21 October 2020

News Flash

प्रज्ञानाचे प्रेम

ज्ञान-अज्ञानाच्या सीमांचा अभ्यास करणाऱ्या, नैतिक बंधनांचा आग्रह का महत्त्वाचा आहे हे बदलत्या परिस्थितीत पुन्हापुन्हा स्पष्ट करून सांगणाऱ्या आणि विचार व कृती यांचा संबंध बुद्धी

| April 3, 2014 01:06 am

ज्ञान-अज्ञानाच्या सीमांचा अभ्यास करणाऱ्या, नैतिक बंधनांचा आग्रह का महत्त्वाचा आहे हे बदलत्या परिस्थितीत पुन्हापुन्हा स्पष्ट करून सांगणाऱ्या आणि विचार व कृती यांचा संबंध बुद्धी, आकलन, सामान्य धारणा व  अंतर्दृष्टी यांच्याशी कसा आहे हे पडताळणाऱ्या शास्त्राचा ‘प्रेमा’शी काय संबंध, हे कळले की ‘फिलॉसॉफी’हा शब्द परका वाटत नाही..  
‘तत्त्वज्ञान’ असे ज्याचे भाषांतर केले जाते, त्या इंग्लिशमधील Philosophy या संज्ञेचा उगम प्राचीन ग्रीक विचारात आहे. Philosophy हा शब्द  Philo + Sophia असा समासातून बनतो. Philo म्हणजे Love आणि Sophia म्हणजे शहाणपण. म्हणून Love of Wisdom = Philosophy. मराठीत ‘शहाणपणाचे प्रेम’ म्हणू. आणि Philosopher = Lover  of Wisdom – ‘शहाणपणाचा  प्रेमिक.’ ‘शहाणपण’ या शब्दासाठी ‘प्रज्ञान’ हा शब्द उपयोगात आणू.  
काही जणांच्या मते मूळ ग्रीक शब्द philosophie असा असून तो इंग्लिशमध्ये Philosophy असा बनला आणि फ्रेंच भाषेत philosophie असाच राहिला. प्रबोधनकालीन फ्रेंच विचारवंतांसाठी philosophe असा वापरला गेला. बाराव्या शतकात filosofie असाही शब्द प्रचलित होता. नवव्या शतकानंतर अरबी जगतात ग्रीक तत्त्वज्ञानाचा; अ‍ॅरिस्टॉटलचा प्रवेश झाला. तेव्हा अरबी भाषेत philosophie चा उच्चारों’Falsafa असा झाला. falasifa हे त्याचे भाषांतर. अरबी भाषेत The Philosopher म्हणजे फक्त अ‍ॅरिस्टॉटल, हे मत आजही कायम आहे.
Philosopher आणि Philosophy हे शब्द पायथागोरसने (इ.स.पू. ५७० ते ४९५ अंदाजे) शोधले. त्याचे शिष्य हेरॉक्लीडस, पाँटिकस, डायोजिनीस लॉरेटियस यांच्या लेखनात हे उल्लेख आहेत, असे सिसिरो हा (इ.स.पू. १०६-४३) हा इतिहासकार, तत्त्ववेत्ता म्हणतो. पण प्रज्ञानाचे प्रेम या अर्थाने  Philosophein हा शब्द पायथागोरसच्या आधी सर्वप्रथम अथेन्सचा राजकारणी धुरंधर नेता पेरिक्लीस (इ.स.पू. ४९३ ते ४२९) याने वापरल्याचे युसिडीसिस (इ.स.पू. ४४३..) या ग्रीक इतिहासकाराचे म्हणणे आहे. त्याच अर्थाने Philosophia  हाही शब्द उपयोगात आणला गेला, असे अभिजात प्राचीनकालाचे इतिहासकार व प्राचीन ग्रीसचे अभ्यासक विद्यमान अमेरिकन तत्त्ववेत्ता रॉबिन ओस्बर्न (१९५७–) यांचे मत आहे.   
पायथागोरसने Philosophy = Love of Wisdom असे समीकरण करण्यामागे एक कारण होते. त्या काळातील ऑलिम्पियाड स्पध्रेत भाग घेण्यासाठी येणाऱ्यांचे तीन प्रकार पायथागोरसने केले. नफाप्रेमी व्यापारी लोक (निम्न दर्जाचे), सन्मानप्रेमी स्पर्धक लोक (मध्यम दर्जाचे) आणि प्रज्ञानप्रेमी प्रेक्षक, साक्षीलोक (उच्च दर्जाचे). पशासाठी जगणाऱ्या आणि त्यासाठी जीवघेणी स्पर्धा करणाऱ्या माणसांच्या जगाकडे व बदलत्या विश्वाच्या पसाऱ्याकडे तटस्थतेने पाहणाऱ्या साक्षी प्रेक्षकाला पायथागोरस Philosopher म्हणतो. त्यांना जाणवणारे प्रज्ञान दैवी असते.  
