टगेगिरीला ‘आप’ले म्हणणारा पक्ष!
आम आदमी पक्षाचे ज्येष्ठ नेते योगेंद्र यादव यांना जाहीर पत्रकार परिषदेत एका व्यक्तीने काळे फासले. ती व्यक्ती आम आदमी पक्षाचीच कार्यकर्ता असल्याचे नंतर सांगण्यात आले. या घटनेचा सुजाण नागरिक म्हणून निषेधच केला पाहिजे. योगेंद्र यादव हे नामांकित राजकीय विश्लेषक आणि आम आदमी पक्षातील एक संयमी, शांत, कधीही हमरीतुमरीवर न येणारे अभ्यासू नेते आहेत. त्यामुळे त्यांना या प्रसंगाला कारण नसताना तोंड द्यावे लागले हे निश्चितच वाईट आहे. पण खरा प्रश्न आहे तो अशा घटना वाढीस का लागल्या?
आज यादवांवर हल्ला झाल्यावर आपच्या इतर नेत्यांनी लोकशाही धोक्यात आहे आणि आम्ही खरे बोलतो म्हणून आमच्यावर हल्ले होतात असा दावा करायला सुरवात केली. हा त्यांचा दावा विरोधाभासी आहे, कारण दोन वर्षांपूर्वी जेव्हा हीच मंडळी दिल्लीत भ्रष्टाचारविरोधी आंदोलन करत होती तेव्हा शरद पवारांवर एका तरुणाने हल्ला केला होता त्या वेळी या मंडळींनी त्याचे समर्थन हा लोकांचा प्रस्थापितांविरोधी जनआक्रोश आहे असे केले होते. पुढे जन्रेलसिंग नावाच्या तरुण पत्रकाराने केंद्रीय मंत्री पी. चिदम्बरम यांच्यावर बूट फेकून मारला होता. या जन्रेलसिंग महाशयांना आम आदमी पार्टीने विधानसभेचे तिकीट दिले आणि ते टिळकनगर (तिलकनगर) येथून आमदारदेखील झाले. भाजप मुख्यालायाच्या बाहेर ५ मार्चला आप आणि भाजप समर्थकांमध्ये जी हाणामारी व दगडफेक झाली तिथेदेखील हे आमदार जन्रेलसिंग एखाद्या सराईत मवाल्यासारखे दगडफेक करीत होते. एका बाजूला अशा प्रवृत्तींना समाजात प्रतिष्ठा मिळवून द्यायची आणि नंतर या प्रवृत्तींचा आपल्याला त्रास झाला की मग आपण अन्यायाचे बळी आहोत असा कांगावा करायचा हा दुतोंडीपणा आहे. 
अशा घटना थांबवायच्या असतील तर समाजात अशा लोकांना प्रतिष्ठा मिळणार नाही याची काळजी राजकीय पक्षांनी तसेच समाजानेदेखील घ्यावी.
नीलेश पाटील, धुळे.

