वर्षांला फक्त सहा गॅस सिलिंडर अनुदानित किमतीमध्ये देण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयामुळे गृहिणींमध्ये सर्वत्र हाहाकार उडाला हे स्वाभाविकच आहे. वास्तविक प्रत्येक कुटुंबाला वर्षांला किती सिलिंडर्स लागतात असे जर विचारले तर बहुसंख्य लोकांना याचे अचूक उत्तर ताबडतोब देता येईल की नाही या विषयी संदेह वाटतो. वर्षांला सहाऐवजी नऊ सिलिंडर देण्यास महाराष्ट्र सरकारने तत्त्वत: मान्यता दिली खरी; पण उद्या राज्यात सरकार बदलले तर काय होणार हे अधांतरीच राहते. तेव्हा सर्वच कुटुंबांनी आपल्या गॅसच्या वापरावर नियंत्रण ठेवण्यास शिकले पाहिजे, तसेच दुसऱ्या पर्यायांचाही शोध घेतला पाहिजे.
– माधव आठल्ये, डोंबिवली.

निवडणूक आयोगाचे मारून मुटकून ‘स्वयंसेवक’
‘छायाचित्र मतदारयाद्यांचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमा’संबंधी २ ऑक्टोबर २०११ च्या अंकामध्ये जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. त्यामधील माहितीनुसार महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम ७९अ अन्वये गृहनिर्माण संस्थांचे अध्यक्ष आणि सचिव यांना पदसिद्ध ‘मतदान केंद्रस्तरीय स्वयंसेवक’ म्हणून घोषित करण्यात आले आहे; परंतु त्या संबंधीची कोणतीही माहिती गृहनिर्माण संस्थांकडे पोहोचलेली नाही. किंबहुना अशी जबाबदारी सोपविण्यापूर्वी संबंधित व्यक्तींना किमान प्रशिक्षण देणे आवश्यक आहे याचाही बहुधा महाराष्ट्र सरकारला विसर पडला असावा.
मुळातच गृहनिर्माण संस्थांचे पदाधिकारी विनावेतन फावल्या वेळात हे काम सांभाळत असतात. ९० टक्के संस्थांमध्ये त्यांना सभासदांचा सहकारही मिळत नाही. खरे म्हणजे ज्याला प्रामाणिकपणे आणि संपूर्ण न्याय देऊन काम करायचे असेल तर त्याला ते काम पूर्ण वेळ देऊनच करायला हवे इतके किचकट काम असते. त्यामुळे अशा बिनपगारी काम करणाऱ्यांवर अधिक कामाचा बोजा टाकल्यास सचिव किंवा अध्यक्षपदासाठी कोणीही तयार होणार नाही. दुसरी गोष्ट म्हणजे अनेक संस्थांमधील पदाधिकारी हे ज्येष्ठ नागरिक असण्याची शक्यता आहे, त्यामुळे असे ज्येष्ठ नागरिक ही सेवा कितपत देऊ शकतील? सरकारी व्यवस्थेमध्ये ६० वर्षांनंतर ती व्यक्ती निवृत्त होत असते, त्यामुळे या निर्णयाचा फेरविचार करणे जरुरी आहे.
– शशिकांत काळे, डहाणू रोड.

पूर्ण संगणकीकरण जमेना, राग पेन्शनरांवर
एका पेन्शनरने विलंबाने मिळणाऱ्या प्रथम मासिक पेन्शनामुळे त्याच्या संसारात निर्माण झालेल्या आर्थिक विवंचनेला वैतागून आत्महत्या केल्याची बातमी अलीकडेच एका दैनिकात छापून आली होती. या त्याच्या परिस्थितीला संबंधित खात्यातील महिला कर्मचाऱ्यांना त्यांनी जबाबदार ठरविले आहे. काहीही सयुक्तिक कारण नसताना पेन्शनरांचे पेन्शन प्रस्ताव संबंधित खात्याकडे महिनोन् महिने पडून असते. विचारणा करायला जाणाऱ्या पेन्शनरला त्या खात्यातील कर्मचाऱ्यांची तुसडेपणाची, अपमानास्पद बोलणी ऐकावी लागतात. वरिष्ठाकडे चौकशीवजा तक्रार केल्यास जाणूनबुजून गफलती करून अजूनच उशीर केला जातो.
आणखीही एक कारण आहे.  सध्या सर्वच शासकीय व निमशासकीय कार्यालयांमध्ये एक नवीन प्रशासकीय समस्या निर्माण झाली आहे. नवीन नियुक्त कर्मचाऱ्यांना (तरुण) कागदपत्रे आणि जुन्या पद्धतीच्या रेकॉर्ड पद्धतीबरोबर संगणकाशी जुळवून काम करता येत नाही आणि जुन्यांना नवीन संगणक प्रणालीवर प्रभुत्व मिळवणे जमत नाही. याचा त्रास तेथे काम करून घेण्यासाठी जाणाऱ्या सामान्य नागरिकांना होतो आहे. यातच अपुरा कर्मचारीवर्ग यामुळे कितीही नागरिकांच्या सनदा (सिटिझन्स चार्टर्स) शासकीय कार्यालयांत लावल्या तरी त्यांचा काहीही उपयोग नाही.
– मोहन गद्रे, कांदिवली.

