News Flash

मानवजितसिंग संधू

राजवर्धनसिंह राठोड याने २००४ च्या अथेन्स ऑलिम्पिक स्पर्धेत भारतातर्फे नेमबाजीतील रौप्यपदक मिळविल्यानंतरही या खेळाकडे पाहण्याचा दृष्टिकोन अपेक्षेइतका सकारात्मक नव्हता.

| April 14, 2014 01:00 am

राजवर्धनसिंह राठोड याने २००४ च्या अथेन्स ऑलिम्पिक स्पर्धेत भारतातर्फे नेमबाजीतील रौप्यपदक मिळविल्यानंतरही या खेळाकडे पाहण्याचा दृष्टिकोन अपेक्षेइतका सकारात्मक नव्हता. मात्र बीजिंग येथे २००८ मध्ये झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत अभिनव बिंद्रा याने नेमबाजीत सोनेरी इतिहास घडविल्यानंतर खऱ्या अर्थाने या खेळास आपल्या देशात चालना मिळाली. राजवर्धन व अभिनवपेक्षाही अनुभवात मोठा असलेल्या मानवजितसिंग संधू याला ऑलिम्पिक स्पर्धेत तीन वेळा संधी मिळूनही पदकाचे स्वप्न साकार करता आलेले नाही. मात्र अमेरिकेत सुरू असलेल्या जागतिक शॉटगन नेमबाजी स्पर्धेत त्याने सुवर्णपदक मिळविले. हे पदक मिळविताना त्याने दोन वेळा ऑलिम्पिक सुवर्णपदक मिळविणाऱ्या मायकेल डायमंड या ऑस्ट्रेलियन खेळाडूवर मात केली.
 ही स्पर्धा सुरू होण्यापूर्वी त्याच्यावर थोडेसे दडपण होते, मात्र स्पर्धा सुरू झाल्यानंतर त्याने फक्त आपल्या नेमबाजीवर लक्ष केंद्रित केले. नेमबाजीसारख्या खेळात एकाग्रता, संयम व मानसिक कणखरपणा यास अनन्यसाधारण महत्त्व आहे. मानवजित याने या सर्व गुणांचा योग्य ताळमेळ साधला. त्याने प्राथमिक फेरीत प्रभावी कामगिरी करीत अंतिम फेरीतील प्रवेश निश्चित केला. अंतिम फेरीतच कौशल्याची खरी कसोटी असते. मानवजित याने या फेरीतही फक्त आपल्या लक्ष्यावर एकाग्रता ठेवली, संयम ठेवला आणि डायमंडसारख्या बलाढय़ स्पर्धकास मागे टाकून सनसनाटी कामगिरी केली. ३८ वर्षीय मानवजित याने आशियाई क्रीडा, राष्ट्रकुल क्रीडा, आशियाई क्ले नेमबाजी, जागतिक अजिंक्यपद आदी स्पर्धामध्ये पदकांची लयलूट केली आहे. देशाच्या क्रीडा क्षेत्रातील सर्वोच्च सन्मान असलेला राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार त्याला  मिळाला आहे. नेमबाजी हा खूप खर्चीक क्रीडा प्रकार मानला जातो. मात्र त्याचे वडील गुरबिरसिंग हे स्वत: आंतरराष्ट्रीय दर्जाचे नेमबाज असल्यामुळे मानवजित याला या खेळातच कारकीर्द करताना फारशी अडचण आली नाही. मानवजितला अद्याप ऑलिम्पिक पदकाचे स्वप्न साकार करता आलेले नाही. २००४, २००८ व २०१२ मध्ये त्याने ऑलिम्पिकमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करूनही त्याची पाटी कोरीच राहिली आहे. ऑलिम्पिकमध्ये मात्र पदकासाठी असलेल्या दर्जाचे कौशल्य दाखविण्यात तो कमी पडला आहे.
नेमबाजी या खेळात ऑलिम्पिक पदक मिळविण्यासाठी वयाचा अडथळा कधीही नसतो. त्यामुळे ऑलिम्पिक पदकाचे स्वप्न तो अजूनही साकार करू शकतो. रिओ येथे २०१६ मध्ये होणाऱ्या ऑलिम्पिकमध्ये हे लक्ष्य साध्य करण्याची त्याला संधी आहे. अभिनव, राजवर्धन, गगन नारंग, विजयकुमार यांच्याकडून प्रेरणा घेत हे स्वप्न तो साकार करील अशी आशा आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 14, 2014 1:00 am

Web Title: manavjit singh sandhu pips olympic champion michael
Next Stories
1 नंदू भेंडे
2 स्टुअर्ट पार्किन
3 सुधाताई वर्दे
Just Now!
X