पुढे टंचाई.. मान्सूनची ओढ.. सावकार.. कढ कसे थांबणार?
महाराष्ट्रातील वातावरण साधारण वीस दिवसांपूर्वी खरेच आनंदाचे समाधानाचे होते. सलग दोन वर्षांचे अवर्षण आणि दुष्काळ यानंतर सावकाशपणे पावसाने चांगली वर्तणूक दाखवली. लहर सांभाळत का होईना पण आपली वेळ पाळली. खरिपाची थोडी पिके हाती आली. सोयाबिन या हुकमी पिकाने चांगला उतारा दिला, अपेक्षेपेक्षा जास्त उत्पन्न निघाले. दसरा, दिवाळी, लग्नसराई या गोष्टी एकटय़ा सोयाबीन व तुरीने जमवून आणल्या.
रब्बीची तर बातच विचारू नका. आनंद, अपेक्षा, उत्साह, समाधान या बाबी जणू पिकांच्या सोबत सगळ्याच शेतात दिमाखाने डोलत होत्या. पाणी नसल्यामुळे बहुतेकांनी गेल्या वर्षी ऊस मोडून इतर पिके घेतली. परिणाम चांगला साधला. ज्वारीला संधी आली. मागच्या दहा वर्षांत ज्वारी अगदीच दुर्लक्षित आणि दुर्मीळ अर्थातच अति महाग झाली होती. या वर्षी ज्वारीचे भरले कणीस दिसते कसे, फुलते कसे, हसते कसे याचे वर्णन रोज कुणी न कुणी ऐकवत होते. गावातील आणि शहरातीलसुद्धा लोक रोज हेच बोलताना दिसायचे. अगदी प्रत्येकाने चौपट उत्पन्नाचा हमखास अंदाज केला. त्याचा हिशेब मांडला. एकूण पसे किती मिळणार त्यातून कुणाचे आधी द्यायचे, बँकेचे हप्ते भरायचे, पुढच्या वर्षीच्या शाळाप्रवेशासाठी किती लागतील अशी एक ना अनेक सुंदर स्वप्ने उन्हात चमकणाऱ्या पिकांना बघून सगळ्यांनीच रंगवली, मनात वारंवार खेळवली.(काही जाणकार करती मंडळी आणि अनुभवी राजकीय नेते पक्के समजून गेले की आता निवडणूक सोपी झाली. )
आणि फक्त पंधरा दिवसांपूर्वी- काही कळायच्या आत सर्व संपले. झोपेत असतानाच अख्खे छत कोसळून माणसे मरावीत किंवा अपंग व्हावीत असे घडले. पाऊस सुरू झाला. लोक पळू लागले, पिके वाचावीत, गोळा करावीत म्हणून सरभर झाले. काही ठिकाणी कापणी झाली. काहींना वेळ होता. वाटले पाऊस थांबला. पण नाहीच. तो सगळीकडेच पसरला. रोज वाढत गेला. सोबत बर्फ घेऊन त्वेषाने कोसळला. शत्रूने सूड घ्यावा तसा आक्रमक झाला. घर वाचवायचे की जनावरे, लहान मुले की म्हातारे, पिके काढायची कशी, सुरक्षित ठेवायची कुठे? ज्यांना काहीच कळत नाही ते भेदरून घरात बसले आहेत. ज्यांना कळले आणि ज्यांना उद्याचा दिवस गिळून टाकेल हे दिसले त्यांनी आहे त्या ठिकाणी हंबरडा फोडला. पाायातले अंगातले मनातले बळ संपले, नष्ट झाले.
सरकारी यंत्रणासुद्धा दिङ्मूढ झाली आहे. कर्मचारी, अधिकारी यांचे चेहरे पार बदलले आहेत. मेंदू आणि शरीर यावर ताण हळूहळू रोज वाढत आहे. प्रत्यक्ष सर्वेक्षणे करणे तर आहेच, मदत देणे, त्याशिवाय, आपत्कालीन मदत आणि कामे, शिवाय महत्त्वाची निवडणूक, त्याची हजारो कामे. आपले विभाग सांभाळून अधिक जास्त जबाबदारी. वेळ अत्यंत कमी. मनुष्यबळ अतीच कमी. त्यातच आभाळ आणखी मोकळे व्हायला तयार नाही.
पुढे आणखी दोन महिन्यांनी अनेक गावांत पाणी टंचाई असेल. मान्सून लांबणार आहे, पुढचा हंगाम कसा होणार? तेव्हा शेती कधी दुरुस्त करायची? तेवढे बळ, पसा, मजूर, बियाणे आणि योग्य पाऊस याचा मेळ घालायचा आहे. त्या वेळी आíथक संस्था आणि सावकार कसे वागतील याची तर कल्पनाही करवत नाही आणि मनातले कढ थांबत नाहीत.
सुनील बडूरकर

शिक्षणसंस्थांतून वर्षांनुवर्षे ठरते आहे, ती शिक्षकांची अपात्रताच!

