आजच्या सर्व सजीवांच्या मागे मागे जात राहिलो तर सर्व सजीवांचा पहिला असा जो एक ‘वैश्विक समान पूर्वज’ असेल (ज्याला शास्त्रज्ञांनी ल्युका म्हटले) तो म्हणजे डीएनएची आज्ञावली व त्यानुसार बनलेले प्रथिनांचे आवरण एवढेच असून तो निर्जीव-सजीवांच्या सीमारेषेवर असावा.
‘मानव-विजय’ ही माझी लेखमाला जानेवारीत सुरू होऊन जूनच्या शेवटापर्यंत २६ लेख येऊन २०१५ सालातील अर्धे वर्ष झालेले आहे. या विवेकवादी लेखमालेला जनमानसाकडून आतापर्यंत मिळालेला प्रतिसाद, माझ्या मूळ अपेक्षेहून खूपच अधिक चांगला आहे, याचा अर्थातच मला फार आनंद झाला आहे. मानव जात आफ्रिकेत उत्क्रांत होऊन जगभर पसरली, माणसाने विविध संस्कृती निर्माण केल्या, वेगवेगळे ईश्वर कल्पिले, धर्म स्थापन केले असे विषय आणि जगभरातील मोठमोठय़ा धर्माविषयीची थोडीफार माहिती असे विषय आतापर्यंत आपण या लेखमालेत पाहिले.
निम्म्या वाटचालीच्या या टप्प्यावर क्षणभराची उसंत घेऊन मागे पाहिल्यावर असे वाटते की, जरी बहुतेक लोकांना माझे विचार पटत आहेत, तरी दुसऱ्या अनेकांच्या मनात अशी शंका आहे की..
१) अतिगुंतागुंतीचे तरीही अतिकुशल, पण प्राणधारी, स्वयंचलित जैविक यंत्ररूप शरीर, ज्याला प्राप्त झालेले आहे असा हा माणूस, २) अजब मेंदू व अजब क्षमता असलेला असा हा माणूस, ३) असे जीवन, अशा संस्कृती व असे धर्म स्थापन करू शकणारा हा माणूस, ४) निसर्गाचा व निसर्ग-नियमांचा एवढा उपयोग करून घेऊन, निसर्गातील एवढय़ा अडचणींना तोंड देऊन, पन्नास-शंभर वर्षे आनंदाने जगू शकणारा आणि ५) पृथ्वी व्यापून शिवाय जमिनीवरून अंतराळात झेप घेऊ शकणारा असा हा माणूस वैज्ञानिक सांगतात तसल्या केवळ उत्क्रांतीने, बिनशेपटीच्या माकडापासून पण कसला तरी ‘सर्व समर्थ ईश्वर अस्तित्वात असल्याशिवायच’ निर्जीव दगडमातींतून निर्माण झाला आणि त्याने स्वकर्तृत्वाने पृथ्वीवर आपले राज्य स्थापले, हे पटावे तरी कसे? काही जणांना वाटते की, ‘माकडापासून माणूस आणि बोकडापासून बैल’ (हे त्यांचे शब्द बरे का!) अशी उत्क्रांती, असे पृथ्वीवरील सजीव सृष्टीच्या समृद्धीचे- जैवविविधतेचे स्पष्टीकरण हे विज्ञानाचे निव्वळ कल्पनारंजन आहे. शिवाय त्यांना असेही वाटते की, ‘ज्याच्यापासून माणूस उत्क्रांत झाला ती माकडीण काय एके दिवशी अचानक माणूस प्रसवली? मग आज तसे का होत नाही? आज माकडाला माकड पिल्लू व माणसाला माणूस पिल्लू असेच होते ते का? शिवाय त्याहून मोठा प्रश्न असा की, आधी ती माकडीण कशी निर्माण झाली? ती जर घुशीपासून निर्माण झाली असेल तर आधी ती घूस कशी निर्माण झाली? मुळात दगड, माती, हवा, पाणी या निर्जीव भौतिक वस्तूंपासून, अन्नग्रहण करणारा व त्यामुळे वाढू, जगू, टिकू शकणारा, स्वेच्छेने हालचाल करू शकणारा प्राणधारी ‘प्राथमिक सजीव’ तरी कसा अस्तित्वात आला? अशा सर्व प्रश्नांना संशोधकांनी शोधलेली उत्तरे अगदी थोडक्यात समजून घेण्याचा प्रयत्न आपण या व पुढील अशा दोन लेखांत करणार आहोत.
