03 June 2020

News Flash

कोहिनूर मिलच्या जागेत बाळासाहेबांचे स्मारक उभारावे!

कोहिनूर मिलच्या जागेत बाळासाहेबांचे स्मारक उभारावे! शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर दुसऱ्याच दिवशी शिवसेना नेते प्रिं. मनोहर जोशी (व इतर) यांनी बाळासाहेबांचे शिवतीर्थावरच स्मारक व्हावे अशी

| November 20, 2012 10:46 am

कोहिनूर मिलच्या जागेत बाळासाहेबांचे स्मारक उभारावे!
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर दुसऱ्याच दिवशी शिवसेना नेते प्रिं. मनोहर जोशी (व इतर) यांनी बाळासाहेबांचे शिवतीर्थावरच स्मारक व्हावे अशी आग्रही मागणी केलीय.
प्रिं. जोशी यांनी याच भागातून नगरसेवक, आमदार, खासदार म्हणून प्रतिनिधित्व केलं आहे. त्यामुळे ‘दादरकर’ किंवा ‘शिवाजी पार्क’ परिसरात राहणाऱ्या ‘जनतेचं’ मत त्यांना माहीत असावं. कदाचित बाळासाहेब आणि शिवतीर्थ, बाळासाहेब आणि दादर, मराठी माणूस या ऋणानुबंधासाठी पार्काची अथवा क्रीडांगणाची थोडीशी जागा गेली तर ते खळखळ करणार नाहीत.
शिवतीर्थावर ‘अपवादात्मक’ परिस्थितीचा विचार करून सरकारने बाळासाहेबांच्या ‘अंत्यसंस्कारास’ परवानगी दिली. परंतु स्मारकास परवानगी देताना दहा अडथळे येऊ शकतात म्हणून काहींनी ‘इंदू मिल’च्या जागेचा ‘अर्धा’ पर्याय सुचवलाय! कदाचित त्यामागे सध्याच्या शिवशक्ती- भीमशक्ती महायुतीचा दृष्टिकोन असावा आणि बाबासाहेबांच्या भेटीला बाळासाहेब अशी भावनिक किनारही असावी! पण एक झालं, इंदू मिलची जागा बाबासाहेबांच्या स्मारकासाठी द्या, या मागणीला, ‘स्मारक उभारून काय करणार? विचार पुढे न्या’ असं सांगणाऱ्यांनाच आता ‘स्मारकाची’ गरज भासू लागलीय. त्यामुळे आता इंदू मिलची ‘वाटणी’ करण्याचा प्रस्ताव पुढे येईल.
शिवतीर्थावरील कायदेशीर अडचणी आणि इंदू मिलवर शिवसैनिकांआधी भीमसैनिकांनी दाखवलेला हक्क यांतून बाळासाहेबांचे स्मारक वादविवादात रेंगाळणार, यावर पर्याय म्हणून, सेनाभवन समोरील कोहिनूर मिलच्या जागेत बाळासाहेबांचे स्मारक उभारले तर अनेक प्रश्न सुटतील आणि साहेबांचे स्मारक कुठल्याही वादविवादाविना उभे राहील. कारण कोहिनूर मिलची जागा सध्या प्रिं. मनोहर जोशी यांच्या मुलाच्या ताब्यात आहे. त्यामुळे जागेवरून ‘वाद’ होणार नाही. जागा दादरमध्येच, सेनाभवनाच्या समोर आणि शिवतीर्थाच्याही जवळच आहे!
यामुळे शिवाजी पार्कमधील ‘पार्क’, क्रीडांगण यांचा ‘संकोच’ होणार नाही आणि इंदू मिलमध्ये वाटण्या कराव्या लागणार नाहीत!
प्रिं. मनोहर जोशी आजवर कायम बाळासाहेबांचे ऋ ण मानत आलेत. ते म्हणतात, ‘माझ्यासारख्या वारावर जेवणाऱ्या माणसाला बाळासाहेबांनी नगरसेवक, आमदार, विरोधी पक्ष नेता, मुख्यमंत्री, लोकसभा अध्यक्ष केलं.’ परवाच एका वृत्तवाहिनीवर त्यांनी अलीकडेच ते बाळासाहेबांना उपराष्ट्रपतीपदासाठी माझा विचार करा म्हणून भेटायला गेल्याचेही सांगितले. याचा अर्थ १९६७ पासून २०१२ पर्यंत मनोहरपंतांनी बाळासाहेबांकडे मागितले, अथवा बाळासाहेबांनीच त्यांना दिले. इतकं भरभरून देणाऱ्या लोकोत्तर नेत्यासाठी आपल्या खासगी मालकीतली थोडीशी जागा देऊन, मनोहरपंतांनी बाळासाहेबांना मरणोत्तर काही तरी ‘द्यावे’ आणि बाळासाहेबांना उचित आदरांजली वाहावी. ज्यामुळे बाळासाहेबांचे उत्तुंग स्मारक दादरमध्येच शिवतीर्थाजवळ, सेनाभवन समोरच उभे राहील.
– संजय पवार, पुणे.

