सूत्रधार मोकळेच राहतात, शिक्षा होते ती फार तर मारेकऱ्यांना. हा अनुभव अनेकदा या राज्याने घेतला आहे आणि त्यामागे राजकारण नाहीच, असे म्हणता येत नाही. दत्ता सामंत यांच्या हत्येनंतर झालेला महत्त्वाचा निर्णय,  शिवसेना-भाजप युतीच्या काळात झालेली पुतळा विटंबना आणि त्यानंतरचा पोलीस गोळीबार, अशा घटनांचे गौडबंगाल कायम राहू शकते, कारण हत्येमागचे किंवा विटंबनेमागचे सूत्रधार मोकळे राहू शकतात. हेच दाभोलकर आणि पानसरे यांच्या हत्यांबाबत घडणार का?

महाराष्ट्रातील भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते, विचारवंत, एक विचारधारा स्वीकारून, एक भूमिका घेऊन केवळ स्वत:साठी नव्हे, तर जनचळवळीसाठी जगणारे, झटणारे, संघर्ष करणारे कॉ. गोविंद पानसरे यांचा खून करण्यात आला. महाराष्ट्राला धक्का देणाऱ्या आजवर ज्या काही घटना घडल्या, त्यापैकी पानसरे यांच्या खुनाची घटना म्हणता येईल. पानसरे यांचे मारेकरी सापडलेले नाहीत. या घटनेने महाराष्ट्रात कायदा व सुव्यवस्था शिल्लक आहे का आणि प्रवाहाच्या विरोधी जाऊन परिवर्तनाच्या चळवळी करायच्या की नाही, असे दोन प्रश्न निर्माण झाले आहेत आणि तिसरा व अत्यंत महत्त्वाचा आणि त्याचा सोक्षमोक्ष लावला नाही, तर भविष्यात महाराष्ट्राला अराजकतेकडे घेऊन जाणारा प्रश्न म्हणजे, अशा घटनांमागील कारणे, कट-कारस्थाने आणि त्याचे सूत्रधार पुढे आणणार की नाही?
गोविंद पानसरे यांच्या हत्येनंतर महाराष्ट्रातील वैचारिक संघर्षांबद्दल पुन्हा चर्चा सुरू झाली आहे. अभिव्यक्तिस्वातंत्र्य, विचारस्वातंत्र्य याबद्दलही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जाऊ लागले आहे. पानसरे जे काही विचार मांडत होते, ते त्यांनी अगदी
काल-परवा मांडायला सुरुवात केली आणि त्यामुळे कुणाच्या तरी भावना दुखावल्या, तळपायाची आग मस्तकात गेली आणि भररस्त्यात गाठून पानसरे यांच्यावर गोळ्या झाडल्या, त्यांचा खून केला, असे काही घडले का? मारण्याची आणि मारेकऱ्यांची पद्धत फार वेगळी होती. त्यामागे एक नियोजन आहे, त्याचा शोध पोलिसांना घ्यायचा आहे; परंतु गोविंद पानसरे म्हणून जे एक व्यक्तिमत्त्व लोकांसमोर होते ते एक बंडखोर विचारवंत म्हणून होते. त्यांची बंडखोरी ज्यांना पटली नाही, त्यांनी त्यांना कायमचे संपवले का, असा एक भीतीदायी प्रश्न उपस्थित केला जात आहे. हा प्रश्न अनेकांना पटणारा असल्यामुळे त्यातून पुढे- कुणी वेगळा विचार करायचा की नाही, विचार मांडायचे की नाही, विचार मांडण्याचे स्वातंत्र्य राहणार की नाही, असे असंख्य प्रश्न पुढे आले आहेत आणि आजच्या घडीला ते अस्थानी आहेत, असे म्हणता येणार नाही.
आता इथे खरी कसोटी तपास यंत्रणेची म्हणजे पोलिसांची आहे, परंतु पानसरे यांच्या मारेकऱ्यांचा अजून मागमूस लागलेला नाही. मारेकऱ्यांची माहिती देणाऱ्यांना पोलिसांनी बक्षीसही जाहीर केले आहे. पोलिसांची त्यापेक्षा मोठी जबाबदारी आहे. हा देश, देशातील सरकार, राज्य, त्यांतील सरकार संविधानावर चालते. भारतात लोकशाही आहे आणि कायद्याचे राज्य आहे. संविधानाने बहाल केलेल्या नागरिकांच्या मूलभूत हक्कांचे संरक्षण करण्याची जबाबदारी शासन व्यवस्थेची आणि त्या व्यवस्थेचा अविभाज्य भाग असलेल्या पोलीस यंत्रणेची आहे. महाराष्ट्रात अशा काही यापूर्वी समाजमनाला धक्का देणाऱ्या घटना घडल्या आहेत. त्याचा शोध अजून लागलेला नाही. ते गूढ अजून उकललेले नाही. गोविंद पानसरे यांची हत्या आणि त्यानंतर पोलिसांची अद्याप तरी तपासाबाबत जी उदासीनता दिसत आहे, त्यावरून पानसरे यांच्याही हत्येचे गूढ तसेच राहील की काय, अशी शंका येऊ लागली आहे.
