याला पेंटोग्राफमधून काढून तात्काळ समोरच्या सॅफी हॉस्पिटलमध्ये पोहोचविले. यालाच म्हणतात वाचविण्याबद्दलची ‘जिद्द’! याच जिद्दीला मुंबईकर या नात्याने त्या तरुणांना सलाम!! विशेष म्हणजे या संपूर्ण प्रकारामध्ये शासकीय यंत्रणा पूर्णपणे निष्क्रिय दिसली.
– समीर शंकर व्हटकर, धारावी (मुंबई)

अशांवर कारवाई हवीच

‘हंसा राजपूत यांची आरोग्य राज्यमंत्र्यांकडून भेट’ हे वृत्त (५ ऑगस्ट) वाचले.
या घटनेतून असे जाणवते की, हंसा राजपूत या अतिवृद्ध मातेला तिच्या नातेवाईकांनी (शक्यता मुलाची आहे) रस्त्यावर सोडल्यावर तिची काळजी सरकारतर्फे मुख्यमंत्री निधीतून, तसेच इतर मार्गानी घेतली जात आहे हे अत्यंत योग्यच आहे. मात्र तिला अशा तऱ्हेने रस्त्यावर सोडणाऱ्या नातेवाईकाला पकडून त्याच्यावर कायद्यांतर्गत कडक कारवाई करणे अत्यंत निकडीचे आहे. नाही तर अशा प्रकारे आपल्या अगतिक माता-पित्यांना रस्त्यावर सोडण्याच्या विचारात असणाऱ्यांना चांगलाच मार्ग लाभेल.
प्रदीप कीतकर, कांदिवली (मुंबई)