स्मारकाच्या वादापेक्षा सामान्यांची सोय पाहा
बाळासाहेबांचे स्मारक शिवाजी पार्कवर करण्याची मागणी, त्या मागणीचे समर्थन आणि तिला विरोध हे सगळे अपेक्षित होते. भास्कर जाधव आणि छगन भुजबळ या सध्या मंत्री असलेल्या पण एके काळच्या शिवसनिकांनी या स्मारकाला अनुकूल प्रतिक्रिया देऊन आपली राजकीय जडण घडण करणाऱ्या नेत्याचे ऋण मान्य केले आहे. पण भुजबळ यांनी सुचवलेला पर्याय जास्त व्यावहारिक वाटतो. शिवाजी पार्क हे खेळाचे मदान आहे. तिथे स्मारक करून खेळाची जागा कमी होईल व बाळासाहेबांना श्रद्धांजली वाहण्यासाठी येणाऱ्यांच्या गर्दीने खेळाडूंना उपद्रव होईल; त्या ऐवजी जाता येता लक्ष जाईल अशी मोक्याची जागा सावरकर स्मारकाजवळ असताना हा वाद साहेबांच्या समर्थकांनी आणि चाहत्यांनी वाढवू नये. त्यांच्या राजकीय आणि कौटुंबिक वारसांनी हा प्रतिष्ठेचा प्रश्न न करता सामान्य माणसाची सोय हा मुख्य कार्यक्रम राबवावा यात त्यांचा मोठेपणा आहे आणि तो त्यांनी दाखवला तर साहेबांच्या आत्म्याला शांती तर लाभेलच, पण सामान्य माणसाचा शिवसेनेवरचा विश्वास सार्थ ठरेल.
– नीरजा गोंधळेकर

फेसबुकचा दुरुपयोगही सुरूच असतो..
शहीन घाडा या तरुणीस फेसबुकवर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या निधनानंतर झालेल्या उत्स्फूर्त बंदला विरोधी वक्तव्य केल्याने अटक झाल्याची बातमी (लोकसत्ता, २० नोव्हेंबर) वाचली. फेसबुक वगरे माध्यमे आपले विचार व्यक्त करण्याची प्रभावी व्यासपीठे आहेत. त्यांचा योग्य वापर केल्यास चांगली जनजागृती आणि विधायक आंदोलने शक्य होतील परंतु आजकाल या माध्यमाचा तरुण पिढी दुरुपयोगही करताना दिसते. एखाद्या तरुणीचा फोटो टाकून त्याला हजारो लाइक्स मिळवले जातात. ११ ऑगस्ट २०१२ ला सी. एस. टी. परिसरात िहसाचार होण्यापर्यंत गोष्टी पाकिस्तानकडून घडवल्या जातात, मुंबईतील नियमबाहय़ ‘नाइट लाइफ’ विरोधात कारवाई करणाऱ्या ए.सी.पी. लक्ष्मण ढोबळे यांच्याविरोधात आंदोलन आयोजित केले जाते.
त्यामुळे अशा माध्यमांतून मत व्यक्त करताना संयम बाळगणे व सदसद्विवेकबुद्धीचा वापर करणे क्रमप्राप्त आहे. परंतु आपण जे लिहितोय त्याचा योग्य विचार न केल्यास असेच अराजक घडण्याची शक्यता आहे. सदर तरुणीने बाळासाहेबांच्या उत्तुंग व्यक्तिमत्त्वास जाणून न घेता असे विचार मांडले असावेत. आपल्या लिखाणामुळे शिवसेनाप्रमुखांना आराध्य दैवत मानणाऱ्या कोटय़वधी शिवसनिकांच्या भावना दुखावल्या जाऊ शकतात याचा विचार होणे आवश्यक होते. तसेच शिवसेनेकडून कुठल्याच बंडाचे आवाहन केले गेले नव्हते, हे सुद्धा विचारात घेणे आवश्यक होते.
अशा प्रकारच्या घटनांना कशा प्रकारे हाताळले जावे? कारवाईचे प्रकार काय असावेत? इत्यादी गोष्टी शासनाने तातडीने ठरवणे आवश्यक आहे असे वाटते.
-महेश भानुदास गोळे , कुर्ला (पश्चिम)

पत्रलेखकांची ‘प्रेरणा’ निघून गेली..
‘मी माझ्याकडे येणाऱ्या प्रत्येक दैनिकातील ‘वाचकांची पत्रे’ आवर्जून वाचतो’ हे माननीय बाळासाहेब ठाकरे यांचे ‘मराठी वृत्तपत्र लेखक संघा’च्या वर्धापनदिनानिमित्त पाठवलेल्या संदेशातले किंवा प्रसारमाध्यमांतील त्यांच्या मुलाखतीतील उद्गार तमाम पत्रलेखकांना प्रेरणादायकच ठरत.त्यांच्या निधनाने ही ‘प्रेरणा’ अनंताच्या प्रवासाला निघून गेली आहे.
 – किरण प्र. चौधरी, वसई.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 20, 2012 10:46 am

Web Title: lokmanas 3
Next Stories
1 लोकमानस
2 म्हणे स्वच्छतेचे धडे!
3 बालकांसाठी मनोरंजन धोरण तयार करण्याची गरज
Just Now!
X