आज पृथ्वीवरील आपले जग, अनेक प्रकारचे सजीव म्हणजे वनस्पती, पशू, पक्षी, कीटक, मानव इत्यादींनी गजबजलेले आहे. त्यातील वनस्पती सोडून इतर सर्व सजीवांची म्हणजे प्राणी, पक्षी, मासे, मानव अगदी क्षुद्र जीवजंतूंची शरीरेसुद्धा कमालीच्या गुंतागुंतीची, पण स्वत: हालचाल करू शकणारी स्वयंचलित यंत्रे आहेत. शिवाय त्यातील प्रत्येक यंत्र, पुनरुत्पादनाने स्वत:सारखी यंत्रे, स्वत:च तयार करू शकते आणि हे सर्व एका अतिसूक्ष्म पेशींतील रेणूत गुंफलेल्या आज्ञावलीनुसार घडते. या आज्ञावलीप्रमाणे विविध निर्जीव मूलद्रव्यांच्या अणू-रेणूंपासून या सजीवाचे शरीर घडवले जाते, काही काळ ते चालते. त्या शरीरातील ‘जिनोम’ या ‘आज्ञावली संग्रहाची’ प्रत पुढील पिढीकडे सुपूर्द केली जाते व शरीराच्या मृत्यूनंतर ते म्हणजे शरीर पंचमहाभूतात मिसळून जाते. ‘जेनेटिक्स’ हे आधुनिक, प्रगत जीवशास्त्रीय विज्ञान आपणाला असे सांगते की, प्रत्येक सजीव ही- १) डीएनए व २) प्रथिने या दोहोंची एकत्र येऊन केलेली निर्मिती आहे. प्रत्येक सजीवाच्या गाभ्यात, प्रत्येक पेशीत डीएनएची विश्वभाषेतली आज्ञावली असते आणि त्या सजीवाचे वैशिष्टय़पूर्ण शरीर हे त्या आज्ञावलीनुसार प्रथिनांनी बनविलेले शरीर असते. डीएनए व प्रथिने हे दोन्ही गुंतागुंतीचे निर्जीव रेणू एकत्र आल्यावर ते असे सजीव (प्राणधारी) शरीर घडवू शकतात. डीएनए व प्रथिने यांना एकत्र जोडू शकणारा आरएनए हा तसाच एक रेणू हा त्या दोहोंचाही पूर्वज आहे व त्यात त्या दोहोंचेही काही गुणधर्म आहेत.
