सन १९९२ मध्ये चर्च ऑफ इंग्लंडने एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतला होता. धर्मगुरुपदी महिलांचीही निवड करण्याचा. तोवर हे पद महिलांपासून दूरच होते. याचे साधे कारण म्हणजे परंपरावाद. धर्मपीठ कोणतेही असो, त्यात महिलांना गुरुपद देणे म्हणजे परंपराद्रोहच जणू. जीवनाच्या अन्य क्षेत्रांत महिलांना मानाचे स्थान मिळत असले, तरी धार्मिक परंपरावाद्यांना ते मान्य करणे जडच. चर्च ऑफ इंग्लंडमध्येही वेगळी परिस्थिती नव्हती. महिलांना वरिष्ठ धर्मगुरुपद देण्यास तेथील परंपरावाद्यांचा विरोध होताच. हा निर्णय व्हायलाच विसावे शतक उजाडावे लागले आणि तो झाल्यानंतरही आजतागायत त्याची अंमलबजावणी झाली नाही, यातच सर्व काही आले. पण उशिराने का होईना, चर्चने महिलांना न्याय दिला आहे. गेल्याच महिन्यात चर्चने आपल्या कायद्यात बदल केल्यानंतर महिलांना वरिष्ठ धर्मगुरुपदाची दारे मोकळी झाली आणि त्यानुसार कालच्या बुधवारी रेव्हरंड लिबी जेन यांची चर्च ऑफ इंग्लंडच्या पहिल्या महिला बिशप म्हणून नियुक्ती करण्यात आल्याची घोषणा झाली. इंग्लंडच्या राणीनेही या नियुक्तीवर आपले शिक्कामोर्तब केले आहे.
 या ऐतिहासिक निर्णयाचे सर्व स्तरांतून स्वागत होत आहे, हीसुद्धा एक स्वागतार्हच गोष्ट मानावयास हवी. या निर्णयाचे कौतुक करताना एक गोष्ट मात्र लक्षात घ्यायलाच हवी की, लिबी लेन या केवळ महिला असल्याने त्यांना हे पद मिळालेले नाही, तर त्यांनी आधी आपली कर्तबगारी सिद्ध केलेली आहे. वयाच्या अकराव्या वर्षी त्यांची चर्चशी ओळख झाली. तसे लेन यांचे पालक काही फार धार्मिक वृत्तीचे होते असे नाही. ते नेमाने चर्चमध्ये जातही नसत. परंतु घरातील संस्कारांमुळेच त्यांचे चर्चशी दृढ नाते जडले. १९९४ मध्ये जेव्हा चर्चच्या सेवेत महिलांचा पहिला गट रुजू झाला तेव्हा त्यात लेन यांचाही समावेश होता. पुढे त्यांनी चर्चमधील विविध पदांवर कामे केली. याच काळात त्यांना त्यांचा जीवनसाथी गवसला. जॉर्ज लेन हे त्यांचे नाव. सध्या तेही रेव्हरंड आहेत. पती आणि पत्नी रेव्हरंड असण्याचे हे इंग्लंडच्या इतिहासातील पहिलेच उदाहरण. या दाम्पत्याला दोन मुलेही आहेत. संसार आणि परमार्थ हे दोन्हीही आपल्या जोडीदारासमवेत सुखाने साजरे करण्याचा योग हाही तसा दुर्मीळच. लिबी लेन यांना तो लाभला.  बिशपपदी आपली नियुक्ती झाल्याने अनेक जण नाराज झाले आहेत याची जाणीव त्यांनाही आहे. त्यावरची त्यांची प्रतिक्रिया मात्र मोठी मार्मिक होती.
विरोधाचे आवाज ऐकून घेण्याची ताकद चर्चमध्ये आहे, हे त्यांचे सांगणे त्यांच्या मनातील दृढ विश्वास व्यक्त करणारेच होते; तेवढेच त्यांचे चर्चच्या परंपरांशी असलेली बांधीलकी टिकविण्याचे आश्वासन एक बिशप म्हणून अनेकांना दिलासा देणारेही होते.