‘ज्ञानपीठ पुरस्कार’ २० वर्षांपूर्वी मिळाला, दहा वर्षांपूर्वी पद्मभूषण किताबाने गौरव झाला आणि साहित्य अकादमीतर्फे, भारतीय साहित्यविश्वातील ज्येष्ठतेची खूण मानली जाणारी ‘फेलोशिप’सुद्धा गेल्याच वर्षी मिळाली.. म्हणजे एम टी वासुदेवन नायर यांच्या कर्तृत्वावर मोहोर बऱ्याचदा उमटली. तरीही नुकताच आणखी एक पुरस्कार स्वीकारण्यासाठी नायर महाराष्ट्राच्या राजधानीत, मुंबईत आवर्जून उपस्थित राहिले!
‘लँडमार्क लाइफटाइम अचीव्हमेंट अ‍ॅवार्ड’ हा पुरस्कार ‘टाटा लिटरेचर लाइव्ह’ या प्रामुख्याने इंग्रजी साहित्याच्या उत्सवातर्फे दिला जातो, तो मल्याळम् भाषेत लिहिणारे नायर यांनी शनिवारी स्वीकारला.  पुरस्कार साधाच असला, तरी वेळ मिळेल तेव्हा साहित्यिकांमध्ये मिसळण्याची- किंबहुना यासाठी वेळ काढण्याची नायर यांची हौस कधी लपून राहिलेली नाही. साहित्यिक पुरस्कार तर त्यांना वयाच्या सतराव्या वर्षांपासून- म्हणजे पहिली कथा महाविद्यालयीन लेखनस्पर्धेत पाठविली तेव्हापासूनच मिळताहेत. तेव्हापासून आजवरची त्यांची कामगिरी नऊ कादंबऱ्या, ललितगद्य आणि समीक्षेची मिळून सात पुस्तके, त्याखेरीज प्रवासवर्णनांची दोन आणि आत्मपर स्मृतिलेखनाची तीन पुस्तके,  ५० हून अधिक कथा आणि तब्बल ६० चित्रपटांच्या कथा-पटकथा, त्यापैकी आठ चित्रपटांचे दिग्दर्शनसुद्धा.. अशी अचाट आहे!
गुणात्मकदृष्टय़ा, कादंबरीकार म्हणून त्यांची कारकीर्द अधिक लक्षात राहावी अशी आहे. पटकथा लिहिण्यातून लोकांची भाषा पुन:पुन्हा मला भेटते आणि ती माझी होते, ही भाषा मी वापरतो, असे नायर यांचे म्हणणे. पटकथांसाठी आणि दिग्दर्शनासाठी, विशेषत: केरळ सरकारचे पुरस्कारही त्यांना अनेक मिळाले. मात्र हा लेखक केवळ एका राज्याचा किंवा ‘मातीत गाडून घेणारा’ नाही, याची साक्ष ‘वाराणसी’सारखी त्यांची  कादंबरी वाचताना मिळावी. पॅरिस, मुंबई, तत्कालीन मद्रास आणि बँगलोर शहरे.. येथून काशीच्या गंगेला मिळणारा कथाप्रवाह नायर यांनी ‘वाराणसी’त रचला आहे आणि नाती व निस्संगत्व, अहंकार आणि निरिच्छा यांच्या गंगायमुना कुठे मिळतात, कुठे संगमाविनाच वाहतात असा मनोप्रदेश नायर यांनी दाखवला आहे.
वर्णने आणि संवाद, दोन्हीची हातोटी नायर यांच्याकडे आहेच. ती चांगल्या अर्थाने त्यांची लेखकीय कारागिरी आहे, पण काळ आणि मानवी मूल्ये यांचे धागे पकडून ते कथानकात विणणे, ही त्यांची कला आहे. आज ८१ वर्षांचे असणाऱ्या नायर यांनी जग पाहिले मनसोक्त आणि वाचकांना जग दाखवलेसुद्धा भरपूर. वाचकांनाच नायर यांनी जे सहस्र-मनोदर्शन घडवले, त्याची परतफेड मुंबईने आता केली आहे.