महाराष्ट्रातील एक लढाऊ कामगार नेते डॉ. दत्ता सामंत यांचा १६ जानेवारी १९९७ रोजी भररस्त्यात गोळ्या घालून खून करण्यात आला. दत्ता सामंत यांच्या कार्यशैलीबद्दल हजार मतभेद होते; परंतु त्यांच्या हत्येचे समर्थन करता येणार नाही, कुणी केलेही नाही. सामंतांवर गोळ्या झाडणाऱ्या सुपारी मारेकऱ्यांना अटक झाली, काही पुराव्याअभावी सुटले, काहींना शिक्षा झाली, त्यापैकीही कुणी एक जण पोलीस चकमकीत मारला गेला. जे आरोपी पकडले ते एक-दोन गुन्हेगारी टोळींशी संबंधित होते. त्यांचे आणि दत्ता सामंतांचे वैर कशासाठी होते? त्यांनी त्यांना का मारले? दत्ता सामंत खून प्रकरण आता संपले आहे, असे म्हटले जात असले तरी काही प्रश्न शिल्लक राहिले आहेत. सामंतांच्या हत्येनंतर राज्य शासनाने विकास नियंत्रण नियमावलीत बदल करून पुनर्विकासाच्या नावाखाली गिरण्यांच्या जमिनी विकायला परवानगी दिली. पुढे कारखान्यांच्या जमिनीबाबतही हेच धोरण स्वीकारण्यात आले. हे लगेच असे का घडले? त्याच वेळी कामगार संघटनांमध्येही मोठा िहसक संघर्ष उभा राहिला होता. सामंतांना गोळ्या घालणारे पकडले, परंतु त्यांना हे कृत्य करायला सांगितले कुणी? त्यामागचा हेतू काय होता? पोलिसांनी मुळापर्यंत जाण्याचे का टाळले? त्यामुळे कुणी अडचणीत येणार होते का? अडचणीत येणाऱ्यांचा पोलिसांवर दबाव होता का? याची उत्तरे अजून मिळालेली नाहीत. मुख्य गुन्हेगाराला सोडून दिले हा पोलिसांनी केलेला सामाजिक अपराध आहे, असे म्हणावे लागेल.
त्याच वर्षांत मुंबईतच घाटकोपर येथील रमाबाई आंबेडकर नगरमध्ये ११ जुलै १९९७ला दुसरी, पण वेगळी घटना घडली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या विटंबनेवरून आंबेडकरी समाजात उद्रेक झाला, पोलिसांनी गोळीबार केला, त्यात दहा जण ठार झाले. त्याचे राज्यभर आणि देशाच्या काही भागांत तीव्र पडसाद उमटले. चौकशीसाठी न्या. गुंडेवार आयोग नेमला गेला. गोळीबाराचा आदेश देणारे फौजदार मनोहर कदम यांना मुख्य आरोपी करण्यात आले, त्यांना शिक्षा झाली; परंतु पुतळ्याची विटंबना करणारा कोण? तो अद्याप पोलिसांना का सापडला नाही? पुतळ्याची विटंबनाच झाली नसती तर आंदोलन झाले नसते, गोळीबार झाला नसता, दहा जणांचे बळी गेले नसते. मग ही सारी अनर्थाची मालिका घडली त्यामागचा सूत्रधार कोण? हे कुणाचे षड्यंत्र होते? आंबेडकरांचाच पुतळा कसा दिसला? गुपचूप विटंबना का केली? म्हणजे पुतळ्याची विटंबना करणारा कुणी माथेफिरू नव्हता, तर हे थंड डोक्याने केलेले कृत्य होते. त्याचा त्यामागे हेतू काय होता? हे सारे षड्यंत्र रचणारा कोण? हे अजून पुढे आलेले नाही किंवा आणलेले नाही. आंबेडकरी नेत्यांची कितीही गटबाजी असली, हजार प्रकारचे वाद असले, तरी त्याची जाहीर वाच्यता राजकीय मंचावरून होत असते. कधी कुणावर हल्ले केले जात नाहीत. मात्र रमाबाई नगर गोळीबार प्रकरणाच्या वेळी रिपब्लिकन नेत्यांना झालेली मारहाणही संशयास्पद होती. या प्रकरणातही सूत्रधारापर्यंत जाण्यास पोलिसांना अपयश आले असेल, तर त्याची जबाबदारी कुणावर निश्चित का केली गेली नाही? किंवा सूत्रधार कळल्यामुळे कुणी अडचणीत येणार असेल, कुणाचे तरी बिंग फुटणार असेल, कुणाचे तरी हितसंबंध दुखावले जाणार होते, म्हणून सूत्रधार अजूनपर्यंत लपवून ठेवला आहे का? तसे असेल तर पोलिसांचा हा दुसरा सामाजिक अपराध म्हणावा लागेल. दहा निरपराधांचे बळी घेणाऱ्या, एका पोलीस अधिकाऱ्याला जन्मठेपेची शिक्षा भोगावी लावणाऱ्या, सामाजिक वातावरण कलुषित करणाऱ्या षड्यंत्राचा सूत्रधार मोकाट कसा राहू शकतो?   
