महेंद्रसिंग धोनी याचे यश दीर्घ कालासाठी टिकणार नाही असे खेळातील तज्ज्ञ म्हणवून घेणाऱ्यांचे भाकीत होते. धोनी याने ते पूर्णपणे खोटे ठरवले. राजकारणात हे मोदी यांनी केले. परंतु या दोघांतील तुलना सध्या तरी, येथेच संपते..
गतसाल लक्षात राहील ते महेंद्रच्या गमनासाठी आणि नरेंद्रच्या आगमनासाठी. एकाच वर्षांत झालेले एकाचे जाणे आणि दुसऱ्याचे येणे हे अनेक अंगांनी महत्त्वाचे असून त्या दोन्हीतील सामाजिक साधम्र्याचा अर्थ समजून घेणे आवश्यक ठरते. यातील एकाची, महेंद्रसिंग धोनी याची कसोटी कारकीर्द गतसाली संपली तर दुसऱ्याची, नरेंद्र मोदी यांची, कसोटी अद्याप सुरूही झालेली नाही. या दोघांनीही आपापल्या खेळाला वेगळे परिमाण दिले, खेळाचे नियम बदलले आणि आपण आहोत तोपर्यंत आपणच या खेळाच्या केंद्रस्थानी राहू याची खबरदारी घेतली. धोनी याने क्रिकेटमधली अलिखित जातव्यवस्था मोडली तर राजकारणातील जातपंचायत दूर करण्याचे काम मोदी यांनी केले. धोनीच्या उगमापर्यंत क्रिकेटचा प्रसार हा महानगरांपर्यंतच मर्यादित होता. या चार महानगरांतील खेळाडूंना सर्वार्थाने प्राधान्य मिळत असे. धोनी याने क्रिकेटला या महानगरीय मिजाशीतून मुक्त केले. मोदी यांच्या आगमनापर्यंत राजकारणात उच्चपदाचे स्वप्न कोणी पाहावे याचे काही अप्रत्यक्ष आडाखे होते. स्वत:च्या मागे कोणतेही घराणे, परंपरा नसताना देशातील सर्वोच्च पदावर स्थानापन्न होण्याचे ध्येय ठेवून आणि साध्य करून मोदी यांनी हे आडाखे मोडून काढले. क्रिकेट कसे खेळले जावे, कोण कशा पद्धतीने खेळल्यास यशस्वी ठरेल वा ठरणार नाही याचे काही आडाखे होते. धोनी याने आपल्या उदाहरणाने ते पार धुळीस मिळवले. धोनी यास काहीही शैली नाही, त्याच्या खेळपद्धतीचा अंदाज बांधता येत नसे आणि त्यामुळे त्याचे यश दीर्घ कालासाठी टिकणार नाही असे खेळातील तज्ज्ञ म्हणवून घेणाऱ्यांचे भाकीत होते. धोनी याने ते पूर्णपणे खोटे ठरवले. राजकारणात हे मोदी यांनी केले. परंतु या दोघांतील तुलना येथे संपते. क्रिकेट खेळाच्या सर्व प्रकारांत धोनी याने उत्तम कामगिरी केली. कसोटी, एकदिवसीय आणि छचोर ट्वेंटी-२० असे क्रिकेट सामन्यांचे तीनही प्रकार धोनी याने गाजवले. मोदी यांच्याबाबत अद्याप असे म्हणता येणार नाही. राजकारणाच्या वरवर पाहता दोन पातळ्या असतात. राज्यस्तरीय आणि केंद्रीय. यातील पहिल्या प्रकारावर मोदी यांची उत्तम पकड आहे आणि केंद्रात आले तरी त्यांच्यातील राज्यस्तरीय नेता पूर्णपणे मागे पडला आहे, असे नाही. बराच काळ ट्वेंटी-२० खेळल्यानंतर अचानक पाचदिवसीय कसोटी खेळताना क्रिकेटपटूचे जे होते ते राजकारणात मोदी यांचे झाले आहे. धोनी मात्र यास अपवाद ठरला. खेळाच्या सर्व प्रकारांत त्याने सहजसंचार केला आणि कारकीर्दीच्या शिखरावर असताना कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. अन्य काही खेळाडूंप्रमाणे तो कोणा एका विक्रमासाठी थांबला नाही. मनस्वीपणे खेळला आणि त्याच मनस्वीपणास जागत एका अनपेक्षित क्षणी त्याने कसोटी क्रिकेट त्यागाचा निर्णय जाहीर केला.
