लॉरेन बॅकॉल यांच्या रूपाने हॉलीवूडच्या सुवर्णकाळातील सौंदर्यसम्राज्ञी काळाच्या पडद्याआड गेली आहे. बोगार्ट यांच्याशी नंतर तिने विवाह केला. १९४४ मध्ये  पहिल्या चित्रपटापासून त्यांचे सूत जुळत गेले होते. हॉलीवूडमध्ये गाजलेल्या विवाहांमध्ये बॅकॉल व बोगार्ट यांच्या विवाहाची चर्चाही त्या वेळी झाली. ‘हॅव अँड हॅव नॉट’ व ‘द बिग स्लीप’ या चित्रपटांतील तिच्या भूमिका गाजल्या. अर्थात या बऱ्याच विस्तीर्ण कारकिर्दीत तिला दोन टोनी पुरस्कार व एक विशेष ऑस्कर मिळाले. हॉलीवूडमधील जुन्या फॅशनच्या ज्या अभिनेत्री होत्या त्यांच्यात तिची गणना होत असे. बॅकॉल जोडप्याने हॉलिवूड चित्रपटांना एक वेगळा बाज प्राप्त करून दिला होता. आपल्यातील सर्वोत्तम अभिनय तिने पडद्यावर साकार करण्यासाठी जिवाचे रान केले.
बॅकॉलचा जन्म १६ सप्टेंबर १९२४ मध्ये ब्राँक्स येथे झाला. त्या वेळी तिचे नाव बेटी जोन पेरस्के असे होते. तिने ७२ चित्रपट केले व नंतर मॉडेलिंगही केले. नाटकांतही तिने भूमिका केल्या. त्या काळात फॅशन मॉडेल म्हणून काम करीत असतानाच ती चित्रपटाकडे वळली. नंतर हॉलीवूड तिला खुणावत राहिले. ‘टू हॅव अँड हॅव नॉट’ या पहिल्याच चित्रपटात तिने सर्वाची मने जिंकली. हनुवटी खाली, डोळे उंचावलेले अशा थाटात तिने जो लुक दिला होता त्यावरून तिला द लुक असे टोपणनावही पडले होते. द बिग स्लीप     (१९४६) व डार्क पॅसेज (१९४७) हे तिचे पुढील दोन चित्रपट होते. पन्नास वर्षे तिने चित्रपटसृष्टी गाजवली. १९९६ मध्ये तिला ऑस्करसाठी ‘द मिरर हॅज टू फेसेस’ या चित्रपटासाठी नामांकन मिळाले होते. नोव्हेंबर २००९ मध्ये तिला विशेष ऑस्कर पुरस्कार प्रदान करण्यात आला. तिची दूरचित्रवाणी कारकीर्द स्पष्टवक्तेपणामुळे व त्याला विनोदाची जोड यामुळे गाजली.
१९७९ मध्ये तिने ‘बाय मायसेल्फ’ हे आत्मचरित्र लिहिले. नंतर तिने त्याची सुधारित आवृत्ती ‘बाय मायसेल्फ अँड देन’ लिहिली. चित्रपटातील कारकीर्द उतरणीला लागताच तिने रंगभूमीकडे पावले वळवली. ‘कॅक्टस फ्लॉवर’ या विनोदी नाटकाने तिला १९७० मध्ये पहिला टोनी पुरस्कार मिळवून दिला. १९८१ मध्ये ‘वुमन ऑफ द इयर’ या नाटकासाठी दुसरा टोनी पुरस्कार मिळाला. कॅथरिन हेपबर्नला ती आदर्श मानत असे. आपल्या प्रतिमेचा कधी बाजार मांडून पैसा कमावू नये हा बोगार्टचा वारसा तिने जपला. अमेरिकन चित्रपट संस्थेने जी संस्मरणीय नावे काढली त्यात तिचा विसावा क्रमांक होता. हंफ्रे बोगार्ट मात्र पहिल्या क्रमांकावर होता. अभिनेते जॅसन रोबार्डस ज्युनियर यांच्याशी तिने विवाह केला. नंतर घटस्फोटही झाला. त्यांचे वर्णन करण्यासाठी शब्दरत्नांचे भांडारही अपुरे पडेल असे ‘द वॉल स्ट्रीट जर्नल’च्या एका समीक्षकाने म्हटले होते.