News Flash

डिक स्मिथ

पडद्यावरील आणि पडद्यामागील कलाकारांना सारख्याच प्रमाणात लोकप्रियतेची शिखरे सर करू देण्यामध्ये ‘गॉडफादर’ या हॉलीवूडी चित्रपटाचा वाटा मोठा होता

| August 2, 2014 03:22 am

पडद्यावरील आणि पडद्यामागील कलाकारांना सारख्याच प्रमाणात लोकप्रियतेची शिखरे सर करू देण्यामध्ये ‘गॉडफादर’ या हॉलीवूडी चित्रपटाचा वाटा मोठा होता, त्या वेळीच डिक स्मिथ हा त्यातील रंगभूषाकाराची भूमिका वठविणारा अवलिया ‘रंगभूषेचा गॉडफादर’ म्हणून ओळखला जात होता. स्पेशल इफेक्ट्सच्या अशक्य वाटू शकणाऱ्या संगणकाने अतिसुलभ होण्याच्या कैक दशके आधी चित्रपटांतील रंगभूषा या प्रांताला झळाळी प्राप्त करून देण्यामध्ये डिक स्मिथ यांचा मोलाचा वाटा आहे. कुठल्याही मूलभूत अभ्यासाऐवजी स्वत:च्या कल्पनांद्वारे आणि तांत्रिक हिकमतीवर स्वर्ग निर्माण करणाऱ्या कलावंतांनी १९६० सालातील हॉलीवूड गजबजले होते. ध्वनी-प्रकाश-वेशभूषा आणि सर्व तांत्रिक क्षेत्रांमध्ये या कलावंतांनी अपुस्तकी पायंडय़ांद्वारे आपला आणि चित्रपट क्षेत्राचा विकास घडवून आणला. डिक स्मिथ यामधीलच एक.
१९५० ते १९९०च्या दशकांमधील हॉलीवूडच नाही, तर जगातील सर्वच रंगभूषाकारांना डिक स्मिथ यांनी घालून दिलेल्या वाटेवर चालावे लागले. थोर कलावंतांच्या अजरामर मुख्य भूमिकांपासून (गॉडफादर- टॅक्सी ड्रायव्हर- एक्झॉर्सिस्ट-अ‍ॅमॅडय़ुअस- लिटिल बिग मॅन) ते भयपटांमधील ‘सुंदर क्रूरकर्मी’ राक्षसांना अविस्मरणीय चेहरेपट्टी देण्यामध्ये स्मिथ यांचा कुशल हात होता. दुसऱ्या महायुद्धामध्ये लढलेल्या फ्रान्सिस यांना हॉलीवूडमधील रंगभूषेच्या एका पुस्तकाने या क्षेत्रामध्ये अतिस्वारस्य निर्माण झाले. सुरुवातीला येल विद्यापीठातील नाटकांमध्ये आणि नंतर दोन दशके दूरचित्रवाणीसाठी रंगभूषाकार म्हणून काम केले. मुखवटे बनविण्याच्या जुन्या तंत्राला तिलांजली देऊन प्लास्टिकच्या तुकडय़ांच्या आधारे हुबेहूब मानवी त्वचा वाटावी इतके अचूक व्यक्तिरेखेला तयार केले. या तंत्राला संगणकीय स्पेशल इफेक्ट्स येण्यापूर्वी सर्वानीच स्वीकारले आणि आजही संगणकीय मदत न घेता काम करण्याची हिंमत दाखवणाऱ्या चित्रपटकर्त्यांना स्मिथ यांच्या तंत्राचाच आधार आहे.
मार्लन ब्रॅण्डोच्या ‘गॉडफादर’ला आणखी करारी बनवणारा जबडा आणि ‘एक्झॉर्सिस्ट’मधील लिंडा ब्लेअरला भयावह बनवणारा चेहरा ही त्यातील सर्वात लोकप्रिय उदाहरणे आहेत; पण रंगभूषेसाठी ‘ऑस्कर’सोबत ढीगभर पारितोषिके पटकाविणाऱ्या या कलाकाराने अभिनयाहून वरचढ रंगभूषा असू नये, याची काळजी घेतली. त्यामुळे प्रत्येक अभिनेता/ अभिनेत्रीने आपल्या भूमिका अधिक सरसपणे पडद्यावर साकारल्या.  रंगभूषेचे विद्यापीठ असलेल्या स्मिथ यांच्या नुकत्याच झालेल्या मृत्यूने आजकाल संगणकीय स्पेशल इफेक्टच्या आहारी गेलेल्या चित्रपट क्षेत्राचे काहीही नुकसान होणार नसले, तरी रंगभूषेच्या प्रवर्तनाच्या एका युगाचा अस्त झाला आहे, हे खरे.  

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 2, 2014 3:22 am

Web Title: makeup artist dick smith
Next Stories
1 रोम्युलस व्हिटेकर
2 थिओडोर व्हान किर्क
3 जितू राय
Just Now!
X