शालेय शिक्षणाची गुणवत्ता आणि दर्जा वाढवण्यासाठी राज्यात पहिल्यांदाच घेतलेल्या शिक्षक पात्रता परीक्षेत ९५ टक्क्यांहून अधिक शिक्षक नापास झाल्याची बातमी गेल्या आठवडय़ात समोर आली आणि शिक्षकांच्या दर्जावर एक मोठे प्रश्नचिन्ह उभे राहिले. खरे तर प्राथमिक शिक्षण ते उच्च शिक्षण या प्रवासात मिळणाऱ्या शिक्षणाचा दर्जा हा उच्चतम असणे आवश्यक आहे. चांगल्या दर्जाच्या शिक्षणातून चांगले विद्यार्थी घडून समाजाच्या प्रगतीला हातभार लावतात, त्यामुळे या विद्यार्थ्यांना घडविणाऱ्या शिक्षकांचा दर्जा उच्चतम असलाच पाहिजे, ही अपेक्षा रास्त आहे. परंतु समोर आलेले निकाल शिक्षकांच्या व एकूणच शिक्षणाच्या दर्जावर विदारक प्रकाश टाकणारे म्हटले पाहिजेत.

शिक्षण संस्था चालवणाऱ्यांनाच शिक्षणाच्या आणि शिक्षकांच्या दर्जाबद्दल घोर अनास्था आहे आणि शिक्षण संस्थांतील त्यांचा पराकोटीचा भ्रष्टाचार या अनास्थेतून त्यांना कधीही बाहेर येऊ देणार नाही. या शिक्षण संस्थात होणारी शिक्षक भरती म्हणजे नुसता फार्स असतो. शिक्षकाचे शिक्षण, त्यांची ज्ञानलालसा, त्याची शिक्षणाप्रती निष्ठा या बाबींना महत्त्व दिले जाण्याऐवजी पशाला महत्त्व दिले जाऊन शिक्षक भरती होते आहे.
अशा प्रकारे भरतीला आळा घातला गेला, तर शिक्षकांचा दर्जा उच्च असेल.
दीपक का. गुंडये, वरळी.

.. कांगावा तरी करू नका!
मतदारांना गेला आठवडाभर सर्वच वर्तमानपत्रांमधून एक आवाहन करण्यात येत होते, की त्यांनी आपापल्या मतदानकेंद्रावर जाऊन मतदारयादीतील आपल्या नावासोबत छायाचित्रही असल्याची खात्री करून घ्यावी. ‘लोकसत्ता’तही ८ मार्च रोजी त्यासंबंधी जाहीर आवाहनाची मोठी चौकट होती. शेजारीच ‘मतदारयादीस १९ लाख छायाचित्रांची प्रतीक्षा’ या मथळ्याखाली संबंधित बातमी होती. रविवार, ९ मार्च रोजी यासाठी विशेष मोहीम आयोजित करण्यात आलेली आहे असे त्यात नमूद केलेले होते. या मोहिमेतून, ज्यांचे नाव अद्याप मतदारयादीत समाविष्ट झालेले नाही, त्यांना फॉर्म क्र. सहा भरून नोंदणी करणेही शक्य असल्याचेही लिहिले होते.
अनुभव मात्र वेगळाच आला : आम्ही आमच्या मतदानकेंद्राबाबतची माहिती एसएमएसद्वारे मागवली आणि त्या ठिकाणी (डीएव्ही शाळा, तुळशीधाम, ठाणे-पश्चिम) सकाळी ११ वाजता गेलो, तर तिथे चिटपाखरूही नव्हते. तिथल्या रखवालदाराने सांगितले, की सकाळपासून अनेक नागरिक इथे येऊन परत गेले, पण निवडणूक कार्यालयातर्फे इथे कुणीही आलेले नाही.
याला फसवणूक नाही तर काय म्हणावे? यथावकाश हेच निवडणूक कार्यालय आकडेवारीनिशी कांगावा करेल, की विशेष मोहिमेला नागरिकांचा थंडा प्रतिसाद!
अशा वेळी आम्ही कुणाकडे दाद मागायची?
प्रीती छत्रे, ठाणे.