आपली पृथ्वी ४.६० अब्ज वर्षांपूर्वी वायूंच्या जळत्या गोळ्याच्या स्वरूपात निर्माण झाल्यानंतर, ती थंड व घट्ट होऊन तिच्यावर ज्यात कुठलाही जीव-मासा नाही अशा पाण्याचे समुद्र निर्माण होण्याकरिता सुमारे एक अब्ज वर्षे लागली. याचा अर्थ असा की, सुमारे साडेतीन अब्ज वर्षांपूर्वी पृथ्वी घनघट्ट झालेली असूनही तिच्यावर सजीव असे काहीच नव्हते. तेव्हा पृथ्वीवर फक्त पाणी, गॅसेस व दगडमाती म्हणजे निर्जीव रासायनिक मूलद्रव्ये होती, आकाशात विजा चमकत होत्या, पृथ्वीवर मोठमोठे जलाशय बनले होते. सूर्यप्रकाश नीलकिरणांसह येत होता, ऑक्सिजन व आजच्यासारखे हवेचे वातावरणसुद्धा त्या काळी अस्तित्वात नव्हते. अगदी क्षुद्र सजीवसुद्धा नव्हते. त्या काळी वातावरणात बराचसा हैड्रोजन, कार्बनडाय ऑक्साइड, थोडा अमोनिया, मिथेन व आणखी काही सेंद्रिय वायू होते. ओझोनचे कवच नसल्यामुळे सूर्याकडून वातावरणात अतिनील किरण भरपूर येत होते, आकाशात विजेचे तांडव होते. यांच्या एकत्रित परिणामांनी एका टप्प्यावर समुद्रात काही गुंतागुंतीचे रेणू (एकाहून अधिक वेगवेगळ्या अणूंचे रासायनिक एकत्रीकरण) तयार झाले. समुद्रात व किनाऱ्यावर अशा रेणूंचे जे द्रावण बनले त्याला शास्त्रज्ञ ‘प्रायमिव्हल सूप’ असे म्हणतात, जे अनेक खळग्यांत, पाण्यात, जमिनीवर कमी-अधिक द्रव घनस्थितीत साठून राहिले. त्यावर पुन्हा विजा, अतिनील किरण इत्यादींचा परिणाम होऊन, त्यात अधिक गुंतागुंतीचे रेणू बनले. कोटय़वधी वर्षांनी त्यात असा एक ‘रेणू साचा’ तयार झाला की, त्याने आसपासच्या मूलद्रव्यांची एकमेकांत गुंफण करून आपल्या स्वत:सारखाच दुसरा नवीन साचा तयार केला. म्हणजे एकाचे दोन, दोनाचे चार व चाराचे आठ होऊ शकले. म्हणजे या ‘रेप्लिकेटर्स’कडे ‘पुनरुत्पादनाचा’ गुण आला. यातूनच पुढे केव्हा तरी आरएनएचे थोडेसे सक्षम रेणू बनले. त्यातून पुढे डीएनए व प्रथिनांचे रेणू अशी वाटचाल घडून, त्यातून आणखी पुढे सूक्ष्म सजीवांची निर्मिती शक्य झाली.
आजच्या माणसाच्या शरीरातील प्रत्येक कार्यक्षम अवयव (डोळा, हात, पोट, त्वचा, हृदय, मेंदू वगैरे) हा कोटय़वधी सजीव पेशी विशिष्ट तऱ्हेने एकमेकांना जोडून बनलेला असतो. त्यातील प्रत्येक पेशीच्या केंद्रात असा डीएनए असतो, की जो योग्य ती प्रथिने बनवितो व त्यांना त्या त्या अवयवांच्या पेशी बनविण्याचा हुकूम देतो. त्या त्या पेशींनी आपल्या शरीराचे ते ते कार्यक्षम अवयव बनतात.
‘कार्बन’ या मूलद्रव्यात वेगवेगळ्या रेणूंची माळ त्यांना चिकटवून गुंफण्याचा गुणधर्म आहे. म्हणजे कार्बनमुळे वेगवेगळ्या रेणूंची लांबच लांब माळ गुंफणे व त्यामुळे रेणूंद्वारे माहिती, आज्ञावली साठविण्याची क्षमता निर्माण झाली व त्यामुळेच या निर्जीव पृथ्वीवर सजीवांचे जग बनणे शक्य झाले. सायटोसाइनसारख्या ज्या न्यूक्लिओटाइडच्या माळा पुनरुत्पादनाच्या स्पर्धेत टिकल्या त्या माळा म्हणजेच ‘आरएनए’ व तीच जनुके जी काही अमिनो आम्ले असलेली प्रथिने तयार करू शकतात. आरएनए असलेल्या काही पेशींमध्ये जेव्हा स्थिर व सक्षम ‘डीएनए’ तयार झाला तेव्हा त्या पेशीत आरएनएच्या मदतीने मोठमोठी प्रथिने व नवनवीन क्षमता उत्क्रांत होणे शक्य झाले. रासायनिक पसारा वाढला. डीएनए व आरएनए असलेल्या पेशींच्या जिनोमचा (पेशी केंद्रातील ४६ गुणसूत्रांचा- क्रोमोसोम्सच्या संग्रहाचा) आकार व त्यांच्या क्षमता प्रत्येक पिढीत वाढत गेल्या. वरील प्रत्येक पायरीला कोटय़वधी वर्षे लागली.