समाजातील अनिष्ट प्रथा-परंपरा, रूढी, अंधश्रद्धा नष्ट व्हाव्यात यासाठी आयुष्यभर प्रबोधनाची चळवळ करणाऱ्या डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचा २० ऑगस्ट २०१३ रोजी खून झाला. हा महाराष्ट्राला आणखी एक मोठा धक्का होता. १७ महिन्यांचा काळ लोटला आहे. दाभोलकरांचे मारेकरी अजून सापडलेले नाहीत. दाभोलकरांचे विचार सुधारणावादी होते. त्याचा संबंध धर्माशी येतो. धर्मसुधारणा नको असलेल्यांनी दाभोलकरांना संपवले का, असा प्रश्न उपस्थित होणे साहजिक आहे. या प्रश्नाचे उत्तर पोलिसांच्या हाती आहे. दाभोलकरांसारख्या सत्शील, विवेकी, समाजसुधारणेसाठी तळमळीने झटणाऱ्या माणसाला कुणी का बरे जिवे मारले असेल? दाभोलकरांच्या खुनामागे कोणती शक्ती आहे, कोण सूत्रधार आहे, त्यांचा हेतू काय, याचा उलगडा होणे आवश्यक आहे. दाभोलकरांच्या खुनाची घटना अजून ताजी असतानाच कम्युनिस्ट नेते गोविंद पानसरे यांची हत्या झाली. ही आणखी एक महाराष्ट्राला मोठा धक्का देणारी घटना म्हणता येईल. कामगार-कष्टकऱ्यांच्या शोषणमुक्तीचे लढे देतानाच, ‘शिवाजी कोण होता’ हे पुस्तक लिहून गोविंद पानसरे यांनी महाराष्ट्राचा मानबिंदू असलेला खराखुरा शिवाजी जनतेसमोर आणला. एका विशिष्ट धर्माच्या विरोधात किंवा समाजाच्या विरोधात शिवाजीच्या नावाचा वापर करणाऱ्यांचा बुरखा त्यांनी फाडला. पानसरे हे महाराष्ट्राच्या वैचारिक विद्रोही परंपरेतील एक अस्सल, खणखणीत मोहरा होते. त्यांच्यावर असा भ्याड हल्ला कुणी व का केला, त्यामागचे सूत्रधार कोण, त्यांचा हेतू काय, याचा उलगडा झाला पाहिजे. कटकारस्थानामागील हात लपवून ठेवण्याचा आणखी एक मोठा सामाजिक अपराध पोलिसांकडून घडू नये आणि भविष्यातील अराजकतेचा धोका टाळण्यासाठी दाभोलकर आणि पानसरे यांच्या खुनामागचे सत्य महाराष्ट्राच्या जनतेला कळले पाहिजे.  
मधु कांबळे -madhukar.kamble@expressindia.com

former Vice President M Venkaiah Naidu criticises freebies trend
पक्ष बदलला की जुन्या नेत्यांना शिव्या देणं चुकीचं: माजी उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडूंची टीका
gondia bhandara lok sabha constituency, bjp, ajit pawar ncp, office bearers, reconciliation, booth karyakartas confused, lok sabha 2024, election 2024, polling booth, mahayuti, politics news, marathi news, bhandara gondia news,
तुझं माझं जमेना, तुझ्या वाचून… गोंदिया-भंडारात भाजप–राष्ट्रवादी पदाधिकाऱ्यांचे मनोमिलन, बूथ कार्यकर्ते मात्र संभ्रमात
MP Udayanraje Bhosale reacts on being in touch with Sharad Pawar
सातारा: तुतारीचे काय, त्या आमच्या वाड्यातही वाजतात- उदयनराजे
eknath shinde
मित्रपक्षांकडून युती धर्माचे पालन नाही; शिंदे गटाच्या आमदारांकडून नाराजी; ठाणे, पालघर पक्षाकडेच ठेवण्यासाठी आग्रह