‘भंगु दे काठिन्य माझे ..’   हा अग्रलेख (२२ जून) वाचला आणि चहाबाज लोकांचे चहातील टॅनिन व टॅनिक अ‍ॅसिडमुळे निर्माण होणारे धमनीकाठिण्य योगासनांमुळे कसे काय नष्ट होणार हा प्रश्न पडला.
‘युक्त आहार विहारस्य’..  आणि शेवटी.. ‘योगो भवति दुख हा’, या सूत्रांप्रमाणे योगसाधना दु:ख निवारक होण्यासाठी आहारयुक्त हवा हे सुरुवातीचेच ब्रीद समाज विसरतो हे लक्षात येते. अजिनोमोटो आणि शिसे, पारा आणि अस्रेनिक असलेल्या ‘नूडल्स’सारख्या चिजा व गलिच्छ वस्तू खाऊन योगासने करणे किंवा आधी योगासने करून नंतर विविध खाद्य-भोगासने करणे हे कितपत सयुक्तिक व दु:ख विनाशक आहे, हे ज्याने-त्याने ठरविलेलेच बरे.
भगवत्गीता तर यापुढील मजल दाखविते-  रसहीन अन्न नको, निवलेले शिळे अन्न नको. असे असतानाही आम्ही मात्र कारखान्यात बनलेली,  कित्येक दिवसापूर्वीची, रसायनांनी माखलेली बिस्किटे-चॉकलेट्स पर्समध्ये योगासनांनंतर खाण्यासाठी साठवून मोठय़ा कौतुकाने योगासनांचे विविध प्रकार समाजास दाखवीत असतो. काही ठिकाणी व योगाच्या क्लासनंतर बाहेर फरसाण आणि एच्व्हीओ ( हायड्रोजनेटेड व्हेजिटेबल ऑइल ) मध्ये बनलेल्या पदार्थाना भरपूर हादडण्याचे कर्म योगविद्या विशारद आचरीत असतात. हे  झाले आहाराबाबात.
योग्य विहाराबाबत (‘युक्त विहारस्य..’) तर मजाच मजा आढळते. ‘मच्छर अगरबत्ती’च्या धुरीत बिचारा प्राणायाम करून, शुद्ध हवेत प्राणायाम केल्याचा आनंद अपेक्षितो. काही ठिकाणी योगाचे क्लासेस तर हायड्रोजन सल्फाइड वायू तयार करणाऱ्या प्रयोगशाळांच्या सान्निध्यात केले जातात. हा कोणत्या प्रकारचा विहार आहे हे समजणे कठीण आहे.
एकूणच अशा प्रकारचा योग (की भोग?) पातंजलींना किंवा भगवत्गीतेत अपेक्षित नसावा असे वाटते. ‘युक्त स्वप्नाव बोधस्य..’ याबाबत तर आनंदी आनंदच आहे. तंग कपडय़ांत योगप्रकार करून साधक समाजास योगप्रकार दाखवितो किंवा अवयव प्रदर्शन करतो हे कळणे कठीणच. दारू उत्पादक, हायड्रोजनेटेड व्हेजिटेबल ऑइल उत्पादक, चहा-कॉफीचा प्रचारक समाजास कसला बोध करणार कुणास ठाऊक.
अरुण गणेश जोगदेव, मालाड (मुंबई)

सत्ताधारी झाल्यानंतर ‘वेगळेपण’ लयाला जाते का?
सध्या सर्व वृत्तपत्रांचे मथळे गाजवत असलेले ललित मोदी प्रकरण याच व्यवस्थेत पण अन्य पक्षाचा नेता असता तर त्याची याच भाजपच्या नेत्यांनी काय अवस्था केली असती याची कल्पना करून पाहा. याच परराष्ट्रमंत्रीणबाई लोकसभेत विरोधी पक्षनेत्या असताना असे प्रकरण- तेही देशाच्या प्रधानसेवकाला अंधारात ठेवून- उघडकीस आले असते तर यांनी संसदीय कामकाजाच्या वाया जाणाऱ्या तासांपेक्षा करदात्यांच्या खिशातून येणाऱ्या  पशाची किती काळजी केली असती याची कल्पना करा.
आज आपले वेगळेपण सांगणाऱ्यांच्या वर्तनात काही फरक जाणवतो का? खुर्चीत बसल्यानंतर वेगळेपण लोपून जाते आणि सगळे मणी एकाच माळेतले असल्याची प्रचीती येते. स्वत:चे हितसंबंध जपताना आता आमच्या पाठीशी असलेल्या पाशवी बहुमताच्या जोरावर आम्ही काहीही करू असे सांगण्याचा हा प्रकार आहे. नाही तरी सध्या मागच्या लोकसभेत ज्या गोष्टींना विरोध केला त्या गोष्टी जशा सादर झाल्या होत्या तशा बिनबोभाट राबवण्याचा एक प्रयोग सध्या रंगलाच आहे. पक्षातील दोन नेते सगळे संकेत धुडकावून एकाच व्यक्तीची- तेही संभावित गुन्हेगाराची- पाठराखण करतात.. हेच काय ते वेगळेपण?
रामचंद्र महाडिक, गोडोली (सातारा)

