अडवाणी यांना गमावण्यासारखे आता काही नाही. अशा वेळी तरी त्यांनी थेट भूमिका घेतली असती तर अनेकांचा त्यांच्याविषयीचा आदर वाढला असता. ती संधी त्यांनी गमावली..
अठराव्या शतकातील सम्राट १५वा लुई याच्या काळात फ्रान्सची कला, संस्कृती आदी क्षेत्रांत मोठी भरभराट झाली. परंतु तो युद्धकलेत निपुण नव्हता. पुढे तर त्याचे अंगवस्त्र असलेली माíक्वस द पाँपादोर हिच्या हातीच राज्याची सूत्रे गेली. तिच्या तोंडचे एक वचन इतिहासात अजरामर झाले आहे. सम्राट लुई याच्यावर सत्तात्यागाचा प्रसंग आला असता त्यास पुढे काय, असे विचारले गेले. त्या वेळी त्यासमवेत असलेल्या माíक्वस द पाँपादोर हिने उत्तर दिले, ‘आफ्टर मी, द डेल्यूज’. म्हणजे माझ्यानंतर थेट जगबुडीच. आपल्याकडे कालबाहय़ झालेल्या अनेक वयोवृद्ध लोकांची हीच मानसिकता असते. आपल्यानंतर आता काही जगाचे खरे नाही, असे त्यांना वाटू लागते. कलेच्या क्षेत्रात संगीतकार दिवंगत नौशादसाहेब हे त्याचे एक उदाहरण. आपल्यानंतर आता काही संगीतच राहिलेले नाही, अलीकडच्या चित्रपटांतील गाणी म्हणजे सर्व काही असंगीत आहे, असे त्यांना आयुष्याच्या संध्याकाळी वाटू लागले होते आणि तसे ते वारंवार बोलून दाखवत. राजकीय क्षेत्रात अशी भावना झालेले ताजे उदाहरण म्हणजे लालकृष्ण अडवाणी. आणीबाणीच्या चाळिसाव्या वर्धापन दिनानिमित्ताने अडवाणी यांनी मुलाखती देण्याचा सपाटा लावला असून नागरिकांचे मूलभूत अधिकार हिरावून घेतले जाण्याचा धोका अद्यापही कसा टळलेला नाही, हे ते आवर्जून सांगताना दिसतात. १९७५ साली तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी आणीबाणी लादली ती एका विशिष्ट आíथक, राजकीयसंदर्भात. त्या वेळी नुकत्याच झालेल्या अरब युद्ध आणि पाठोपाठच्या अमेरिकेवरील तेल बहिष्कारामुळे जागतिक अर्थव्यवस्था कुंठित झाली होती आणि भारतात सरकारविरोधात उग्र निदर्शने होऊ लागली होती. त्यात इंदिरा गांधी यांना न्यायालयीन पातळीवर काही पराभव पत्करावे लागले. त्यामुळे सत्तात्याग करावा लागतो की काय, अशी परिस्थिती निर्माण झाली असता इंदिरा गांधी यांनी नागरी स्वातंत्र्याचा गळा घोटण्याचे निलाजरे पाऊल उचलले. देशाच्या इतिहासात पहिल्यांदा अशा तऱ्हेने आणीबाणी लादली गेली.
यातील कोणतेही संदर्भ आता नाहीत. इंदिरा गांधी यांनी लादलेल्या आणीबाणीच्या विरोधात सक्रिय लढा देणाऱ्या बिनीच्या शिलेदारांत अडवाणी आघाडीवर होते. त्या वेळी अर्थातच ते तरुण होते. तरुणपणी गाजवलेल्या मर्दुमकीच्या आठवणींचे भूत अनेकांच्या डोक्यावरून आयुष्यभर उतरत नाही. आम्ही असे केले होते, आमच्या वेळी असे होते आदी शब्दांतून ते वारंवार प्रकट होत असते. अडवाणी यांचे नेमके असे झाले आहे. आपण त्या वेळी आणीबाणीस विरोध केला, ती मागे घेण्यासाठी इंदिरा गांधी यांना भाग पाडले या आपल्या आयुष्यातील देदीप्यमान कृत्याचा परिणाम अडवाणी यांच्या स्मृतिपटलावर अद्यापही कायम असून त्याचमुळे ते आणीबाणी परत येऊ शकते, अशा स्वरूपाचे विधान करीत आहेत. त्यातही परत अडवाणी यांची लबाडी अशी की त्यांच्या मते संभाव्य कथित आणीबाणीस जबाबदार शक्तींचा ते थेट उल्लेख करणे टाळतात. १९७५ साली काँग्रेस सत्तेवर होती. आता ती सत्तेच्या जवळपासही जाण्याच्या स्थितीत नाही. केंद्रासह देशातील प्रमुख राज्यांत आज भाजप सत्तेवर आहे. तेव्हा अडवाणी यांच्या भाकिताप्रमाणे आणीबाणी खरोखरच येणार असेल तर ती भाजपच्या नेत्यांनी आणल्याखेरीज काही येणार नाही. तेव्हा आपला पक्ष आता आणीबाणीवादी झाला आहे, असे अडवाणी यांना सुचवायचे आहे काय? तसे असेल तर त्यांनी नि:संदिग्धपणे आपले मत मांडण्याची गरज आहे. पण तेवढी िहमत दाखवण्यास आणि तशी ती दाखवल्यास त्याची किंमत मोजण्यास ते तयार नाहीत. अडवाणी यांचा आडूनआडून रोख आहे तो पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर. हे मोदी राजकारणात आले ते अडवाणी यांचे बोट धरून. एका अर्थाने ते अडवाणी यांचे मानसपुत्र. गुजरातच्या राजकारणात तत्कालीन मुख्यमंत्री केशुभाई पटेल आणि सुरेश मेहता आदी नेत्यांच्या साठमारीत या दोघांनाही पर्याय म्हणून अडवाणी यांनी नरेंद्र मोदी यांचे घोडे मुख्यमंत्रिपदासाठी दामटले. त्या वेळी मोदी हे िशगरू होते. तेव्हा त्याच्या पाठकुळी बसून सत्तेचा लगाम आपल्या हाती ठेवता येईल ही अडवाणी यांची अटकळ. ती किती चुकीची होती ते मोदी यांनी दाखवून दिले आणि अडवाणी आदी धेंडांना मागे सारून स्वत:च्या मर्जीने राज्यकारभार सुरू केला. आपण एखाद्यास संधी दिली म्हणून त्याने कायम आपलेच बोट धरून राहावे असे ज्येष्ठांना वाटत असते. राजकारणात वा अन्य कोणत्याही क्षेत्रात असे वाटणे हा बावळटपणा ठरू शकतो. अनेकदा त्यांचा भ्रमनिरास होतो आणि तो आवश्यकही असतो. तेव्हा अडवाणी यांचा असा भ्रमनिरास झाला आणि तो करण्यात मोदी यांनी काही गर केले असे नाही. त्यामुळे अडवाणी संधी मिळेल तेव्हा मोदी यांना आपले मोठेपण दाखवून देत असतात. आताही आणीबाणीचा संदर्भ देण्यामागे असा हेतू नव्हता यावर अडवाणी यांना ओळखणाऱ्यांना विश्वास ठेवणे कठीण जाईल. वास्तविक उपपंतप्रधान असताना अडवाणी हेच भाजपचे आगामी नेते असे मानले जात होते. भाजपस पुन्हा सत्ता आलीच तर पंतप्रधानपदी अडवाणी हेच असणार ही काळ्या दगडावरची रेघ होती. परंतु आपल्या पाकिस्तानच्या दौऱ्यात अडवाणी यांचे पाऊल घसरले आणि आपल्या माजी पत्रकार मित्राच्या सल्ल्याने ते बॅरिस्टर जिना यांची स्तुती करून बसले. सत्तेच्या पायऱ्या चढत असताना वर गेल्यावर अनेकांना व्यापक मान्यतेची आस असते. अडवाणी यांनाही ती होती. तोपर्यंत कडवे िहदुत्ववादी ही त्यांची ओळख होती. त्यात मवाळपणा आणण्याची गरज त्यांना वाटू लागली. त्याच हेतूने स्वत:चे प्रतिमासंवर्धन करण्याच्या नादात त्यांनी जिनागुणगान केले आणि अडवाणी यांची घसरगुंडी सुरू झाली. त्यानिमित्ताने पत्रकारांच्या साहय़ाने राजकारण करणाऱ्यांचे काय होते, तेही दिसून आले. त्यानंतर अडवाणी अधिकाधिक अडगळीत पडत गेले आणि मोदी यांनी त्यांच्यावर तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करायची वेळ आणली. त्याची परतफेड करण्याचा केविलवाणा प्रयत्न म्हणजे अडवाणी यांचे हे आणीबाणीचा बागुलबुवा दाखवणारे विधान. ते करताना, मोदी यांच्यावर त्यांनी थेट नेम साधला असता तरी त्या शौर्याबद्दल अडवाणी यांचे कौतुक करता आले असते. नेतृत्वाने लीन असावे, मिजासखोर नसावे आदी उपदेशपर सल्लाही अडवाणी अलीकडच्या मुलाखतींत देतात. तो देतानाही त्यांनी उगाच लेकी बोले सुने लागे छापाची आडवळणे घ्यायची गरज नव्हती. भाजपच्या कोणा नेत्याचे वर्तन बेगुमान आहे, हे त्यांनी सरळपणे सांगितले असते तर ते त्यांच्या वयाला आणि वयपरत्वे आलेल्या ज्येष्ठतेला शोभले असते. कारण अडवाणी यांना गमावण्यासारखे आता काही नाही. अशा वेळी तरी त्यांनी थेट भूमिका घेतली असती तर अनेकांचा त्यांच्याविषयीचा आदर वाढला असता. ती संधी त्यांनी गमावली. गोष्टी सांगेन युक्तीच्या चार ही त्यांची भूमिका योग्य असली तरी त्या सल्ल्याची कोणास मुळात गरज आहे का, याचाच त्यांना नसलेला अंदाज यातून दिसून आला. जग जणू आपल्या वाक्मौक्तिकांसाठी आसुसलेले आहे असे अनेक वृद्धांना वाटत असते. अडवाणी यांची गणना या अशा वृद्धांत होते हे कटू असले तरी सत्य आहे.
याचे कारण अशा अनेकांप्रमाणे अडवाणी यांनाही आपली वेळ सरली आहे, याचे भान नाही. दिमाखदार निवृत्ती ही साधना आहे. प्रसिद्धीच्या झोतात वावरणाऱ्या अनेकांकडून ती करणे राहून जाते. परिणामी स्वत:चे अनावश्यक ठरत जाणे पाहण्याची वेळ अशांवर येते आणि ‘आपल्यानंतर जगबुडी’सदृश विधाने त्यांच्याकडून केली जातात.