24 September 2020

News Flash

पत्रकाराला ‘हटवणे’ सोपे..

उत्तर प्रदेशातील पत्रकाराच्या हत्येचे प्रकरण गाजत असतानाच शेजारच्या मध्य प्रदेशातील एका पत्रकाराचा मृतदेह नागपूरजवळ सापडणे व तो अत्यंत क्रूरपणे केलेला खून असल्याचे तपासात निष्पन्न होणे,

| June 23, 2015 12:58 pm

उत्तर प्रदेशातील पत्रकाराच्या हत्येचे प्रकरण गाजत असतानाच शेजारच्या मध्य प्रदेशातील एका पत्रकाराचा मृतदेह नागपूरजवळ सापडणे व तो अत्यंत क्रूरपणे केलेला खून असल्याचे तपासात निष्पन्न होणे, हे माध्यमांच्या वर्तुळात अस्वस्थता निर्माण करणारे आहे. सत्तेचा वापर करून अवैध धंदे करणाऱ्यांना बळ देणे व त्या विरोधात आवाज उठवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांचा गळा घोटणे, हेच सूत्र या दोन्ही घटनांमागे असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. संदीप कोठारी हा बालाघाटचा पत्रकार काही वर्षांपासून वाळूमाफियांविरुद्ध लिहीत असल्याने अस्वस्थ झालेल्या या माफियांनी त्यालाच गुन्हेगार ठरवण्याचा प्रयत्न केला. एका महिलेला समोर करून या कोठारीविरुद्ध मध्य प्रदेशात एक व महाराष्ट्रात दोन, असे तीन बलात्काराचे गुन्हे नोंदविण्यात आले. त्यापैकी दोन आरोपांत पोलिसांना तथ्य आढळले नाही. एवढा त्रास देऊनही हा पत्रकार ऐकत नाही, हे स्पष्ट झाल्यानंतर मध्य प्रदेशात ठार मारण्यात आले व महाराष्ट्रात आणून त्याचा मृतदेह जाळण्याचा प्रयत्न झाला. अंगावर शहारे आणणाऱ्या या प्रकारावरून या माफियांची मजल कुठवर गेली आहे, हेच दिसते. आता या प्रकरणातही मध्य प्रदेशातील सत्ताधाऱ्यांच्या वर्तुळातून हा पत्रकारच कसा गुन्हेगारी प्रवृत्तीचा होता, आरोपींशी त्याचे संगनमत कसे होते, यावर जाणीवपूर्वक चर्चा घडवून आणली जात आहे. या चर्चेत अजिबात तथ्य नसेल, असा दावा आज करता येत नाही. पण अशा चर्चेतून सत्ताधारी, प्रशासकीय वर्तुळ व वाळूमाफियांच्या कारवायांवर पडलेला प्रकाशझोत कसा दूर नेत आहेत, यावरही विचार होणे गरजेचे आहे. राज्याचे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे हेच वाळूमाफियांना अभय देत असल्याचे प्रकरण आठ दिवसांपूर्वी समोर आले असता बावनकुळे यांनी लगेच याचा इन्कार केला आणि मुख्यमंत्र्यांसह सारे त्यांच्या बचावासाठी समोर आले. असे असले तरी याच मुद्दय़ावरून संबंधित मंत्र्यांचे प्रशासनातील अधिकाऱ्यांशी बिनसले. त्यातूनच जिल्हाधिकाऱ्यांची मुदतपूर्व बदली झाली, ही बाब लपून राहिलेली नाही. सत्ताकारण अथवा राजकारणात सक्रिय असलेल्या अनेकांसाठी इतर कोणत्याही खनिजापेक्षा वाळू हाच आज परवलीचा शब्द झाला आहे. याच वाळूच्या अवैध उपशाच्या बळावर श्रीमंत झालेले हे नेते, त्यांना मदत करणारे प्रशासन, अशी साखळीच महाराष्ट्र व मध्य प्रदेशच्या सीमावर्ती भागात तयार झाली आहे. बालाघाट, नागपूर, भंडारा या एकमेकांना लागून असलेल्या जिल्ह्य़ांमध्ये नदी, नाले भरपूर आहेत. त्यामुळे वाळू सहज उपलब्ध आहे. त्याचा वैध आणि अवैध मार्गाने व्यापार हेच राजकारण्यांच्या व्यवसायाचे सूत्र राहिलेले आहे. त्याच्या आड येणाऱ्यांना हटवणे व त्यासाठी कोणत्याही थराला जाणे, हेच या घटनाक्रमातून दिसून आले आहे. वाळूच्या या व्यापाराला अधिकाऱ्यांनी विरोध केला तर त्याला बदलता येते, पण पत्रकाराने विरोध केला आणि प्रलोभने दाखवूनही तो बधला नाही तर त्याचे काय करायचे, या प्रश्नाचे उत्तर आणि कोणतेही कायदेशीर संरक्षण नसलेला या चौथ्या स्तंभाचा प्रतिनिधी मार्गातून हटवणे तुलनेने फारच सोपे आहे, हेही या घटनेतून दिसून आले आहे. पत्रकाराच्या हत्या प्रकरणात अडकलेल्या आरोपींचे राजकीय लागेबांधे असल्याचे आता समोर येत आहे. राज्य कोणतेही असले तरी वाळूमाफियांची सत्ताकारणातील घुसखोरी किती खोलवर पसरली आहे, हेच यातून स्पष्ट झाले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 23, 2015 12:58 pm

Web Title: madhya pradesh journalist set afire
Next Stories
1 ‘दारु’ण वास्तवाचे बळी..
2 पर्रिकरांचा मौनराग
3 निर्यात-लकव्याचे लख्ख संकेत
Just Now!
X