व्युत्पत्ती पाहता, ‘प्रेम’ या कृतीबाबत फार शंका उरत नाही, कारण ती एक भावनिक बाब आहे. प्रश्न उपस्थित होतो तो kwisdoml (Sophia) ची व्याख्या कशी आणि कुणी करायची याबाबत. (कोणत्याही संस्कृतीत खरे तर इथूनच सत्तेचे राजकारण सुरू होते.)
ग्रीकांच्या मते ‘प्रज्ञान’चे दोन अर्थ. दैवी प्रज्ञान आणि मानवी प्रज्ञान. दैवी प्रज्ञान याचा अर्थ ईश्वराचे प्रज्ञान. हे विश्व प्रचंड, अवाढव्य असून त्यातील नियम, ही ईश्वरी निर्मिती आहे. विश्वात एक अंतर्गत सुसंगती, सुमेळ आहे. विश्वाचे स्वरूप गणिती आहे. विश्वाची रचना, निर्मिती पाहता त्यासाठी आवश्यक असणारे गुण व क्षमता केवळ ईश्वरातच असू शकते. सर्वज्ञ, सर्वशक्तिमान, सम्राट, निर्मिक, चतन्यमय, उदात्त स्वरूप हेच ईश्वराचे प्रज्ञान आहे.
‘प्रज्ञान’ मिळविण्याची क्षमता माणसात नसते. प्रज्ञान हा दैवी गुण असल्याने माणूस प्रज्ञानी असत नाही आणि ईश्वरासह विश्वाची अंतिम सत्ये भव्य असून त्याची ज्ञानप्राप्ती करून घेणे माणसाला शक्य नाही. मग माणूस काय मूर्ख आहे काय? ग्रीकांच्या मते माणूसही प्रज्ञानी आहे, पण त्याचे स्वरूप वेगळे आहे.
मानवी प्रज्ञानाचे स्वरूप स्पष्ट करताना ग्रीकांनी प्रज्ञान आणि बुद्धिमत्ता (Wisdom & Intelligence) यात फरक केला. बुद्धिमान माणूस चालता बोलता विश्वकोश असेल पण तो प्रज्ञानी असेल असे नाही. प्रज्ञानी असणे म्हणजे नीतिमान असणे. बुद्धिमान असूनही एखादा माणूस दुष्ट असू शकतो. उलट तो अत्यंत पद्धतशीरपणे दुष्टपणा करतो. प्रज्ञानी माणूस बुद्धिमान असतोच, पण तो नीतिमानही असतो. नीती ही प्रज्ञानाची अट असते. परिणामी एखादा निरक्षरही प्रज्ञानी असू शकतो. सॉक्रेटिस, रामकृष्ण परमहंस, गाडगेबाबा, तुकडोजी महाराज, बहिणाबाई.        
मानवी प्रज्ञानाचे स्वरूप काय? मानवी प्रज्ञान दोन रीतींचे आहे. पहिली रीत : स्वत:च्या ज्ञानाची मर्यादा जाणणे. माणसाच्या क्षमतांच्या तुलनेत ईश्वर, विश्व व विश्वातील नियम, घटना याबाबतचे त्याचे ज्ञान मर्यादित आहे. त्यात जन्ममृत्यूच्या अज्ञानाची भर आहे. तेव्हा अज्ञानाचे ज्ञान ही मर्यादा कबूल करण्याची विनम्रता हेच माणसाच्या प्रज्ञानी असण्याचे प्रसादचिन्ह आहे. हे भान असणारे ते खरे प्रज्ञानाचे प्रेमिक असतात. या अर्थाने ग्रीक परंपरेतील पहिला प्रज्ञान प्रेमिक म्हणजे थेल्स (इ.स.पू. ६२४  ते ५४६).
ही भूमिका नंतर सॉक्रेटिसने अधिकृत बनविली. तो म्हणतो ‘मी असा विचार करीत नाही, की जे मला माहीत नाही, ते मला माहीत आहे’ (do not think, that I know ; what I do not know ) वेगळ्या भाषेत ग्रीकांच्या मते प्रज्ञानाचा पहिला विषय ‘अज्ञान’ हाच असला पाहिजे.  