सारांश असा की, काही निर्जीव रासायनिक मूलद्रव्यांपासून ‘रेप्लिकेटर्स’, त्यांच्यापासून आरएनए व त्यांच्यापासून पुढे ‘आज्ञावली जशीच्या तशी साठवू टिकवू शकणारा व त्याची हुबेहूब प्रत काढू शकणारा डीएनए’ हा ‘तज्ज्ञ’, तर ती माहिती कृतीत आणणारी ‘प्रथिने’ (अनेक अमिनो आम्ले एकमेकांना जोडून बनते ते प्रथिन होय.) हे ‘तंत्रज्ञ’ व या दोघांना जोडणारा दुवा म्हणजे आरएनए हे सर्व एकत्र येऊन निसर्गात पहिल्या सजीव पेशी बनल्या, ज्या एकत्र जोडल्या जाऊन सजीव प्राण्यांचे कार्यक्षम अवयव व शरीरे बनली. आजच्या सर्व सजीवांच्या मागे मागे जात राहिलो तर सर्व सजीवांचा पहिला असा जो एक ‘वैश्विक समान पूर्वज’ असेल (ज्याला शास्त्रज्ञांनी ल्युका म्हटले) तो म्हणजे डीएनएची आज्ञावली व त्यानुसार बनलेले प्रथिनांचे आवरण एवढेच असून तो निर्जीव-सजीवांच्या सीमारेषेवर असावा. ते राहो. निसर्गातील अतिसूक्ष्म अणू-रेणूंनी बनलेली ही सर्व रहस्ये, सत्ये फार गुंतागुंतीची आहेत. इ.स. १९३० साली लागलेल्या अतिसूक्ष्म कण अडीच लाखपट मोठे करून दाखविणाऱ्या ‘इलेक्ट्रो मायक्रोस्कोप’च्या शोधामुळे व शास्त्रज्ञांच्या कष्टमय संशोधनामुळे ही रहस्ये आपल्याला कळू तरी शकली.
 (या व पुढील अशा दोन लेखांतील माहितीसाठी ‘राजहंस’  प्रकाशित, डॉ. सुलभा ब्रह्मनाळकरलिखित ‘गोफ जन्मांतरीचे’ या अभ्यासपूर्ण  ग्रंथाची मदत घेतली आहे. त्यांचे आभार.)

survival of marine species in danger due to ocean warming
विश्लेषण : महासागर तापल्याने प्रवाळ पडू लागलेत पांढरेफटक… जलसृष्टीचे अस्तित्वच धोक्यात?
GST Uniform taxation of goods and services
‘जीएसटी’च्या ध्येयपूर्तीसाठी…
shukra and rahu planet will make vipreet rajyog these zodiac could be lucky
राहू- शुक्राच्या संयोगाने ५० वर्षांनंतर तयार होणार विपरीत राजयोग; या तीन राशींच्या लोकांचे नशीब फळफळणार?
mercury retrograde in aries negative impact on these zodiac sing budh vakri
एप्रिलमध्ये बुध करणार वक्री चाल; ‘या’ राशींच्या लोकांच्या जीवनात येणार संकट? आर्थिक हानीची शक्यता