17 December 2017

News Flash

४३. सूक्ष्म भेद

श्रीमहाराज जेव्हा म्हणतात की, ‘‘संत भगवंताशी तद्रूप असतात, पण त्यांच्या हातून घडणार नाही अशी

चैतन्य प्रेम | Updated: February 27, 2013 10:21 AM

श्रीमहाराज जेव्हा म्हणतात की, ‘‘संत भगवंताशी तद्रूप असतात, पण त्यांच्या हातून घडणार नाही अशी एकच गोष्ट आहे..’’ याचा गूढ अर्थ असा की भगवंत आणि श्रीसद्गुरू हे बाह्य़त: एकसमानच भासत असले तरी एका गोष्टीबाबत मात्र श्रीसद्गुरू वेगळे आहेत! ती गोष्ट म्हणजे ते कोणाचेही अनहित करीत नाहीत, होऊ देत नाहीत. अर्थात सुष्टांप्रमाणेच दुष्टांच्याही हिताचीच त्यांना अहोरात्र चिंता असते. भगवंत मात्र जीव जसं कर्म करील तसं फळ त्याला देतो. या खेळात दुष्कर्माचा जोर वाढत गेला की मग सुष्टांच्या रक्षणासाठी दुष्टांच्या नाशाकरिता मी अवतार घेतो, असंही भगवंत सांगतो. श्रीसद्गुरू मात्र दुष्टाला नष्ट करण्याचा विचार करीत नाहीत तर त्याच्यातला दुष्टपणा नष्ट करण्याचाच उद्योग अविरत करीत राहातात. ‘खळांची व्यंकटी सांडो’ हीच त्यांची भावना असते. त्यामुळे जिवाच्या हातून मनाच्या ज्या ओढीमुळे दुष्कर्म घडतात त्या ओढीला लगाम घालण्याचं अत्यंत सूक्ष्म कार्य श्रीसद्गुरू करीत असतात. मनाच्या ओढीनं दुनियेकडे धावणारं मन म्हणजे उताराला लागलेली आणि वेगनियंत्रकही निकामी झालेली गाडी आहे! त्या सुसाट गाडीला थांबवून, वळवून परत वर आणायचं, हे प्रवाहाविरुद्ध पोहोण्याचं ्रकाम श्रीसद्गुरूंनाच साधायचं आहे. त्यासाठी ते स्वत: नामरूप होऊन स्वतचं दान मला देतात. विचार करा, स्थूल देहातले श्रीमहाराज आपल्या घरी आले तर आपण त्यांची उपेक्षा करू की शक्य तेवढी त्यांची सेवा करू? अर्थातच आपण त्यांची उपेक्षा करणार नाही. मग सूक्ष्म नामरूपाने ते माझ्या अंतरंगात शिरले असताना त्या सूक्ष्म रूपाची सेवा म्हणजेच मानसिक जप आहे! त्या मानसिक जपानंच दुष्कर्माकडे असलेली माझी ओढ मंदावणार आहे. तेव्हा श्रीसद्गुरू कोणालाही अव्हेरत नाहीत, पण खळांची व्यंकटी मोडल्यावाचून स्वस्थही बसत नाहीत. मग त्या प्रक्रियेत किती का जन्म जाईनात! ती व्यंकटी, वाकडेपणा मोडण्याचे त्यांचे उपाय आणि मार्ग आपल्या कल्पनेपलीकडचेच असतात. ‘हृद्य आठवणी’त बाळंभटाची एक आठवण आहे. ही आठवण म्हणजे आपल्या पुढील प्रदीर्घ चिंतनाचा एक दुवा ठरणार आहे. भिक्षुकी करणाऱ्या या बाळंभटाला नामाला लावायचं, गोंदवल्यात नेऊन एका मंदिराचं पुजारीपण द्यायचं महाराजांनी ठरवलं. त्या बाळंभटाला गांजाचं व्यसन होतं. तो म्हणाला, ‘‘महाराज, ते नामबिम काही मी जाणत नाही. मला रोज चार आण्याचा गांजा लागतो. तो देणार असाल तर मी गोंदवल्यात येऊन राहीन.’’ श्रीमहाराजांच्या चरित्रात बाळकोबा परिचारक यांचीही एक कथा आहे. ते तर श्रीमहाराजांना म्हणाले, ‘‘मी उगीच जप करीत बसणार नाही. माझे काम थोडक्यात झाले पाहिजे. नाहीतर तुमचा काय उपयोग?’’ (चरित्र/प्रकरण सातवे) जे मनात आहे ते न लपविता थेट प्रकट करण्यालाही मन सरळ असावं लागतं. हा न जाणवणारा आपलेपणाच आहे. नवविधाभक्तीत यालाच आत्मनिवेदन म्हणतात! तेव्हा महाराज बाळंभटांना म्हणाले, ‘‘वा! अशी स्पष्टवक्ती माणसं मला आवडतात. मी तुमचं व्यसन पुरवीन, तुम्ही नाम मात्र घ्यायचं!’’

First Published on February 27, 2013 10:21 am

Web Title: little difference