राजकारणात असा मनस्वीपणा चालत नाही. मोदी यांना अर्थातच त्याची जाणीव असणार यात शंका नाही. परंतु त्यांच्या या जाणिवेचे रूपांतर नेणिवेत होताना दिसत नसल्यामुळे मोदी यांच्या खंद्या समर्थकांच्या चेहऱ्यावरही प्रश्नचिन्हांची वर्तुळे उमटू लागली आहेत. मोदी यांच्याबाबत असलेल्या अमर्याद कुतूहलाची जागा मर्यादित का असेना पण काळजीने घेण्यास सुरुवात झाली असून आज सुरू होणारे वर्ष ही चिंता दूर करण्यासाठी मोदी यांच्यासाठी निर्णायक ठरणार आहे. गेले वर्ष मोदी यांनी सर्व अडचणींना तोंड देत मिळवलेल्या विजयाच्या कोडकौतुकात गेले. कोणतेही यश कितीही देदीप्यमान असले तरी त्याच्या प्रकाशात फार काळ राहता येत नाही. याचे कारण यशाची देखील चटक लागते आणि यशाची धुनी पेटती राहण्यासाठी त्यास यशाचीच आहुती सतत द्यावी लागते. ते थांबल्यास यशाचा अग्नी मंदावतो. मोदी यांच्याबाबत अशी वेळ येते की काय अशी शंका उद्भवू लागली असून त्यामुळे मोदी यांना आपल्याकडे केवळ स्वप्ने दाखवण्याचीच नव्हे तर ती सत्यात आणण्याची देखील क्षमता आहे हे सिद्ध करून दाखवावे लागणार आहे. स्मार्ट सिटी, मेक इन इंडिया आदी अनेक दिलखेचक घोषणा मोदी यांनी आतापर्यंत केल्या आहेत. त्यांची पूर्तता एका रात्रीत होणे अर्थातच अपेक्षित नाही. पण महालाचा आराखडा कितीही आकर्षक असला तरी तो बांधायचा असेल तर कोठे तरी सुरुवात करावीच लागते. केवळ आराखडय़ाच्या सौंदर्यावरच फार काळ समाधानी राहता येत नाही. मोदी यांच्याकडून दिरंगाई दिसते ती प्रत्यक्ष बांधकामात. त्यांच्या महालाचे आराखडे किती चोख आहेत याचा अनुभव आता घेऊन झाला आहे. जनतेस प्रतीक्षा आहे ती बांधकामाचे श्रीफळ कधी वाढवले जाणार याची. तशी ती करावयाची असेल तर आíथक आघाडीवर त्यांना काही महत्त्वाचे निर्णय घ्यावे लागतील आणि ते लोकप्रिय असतीलच असे नाही. ते घेण्याचे धाडस आपल्याकडे आहे, हे त्यांनी अद्याप तरी दाखवलेले नाही. महत्त्वाच्या आíथक सुधारणा राबवण्यासाठी अध्यादेश काढणे म्हणजे धाडस नव्हे. या अशा सुधारणांसाठी आवश्यक ते धाडस असते तर मोदी यांनी स्वत: अथवा आपल्या कोणा साजिंद्यामार्फत राज्यसभेत विरोधकांशी संधान बांधले असते वा प्रसंगी एक पाऊल मागे जात काँग्रेसला सहकार्याची याचना नाही तरी विनंती केली असती. राष्ट्रहिताचे ईप्सित साध्य करण्यासाठी विरोधकांची मनधरणी करण्यात काहीही कमीपणा नाही. तसा त्यांनी तो घेतला असता तर सुधारणांवरील त्यांची बांधीलकी तरी दिसून आली असती. परंतु त्यांनी अध्यादेशांच्या चोरवाटेने सुधारणा आणण्याचा प्रयत्न केला. तो अगदीच अल्पजीवी ठरणार हे उघड आहे. कारण या अध्यादेशांना संसदेची मान्यता लागणारच आणि तेथे पुन्हा राज्यसभेत विरोधक आडवे येणार. या वा कोणत्याही मुद्दय़ावर विरोधकांनी स्वतहून मदत करावी असे स्वत  विरोधात असताना भाजपचे वर्तन कधीही नव्हते. तेव्हा आता काँग्रेसजन आपणहून मदतीस येण्याची अपेक्षा भाजपची असेल तर ती व्यर्थ आहे. आíथक सुधारणांच्या मार्गात राजकारण येते आणि निवडणुका आसपास असतील तर राजकीय अडथळा अधिकच मोठा असतो.
मोदी यांना या अडथळ्यांचाही विचार करावा लागणार आहे. नव्या वर्षांच्या दुसऱ्याच महिन्यात दिल्ली विधानसभेच्या निवडणुकांत मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजपस अरिवद केजरीवाल यांच्या आपला सामोरे जावे लागणार आहे. गेल्या निवडणुकीच्या तुलनेत या वेळची परिस्थिती बदललेली असल्याने आणि आपकडे गमावण्यासारखे फारसे काही नसल्याने भाजपसमोरील आव्हान अधिक कडवे असेल. यात भाजपचे संख्याबळ जरा जरी कमी झाले तर ती भाजपच्या घसरणीची सुरुवात मानली जाईल. त्यानंतर या वर्षअखेरीस बिहार, पुढील वर्षी प. बंगाल आणि २०१७ साली उत्तर प्रदेश या राज्यांच्या विधानसभा निवडणुका अपेक्षित आहेत. उत्तर प्रदेशनंतर देश पुन्हा निवडणुकीच्या मानसिकतेत जाईल. कारण २०१९ साली लोकसभा निवडणुका असतील. तेव्हा या राजकीय आव्हानांना तोंड देत देतच मोदी यांना आíथक मार्गक्रमणा करावी लागणार असून स्वप्नविक्रीतील आपले सारे कौशल्य त्यातील काही स्वप्नांच्या पूर्तीसाठीही त्यांना खर्च करावे लागेल. त्यात ते कितपत यशस्वी ठरतात ते याच वर्षी ठरेल. पुढील महिन्यात सादर होणाऱ्या अर्थसंकल्पापासून मोदी यांच्या खऱ्या परीक्षेस सुरुवात होईल. त्यात ते उत्तीर्ण होऊ लागले तरच महेंद्रसिंग धोनी आणि नरेंद्र मोदी यांच्यातील साम्यरेखा पुढे ओढली जाईल. नपेक्षा महेंद्र आणि नरेंद्र हे शब्द यश आणि अपयश यास समानार्थी ठरतील.