दुसरी रीत : प्राचीन ग्रीकांसाठी प्रज्ञान म्हणजे सद्गुण. प्रज्ञानाचे प्रेम म्हणजे सद्गुणांचे प्रेम हा अर्थ सॉक्रेटिस आणि प्लेटो यांनी उपयोगात आणला. न्याय, शहाणपण, धर्य आणि संयम हे चार प्रमुख पायाभूत (काíडनल व्हच्र्यु) पारंपरिक ग्रीक सद्गुण सत्ताधिकाऱ्यांत असले पाहिजेत, असे नतिक बंधन प्लेटो घालून देतो. अ‍ॅरिस्टॉटल मात्र घटनेचे कारण जाणणे या वैज्ञानिक अर्थाने प्रज्ञान हा शब्द वापरतो.
सोळाव्या शतकापासून वैज्ञानिक क्रांती आणि औद्योगिक क्रांतीनंतर तत्त्वज्ञानाच्या संकल्पना बदलत राहिल्या. अनेक तत्त्ववेत्त्यांनी आणि तात्त्विक विचारप्रणालींनी आपआपल्या काळाशी सुसंगत अर्थ देण्याचा प्रयत्न केला. प्रस्तुत ग्रीक अर्थानुसार ईश्वरास अस्तित्व आहे, पण अनेक निरीश्वरवाद्यांनीही आपापल्या व्याख्या केल्या. ज्ञान, अनुभव, आकलन, सामान्य धारणा आणि अंतर्दृष्टी यांचा उपयोग करून विचार करण्याची आणि कृती करण्याची क्षमता, ज्ञानाची चिकित्सा, तर्कशुद्ध मांडणी, समर्थन आणि विचारातील खुलेपणा हा विसाव्या शतकातील ‘प्रज्ञान’चा अर्थ आहे.
प्रज्ञान म्हणजे ‘ज्ञानाची र्सवकष ताíकक चिकित्सा’ या अर्थाशी आणि प्लेटोच्या सद्गुण संकल्पनेशी जुळणारी प्राचीन भारतीय संकल्पना म्हणजे ‘आन्वीक्षिकी विद्या.’ आचार्य कौटिल्याने (इ.स.पू. ३७५ – २२५ अंदाजे) ‘अर्थशास्त्र’ या प्राचीन ग्रंथात हिचे (अध्याय २.१ : विद्यासमुद्देश) स्वरूप स्पष्ट केले आहे. आन्वीक्षिकी, त्रयी (तीन वेदांचे ज्ञान), वार्ता (शेती, व्यापार) आणि दंडनीती (प्रशासन) अशा चार विद्यांचा उल्लेख करतो. आन्वीक्षिकी म्हणजे सांख्य, योग आणि लोकायत ही तीन दर्शने. सर्व विद्यांना मार्गदर्शक असणारी ही विद्या आहे, असे आचार्य स्पष्ट करतात!        
विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात ‘प्रज्ञान’चे अर्थ कोणते? या प्रश्नाचे उत्तर कठीण आहे. तरीही उत्तर-आधुनिकतेची (postmodernity) जाणीव असे एक उत्तर देता येईल. अर्थात कोणती उत्तर-आधुनिकता, हे निश्चित करावे लागेल. चित्रकलेच्या प्रांतात शमन आर्ट्स (shamanarts) या कलापंथाची उद्गाती ज्युडी गार्डनर (Judy Gardner) ‘उत्तर-उत्तर-उत्तर- आधुनिकतेचा जाहीरनामा’ मांडू पाहते. एम. एफ. हुसेन भारताबाहेर मरण पावतो आणि त्याचा मृतदेह मायभूमीत त्याच्या जन्मगावी पंढरपुरी आणता येत नाही, ही आधुनिक मुक्त विचारांची भारतीय उत्तर-आधुनिक शोकांतिका ठरते. अर्थात, भारतीय विचारविश्वाने आधुनिकताही अद्यापि धडपणे व्यक्तिगत आणि सामाजिक-राजकीय जीवनात आणलेली नाही. त्यामुळे शोकांतिका असण्यातही आपणास बरीच प्रगती करावयाची आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 3, 2014 1:06 am

Web Title: love of philosophy
टॅग Philosophy
Next Stories
1 तत्त्वज्ञान, ब्रह्मज्ञान आणि दर्शन
2 भारतीय विज्ञान व वैज्ञानिक पद्धती!
3 वैज्ञानिक पद्धतीचा उदय
Just Now!
X