अभ्यासक्रमात विषय ठेवताना आजची जीवनशैलीही पाहा
भारत देश म्हटला की महान परंपरा, संस्कृती, आयुर्वेद, अध्यात्म, योग, ऋषीमुनी असे सारे काही मनात तरळू लागते आणि अति भारावलेपणा येऊन बुद्धीला जडत्व येऊन वास्तवाकडे डोळेझाक होण्याची शक्यता वाढते. शालेय विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमात योग विषय आणताना तसे होऊ नये. विद्यार्थ्यांवर आणखी एका विषयाचे ओझे लादताना काही बाबींचा विचारविनिमय व्हावा असे वाटते.
योग या विषयाची व्याप्ती फार मोठी असल्याने हा विषय शालेय अभ्यासक्रमात आणताना नक्की कशासाठी आणला जाणार आहे? योग या विषयाचे अभ्यासक, भावी संशोधक घडविण्यासाठी  की शारीरिक, मानसिक आरोग्यप्राप्तीसाठी. आरोग्यासाठी असल्यास हे शास्त्र ज्या वेळी निर्माण होऊन विकसित झाले त्या वेळची जीवनशैली आणी आत्ताची जीवनशैली यात तुलनाच होणार नाही इतका फरक असल्याने त्यातील सूत्रे, विचार, धारणा आता उपयुक्त ठरणार आहेत अथवा नाहीत याचा विचार व्हावा.  शारीरिक श्रम आपसूक होतील अशी त्या वेळची जीवनशैली आणि आताची गेल्या काही वर्षांत वाढत गेलेली यंत्राद्वारे व आता संगणकावर कामकाज करण्याची बठी जीवनशैली तसेच त्या वेळचा आहार तो मिळविण्यासाठी तयार करण्यासाठी करावे लागणारे श्रम व आत्ताचा आहार, बाजारात उपलब्ध असलेल्या नाना विविध खाद्यप्रकारांची रेलचेल पाहता शारीरिक आरोग्य उत्तम राहण्यासाठी उष्मांक जाळणे व त्यासाठी घाम गळेल अशा व्यायामाची गरज आहे.
शालेय मुलांना असा व्यायाम मदानी खेळांतून मिळतो. मुलांना योगाभ्यास करायला लावण्यापेक्षा खेळण्यासाठी मदाने उपलब्ध करून दिल्यास मुलांना त्याचा आनंद अधिक होईल व मानसिक  आरोग्यही लाभेल. अन्यथा घोकंपट्टी करून गुण मिळविण्यासाठी अभ्यासाच्या अनेक विषयांपकी एक विषय इतकेच योगाचे स्थान राहील.
पाच हजार वर्षांपूर्वीच्या जीवनशैलीशी सुसंगती साधणारे तंत्र कितीही ही श्रेष्ठ असले तरी  आत्ता त्याची उपयुक्तता कितपत यावर र्सवकष विचार व्हावा. जीवनशैलीत काळानुरूप आमूलाग्र बदल होत गेले तसे अभ्यासक्रमातही त्याच्याशी सुसंगती साधणारे त्याच्या अनुषंगाने येणारे विषय व बदल असावेत. पाच हजार वर्षांपूर्वीच्या शास्त्राला पुनरुत्थान देताना तसेच आले मंत्री महोदयांच्या मना म्हणून अभ्यासक्रमात विषय आणून तो अनिवार्य करताना शाळेतील शिक्षक म्हणजे योजना राबविण्यासाठी आयते उपलब्ध असलेले वेठबिगार नाहीत व मुले म्हणजे विविध प्रयोग करून बघण्यासाठी गिनीपिग नाहीत.
रजनी अशोक देवधर, ठाणे</strong>

योग्य, की विक्रमासाठीच?
योगासनांचे महत्त्व सर्वसामान्यांच्या मनावर िबबवण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी चांगलेच यशस्वी ठरले आहेत; त्याबद्दल त्यांचे अभिनंदन करायलाच हवे.  ‘योग दिवस’ आता दरवर्षी येणार.  तो ‘पाळला’ जाईल की ‘साजरा’ केला जाईल ते बघणे महत्त्वाचे.  त्याचमुळे ‘आयुष’ मंत्रालयाची भूमिका महत्त्वाची ठरते.  हा दिवस ‘इव्हेंट’ न ठरता योगासनांचे महत्त्व  आणि लाभ सांगणारा ठरला पाहिजे. आणखी एक लक्षात आलेली गोष्ट म्हणजे या कार्यक्रमात कुठेही तथाकथित सेलेब्रिटीजची किंवा बॉलीवूडताऱ्यांची दिखाऊ उपस्थिती  जाणवली नाही.
मात्र त्याचबरोबर तब्बल ६१ मिनिटे शीर्षांसन करणाऱ्या विक्रमवीराची बातमी काहीशी अस्वस्थ करणारी आहे. इतका वेळ शीर्षांसन करणे योग्य आहे का, की केवळ विक्रमासाठी म्हणून हे केले?
अभय दातार, ऑपेरा हाऊस (मुंबई)

‘आध्यात्मिक झुम्बा’?
‘भंगु दे काठिन्य माझे’ या अग्रलेखात (२२ जून) म्हटल्याप्रमाणे त्याला केवळ उष्मांक जाळण्याचे आणखी एक साधन असे स्वरूप येऊ नये. आता व्यायामाकरिता ‘झुम्बा’ वा तत्सम प्रकारचे अनेक नाचही शिकले / शिकवले जातात. या पाश्र्वभूमीवर योगाला आता ‘आध्यात्मिक झुम्बा’चे स्वरूप येईल की काय, अशी साधार भीती वाटते.
– विनिता दीक्षित, ठाणे