नागरी विमानसेवा महासंचालनालयाच्या- म्हणजेच देशातील सर्व विमानतळ, विमानसेवांचे व्यवहार आणि त्यांची तांत्रिक क्षमता यांना मंजुरी देणे व त्यांच्यावर वचकवजा देखरेख ठेवणे हे काम करणाऱ्या ‘डीजीसीए’च्या प्रमुखपदी एकाही महिलेची नियुक्ती आजवर झाली नव्हती. या महत्त्वाच्या खुर्चीपर्यंत पोहोचणार असलेल्या एम. सत्यवती या पहिल्याच महिला अधिकारी ठरल्या आहेत.
 सत्यवती यांनी गणित, भौतिकशास्त्र आणि सांख्यिकी या विषयांतून पदवी आणि गणिताची पदव्युत्तर पदवी घेतली आणि भारतीय प्रशासकीय सेवेत (आयएएस) १९८२ साली केंद्रशासित प्रदेश केडरमध्ये त्या दाखल झाल्या. या केडरला ‘अरुणाचल प्रदेश, गोवा, मिझोरम व केंद्रशासित प्रदेश’ (एजीएमयूटी) असे म्हटले जाते आणि या तीनही राज्यांत सत्यवती यांनी विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत. अधिकारपद मिळाल्यानंतर १९८४ ते १९८८ या पहिल्या चार वर्षांचा काळ त्यांनी पुडुचेरीत (त्या वेळचे पाँडिचेरी) घालविला, तर चौथ्याच वर्षी अरुणाचल प्रदेशात त्यांची बदली झाली. तेथून थेट १९९५ केंद्र सरकारात त्यांना प्रतिनियुक्ती मिळाली. केंद्रीय वाणिज्य खात्यात संयुक्त सचिव म्हणून, तर पुढे याच खात्याशी संलग्न ‘परदेशी व्यापार संचालनालया’च्या संयुक्त संचालक म्हणून त्यांनी काम केले. २००० मध्ये त्या पुन्हा पुडुचेरीत आल्या, पण पाच वर्षांसाठीच. एप्रिल २००५ मध्ये त्यांना मिळालेली प्रतिनियुक्ती ‘इस्रो’ उपग्रह केंद्राच्या नियंत्रक (कंट्रोलर) अशी होती. बेंगळुरूमधील दोन वर्षांच्या कारकिर्दीनंतर पुन्हा त्याच शहरात, केंद्रीय रेशीम संचालनालयात त्यांना सदस्य-सचिव हे पद मिळाले. तिथून मिझोरममार्गे पुन्हा पुडुचेरीत आणि मग दिल्लीच्या राजीव गांधी भवनात, असा त्यांचा प्रवास झाला आहे.  ‘डीजीसीए’च्या महासंचालकपदाचीच सूत्रे त्या हाती घेणार असल्याने या पदासोबत येणारी डोकेदुखीही आता त्यांच्यामागे असेल. अमेरिकी ‘फेडरल एव्हिएशन अ‍ॅडमिनिस्ट्रेशन’ या डीजीसीए- समकक्ष यंत्रणेने भारतीय विमानतळ व हवाई वाहतुकीचा सुरक्षा दर्जा घटवून ‘दोन’ केला. बांगलादेश, निकाराग्वा, बार्बाडोस आदी अविकसित देशांतील विमान-सुरक्षेला अमेरिकेने दिलेला दर्जाच आता भारतालाही आहे. ही मानहानी भारताचे आर्थिक नुकसानही करणारी ठरू शकते, म्हणून ती निस्तरावी लागेल. हे आव्हान सर्वात मोठे आहेच, परंतु खासगी विमानसेवांच्या सुरक्षेचा आणि आर्थिक प्रकृतीचा प्रश्न उभा राहिलेला असताना नव्या तब्बल पाच कंपन्या नव्याने विमानसेवा सुरू करण्यास इच्छुक आहेत, ही परिस्थितीदेखील सत्यवती यांना हाताळावी लागेल.

LinkedIn, top companies, india
वित्तीय, तंत्रज्ञान क्षेत्राची आघाडी; लिंक्डइनकडून देशातील मोठ्या २५ कंपन्यांची यादी जाहीर
pune ola uber marathi news
ओला, उबरचे काय होणार? जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्णयाविरोधात लवादाकडे धाव
pilots missing What happened to Vistara
३८ हून अधिक उड्डाणे रद्द, तासभराचा उशीर, वैमानिक गायब; ‘विस्तारा’चं काय बिनसलं?
serious allegations against boeing
अन्वयार्थ : बडयांवर बडग्याची बाजारकेंद्री ‘संस्कृती’