लुटल्या आठवणी.. ‘ज्ञानदीप’ वगळुनी!
‘जन आले दुरूनी – लुटल्या आठवणी’ हे बातमीपत्र वाचले. आपण दूरदर्शनवर २० वर्षे चाकरी करूनही आपल्याला निमंत्रणही नसावे किंवा आपल्या कर्तृत्वाची आठवणही कुणाला येऊ नये या गोष्टीचे वाईट वाटले. पण हा ऐतिहासिक सोहळा होता. त्यातून ऐतिहासिक सत्ये बाहेर पडलीच पाहिजेत. पण कुणाजवळ काय सांगण्यासारखे आहे? शून्य! पण मी सांगू शकतो- क्षुल्लक, क्षुद्र असलो तरी! तेव्हा संक्षेपानेच निवेदन करतो.
* दूरदर्शनवरील एकमेव ‘ज्ञानदीप’ कार्यक्रम असा की, ज्यावर संशोधन करून मालाडच्या अमिता भिडे यांनी पीएच.डी. डॉक्टरेट मिळवली.
* हाच एकमेव कार्यक्रम असा की, ज्यावर मुंबई, पुणे, लोणावळा येथे केलेल्या चित्रीकरणावर आधारित अनुबोधपट  Unique in the World या नावाने बीबीसीच्या निर्मात्या एलिझाबेथ स्मिथ यांनी २६ जानेवारी १९८५ रोजी रात्री प्रसारित केला.
* दूरदर्शनवर ज्ञानदीप हा एकमेव कार्यक्रम १५०० मंडळे निगडित आहेत असा होता. या मंडळांनी लोणावळ्याला शाळा तर इगतपुरीला वृद्धाश्रम सुरू केले. स्वत:चे मासिक ३० वर्षे चालविले. ज्ञानदीपने माणसे घडवली.
* या कार्यक्रमातील ‘कल्पवृक्ष कन्येसाठी’ या कार्यक्रम मालिकेचे उद्घाटन लतादीदींनी मुलाखत देऊन केले (५० मिनिटे) मुलाखतकार-  माधव गडकरी, संपादक, लोकसत्ता.
* मुंबईचे यश पाहून दिल्ली केंद्राने हिंदी ज्ञानदीप सुरू केला. त्यासाठी तीन निर्माते प्रशिक्षणासाठी एक महिना आकाशानंदांच्या अधिकारात होते.
* ज्ञानदीप कार्यक्रमामुळे निर्मात्याला जागतिक कीर्ती लाभून त्याला इंग्लंड, पाकिस्तान, मलेशिया येथील निमंत्रणे आली. तेथे त्याने प्रशिक्षण वर्ग घेतले.
– आकाशानंद,
 सेवानिवृत्त निर्माता- ज्ञानदीप आमचा, उपसंचालक, दूरदर्शन मुंबई.

नवरात्राचे उत्सवी दिवस कमी करा
गणपती पाच किंवा सात किंवा ११ दिवसच ठेवायचा असे शास्त्रात कदाचित सांगितलेही असेल.  परंतु गणेशोत्सवाचे दिवस ११ दिवसांवरून ५ दिवसांवर आणणारी काही घरे वा मंडळेही आहेत. नवरात्रातही प्रत्यक्ष उत्सवाचे दिवस ५ दिवसांवर आणल्यास गणपती अथवा देवी कोपणार नाही. चमकेश कार्यकर्त्यांचा हिरमोड होईल; परंतु वेळेचा, विजेचा अपव्यय टाळल्यास तीच वीज आपण दुसऱ्या कामासाठी वापरू शकू. यामुळे गणपती आणि नवरात्रीचे दिवस कमी करावयास हवेत, असे मला वाटते.
– विजयकुमार वासुदेव माने,
बोरिवली (पश्चिम), मुंबई.

बुवांचा कावा!
आजकाल सार्वजनिक वाहनांच्या, विशेषत: रेल्वेच्या आतील िभती- जारणमारण, काली जादू, वशीकरण, मूठ मारणे- असे भयानक शब्द बटबटीत अक्षरांत लिहिलेल्या पोस्टरांनी भरून गेलेल्या असतात. या सर्वातून वाचण्यासाठी ‘बाबा गनी खान, बाबा बंगाली यांना भेटा.’ त्याचा मोबाइल नंबर असा असा आहे, अशी ती जाहिरात असते. अंधश्रद्धा निर्माण करणाऱ्या अशा जाहिराती रेल्वेच्या डब्याला विद्रूप करतात, हे कायद्याचे उल्लंघन आहे.
त्यापेक्षा चिंताजनक गोष्ट म्हणजे या जाहिराती चिकटविण्यासाठी रात्रीच्या वेळी यार्डात या बाबांचे हस्तक घुसू शकतात, रेल्वे यार्डाची सुरक्षा निर्थक आहे. ही माहिती दहशतवाद्यांनाही सहजपणे मिळते.. जाहिरातीत दिलेल्या मोबाइल नंबरवरून अशा सर्व बाबांना पकडणे सहज शक्य आहे. मग पोलीस खात्याच्या या कारवाईआड कोणती काळी जादू येत आहे?  
–   सुरेंद्र थत्ते, बोरिवली (प)