पाकनं सीमेवर काही आगळीक केली किंवा एखादा दहशतवादी हल्ला झाला की, लगेच शांतता व संघर्ष अशा मुद्दय़ांभोवती चर्चेची गुऱ्हाळं सुरू होण्याची प्रथा पडली आहे. जम्मूच्या पूंछ भागात पाक लष्कराच्या हल्ल्यात पाच जवान मारले गेल्यावर तीच प्रथा पाळली जात आहे. मात्र असं करताना आपण- म्हणजे भारतीय जनता- एक मूलभूत मुद्दा डोळ्यांआड करीत आहोत.
पाकिस्तान का निर्माण झाला हा तो मुद्दा आहे. हिंदू व मुस्लीम ही दोन वेगळी ‘राष्ट्रकं’ (नॅशनॅलिटीज्) आहेत आणि ते एकत्र नांदू शकत नाहीत, या मुद्दय़ावर मुख्यत: फाळणी झाली. मात्र बहुसंख्य मुस्लीम भारतातच राहिले. ‘मुस्लीम संस्कृती’ची म्हणून जी काही केंद्रं होती, तीही भारतातच राहिली. अशा परिस्थितीत भारतात हिंदू व मुस्लीम गुण्यागोविंदानं नांदत आहेत, असं झालं, तर पाकची गरजच काय आहे, असा प्रश्न निर्माण होतो. हा जो पाकिस्तानच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे, तो त्याला १९४७ पासून भेडसावत आला आहे. म्हणूनच बहुसंख्य हिंदू असलेल्या भारतात मुस्लीम असुरक्षित आहेत, असं जगाला आणि पाकमधील जनतेला दाखवण्यासाठी येथे म्हणजे भारतात या दोन्ही समाजात तणाव निर्माण व्हावा, ही पाकची रणनीती राहिली आहे.
दुर्दैवानं या रणनीतीला भारतातील हिंदुत्ववादी आणि मुस्लिमांच्या एकगठ्ठा मतांसाठी त्या समाजातील कट्टरवाद्यांना हाताशी धरणारे पुरोगामी व इतर राजकीय पक्ष हातभार लावत आले आहेत. परिणामी भारतातील मुस्लीम समाज हा कायम असुरक्षितता व अनुनय या दुष्टचक्रात अडकून पडला आहे. त्यातून बाहेर पडून देशाच्या मुख्य प्रवाहात येण्यासाठी त्याला अवसरच दिला गेलेला नाही. त्यामुळं जोपर्यंत भारतात हिंदू व मुस्लीम तणाव आहे, तोपर्यंत पाकला त्याचा फायदा होत राहणार. म्हणूनच पाकच्या अस्तित्वाचा प्रश्न अधिक बिकट करणं आपल्या फायद्याचं आहे आणि त्यासाठी भारतात हिंदू व मुस्लिम सलोखा अत्यावश्यक आहे. तो घडवून आणण्यासाठी जसं हिंदुत्ववाद्यांनी भारत हा ‘हिंदूंचा पाकिस्तान’ बनवण्याचं आपलं ‘प्रोजेक्ट’ सोडून द्यायला हवं, तसंच पुरोगामी व इतर मंडळींनी धर्मनिरपेक्षतेचा बेगडी आविष्कार टाकून देऊन मुस्लीम समाजातील कट्टरवादी व जहालांना निवडणुकीतील मतांसाठी हाताशी धरणं सोडून द्यायला हवं.
अर्थात देशातील सत्तेच्या राजकारणाचा जो पट आहे, त्यात ही अपेक्षा अवास्तव ठरणार आहे. म्हणूनच पाकचा फायदा होत आला आहे आणि राहील. मग पूंछसारखी प्रकरणं घडली की, आपण सारे शांतता व संघर्ष या मुद्दय़ांभोवती चर्चेची गुऱ्हाळं चालवत राहणार आहोत.
–    प्रकाश बाळ, ठाणे.

वर्गणी देऊ, पण कार्यालयातच!
श्रावणाचे आगमन होताच महिन्याभराने येणाऱ्या गणेशोत्सवाची चाहूल लागते आणि नाकोनाकी असणाऱ्या सार्वजनिक मंडळांच्या लोकांची वर्गणी वसुलीस सुरुवात होते. आज मुंबईतील बहुसंख्य गणेशोत्सव मंडळे नोंदणीशिवाय वर्गणी जमा करत असतात. त्यातील काही जण वर्गणी मागताना धमकावण्याही देण्यास मागेपुढे पाहात नाहीत. त्यांच्या खर्चाचे ताळेबंद नसतात. शिवाय कोणत्या मंडळाची नोंदणी झालेली आहे याची पडताळणी करणे सामान्यजनांस अशक्य असते. जर सक्तीच्या वर्गणी वसुलीस पायबंद घालून इच्छुक वर्गणीदारांनी वर्गणी मंडळाच्या कार्यालयात जाऊन द्यावी असा नियम केला, तर अप्रिय प्रसंग टाळून गणेशोत्सवाचे पावित्र्य उचितपणे राखण्यास मदत होईल असे वाटते.
–    साधना गुलगुंद, चारकोप, कांदिवली

गोदावरी खोऱ्यात विभागीय पाणीवाद नको
अलमट्टी धरणासंदर्भात महाराष्ट्र व कर्नाटक राज्यांनी एकत्रित व्यवस्थापन करून पुराच्या संकटावर मात केल्याबद्दल (लोकसत्ता, ६ ऑगस्ट) संबंधितांचे हार्दिक अभिनंदन. नदीखोऱ्यातील दोन सदस्य-राज्यांनी कसा जलव्यवहार केला पाहिजे याचे हे एक चांगले व म्हणून अनुकरणीय उदाहरण आहे. ‘जायकवाडीत सोडलेल्या पाण्याचे नऊ कोटी रुपये मोजा; अन्यथा दंड’ (लोकसत्ता, ७ ऑगस्ट) हे मात्र एकाच राज्यातील एका नदीखोऱ्यातील दोन सदस्य-विभागांतील परस्परसंबंधांवरील दुर्दैवी भाष्य आहे असे म्हणावे लागेल.
मराठवाडय़ाच्या हक्काचे पाणी नाशिक-नगरने अडवले व वापरले. मराठवाडय़ासाठी पाणी सोडायला शासनाने खूप उशीर केला. त्यामुळे फार पाणी वाया गेले. या सर्वातून मराठवाडय़ाचे नुकसान झाले. म्हणून आता मराठवाडय़ाला तुम्हीच नुकसानभरपाई द्या आणि त्यातून दुष्काळात दिलेल्या पाण्याची पाणीपट्टी वळती करून घ्या, असे आता मराठवाडय़ाने म्हणावे काय? गोदावरी खोऱ्यातील सर्व विभागांनी समंजस भूमिका घ्यावी व तारतम्य बाळगावे हे चांगले. अन्यथा, जल व्यवस्थापन राहील बाजूला आणि पसा, वेळ व शक्ती कोर्टकचेरीतच जाईल. नदीखोरेनिहाय जल व्यवस्थापनाऐवजी अभियंते राजकारण्यांची प्यादी म्हणून तर काम करत नाहीत ना, अशी शंका प्रस्तुत प्रकरणामुळे येते.
– प्रदीप पुरंदरे,
सेवानिवृत्त प्राध्यापक, ‘वाल्मी’, औरंगाबाद</p>

पाकला जशास-तसे उत्तर देणे गरजेचे
जम्मू-काश्मीर मधील पूंछ विभागात पाकिस्तानी सनिकांनी दहशतवादी संघटनेच्या मदतीने भारतीय जवानांवर हल्ला केला, त्यात पाच जवान शहीद झाले.
याआधी आठ महिन्यांपूर्वीच एका भारतीय जवानाचे शिर कापून नेण्याचा प्रकार घडला होता. मागील दोन वर्षांत पाकिस्तानी सनिकांनी ५७ वेळा शस्त्रसंधी कराराचे उल्लंघन केल्याची मोजणी भारतीय प्रसारमाध्यमे करीत आहेत. भारतात दहशतवादी कारवाया करण्यासाठी पाकिस्तानी सरकार, आयएसआय (पाकची गुप्तहेर संस्था), लष्कर-ए-तयबा, हरकत-उल-जिहाद, जैश-ए-मोहम्मद, जमात-ए-इस्लामी, जिहाद-ए-वतन अशा जवळपास २२ दहशतवादी संघटनांना आणि त्यांच्या ‘आकां’ना पाठीशी घालतात हे मुंबई हल्ल्यात पकडला गेलेला एकमेव दहशतवादी अफझल कसाब याने कबुलीजबाबात म्हटले होते.
भारतीय सेनेच्या भूदल, हवाईदल आणि नौदल तीनही सेना जगात चीनखालोखाल सक्षम आणि उच्च दर्जाच्या असल्यामुळे पाकिस्तान सन्याला जशास तसे उत्तर देणे कठीण नाही. उलट असे उत्तर एकदाच मिळणे गरजेचे आहे.
केंद्रातील यूपीए सरकारच्या मवाळ धोरणामुळे सीमेवर तनात असलेल्या जवानाचे मनोबल अशा घटनेमुळे खचू शकते, यात तिळमात्र शंका नाही.
–    सुजित ठमके, पुणे</p>

इतिहासाचा
‘संदर्भग्रंथ’
 हरपला..
इतिहास संशोधक ब्रह्मानंद देशपांडे यांच्या निधनाचे वृत्त (लोकसत्ता, ७ ऑगस्ट) वाचून दु:ख झाले. मी त्यांना ‘केसरी’ वृत्तपत्राच्या कार्यालयात दीड वर्षांपूर्वी भेटलो होतो. ‘केसरी’ने महानुभाव पंथीयांवर लिहिलेला एक जुना अग्रलेख ते शोधत होते. मीही पुस्तकांसाठी  केसरीवाडय़ात आलो होतो. देशपांडे यांनी माझ्या हातातले रोमिला थापर यांचे ‘अर्ली इंडिया’ पाहून मला विचारले, आपण काय करता? आणि हे पुस्तक का वाचताय? मी उत्तर दिल्यावर त्यांनी मला धडाधड अनेक संदर्भग्रंथांची सूची दिली. मी त्यांना परिचय विचारला आणि समोर जणू इतिहासाचा चालताबोलता संदर्भग्रंथ पाहून भारावून गेलो. याच भेटीत, वाडय़ाबाहेर आणखी गप्पा झाल्या. मी खान्देशचा आहे हे ऐकून त्यांनी मला खान्देशाबद्दल सांगायला सुरुवात केली. खान्देशाबद्दल मी (स्पर्धा परीक्षेला इतिहास घेतला असून) कधीही ऐकू शकलो नव्हतो असा मुघलकालीन आणि यादवकालीन इतिहास त्यांनी पुढच्या अध्र्या तासात ऐकवला.
त्यांच्या साहित्याच्या निर्मितीत मदतीसाठी ते संस्कृत लिहितावाचता येणारा आणि इतिहासात रस असलेला मदतनीस शोधात आहेत आणि तो मिळवणे कसे कठीण आहे, ही खंतही त्यांनी बोलून दाखवली. ही भेट माझ्यासाठी अविस्मरणीय होती. देशपांडे यांना भेटण्याचे नंतर अनेक वेळा योजिले, पण भेट झाली नाही याची सल आता आयुष्यभर राहील.
 इतिहासाचा एक सच्चा अभ्यासक आपण गमावला आहे. इतिहास आणि ऐतिहासिक ठेव्यांबद्दल जागरूकता आणि ऐतिहासिक साहित्याच्या संवर्धनासाठी प्रयत्न, ही त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल.
–    केतनकुमार पाटील, पुणे.