मेहनत आणि जिद्दीच्या बळावर कोणतेही शिखर साध्य करता येते, हे मँचेस्टर सिटीने या मोसमात दाखवून दिले. सर्वच बाबतीत नकारात्मकता, अमाप पैसा खर्च केल्यामुळे झालेली टीका, दुबळा बचाव आणि पुरेसे इंग्लिश खेळाडू करारबद्ध न केल्यामुळे झालेली टीका यामुळे मँचेस्टर सिटी संघ इंग्लिश प्रीमिअर लीगच्या जेतेपदाचा दावेदार असेल, असे कुणालाही वाटले नव्हते. लिव्हरपूल, चेल्सी, अर्सेनल आणि मँचेस्टर सिटी हे चार संघ जेतेपदाच्या शर्यतीत असताना मँचेस्टर सिटी अव्वल स्थानावर कधीच पोहोचला नव्हता. बऱ्याच वेळेला त्यांची दुसऱ्या क्रमांकापर्यंत मजल जायची. योग्य क्षणाची त्यांना प्रतीक्षा होती. सर्वाधिक १३ वेळा इंग्लिश प्रीमिअर लीगचे जेतेपद पटकावणारा मँचेस्टर युनायटेड संघ जेतेपदाच्या शर्यतीतून केव्हाच बाहेर फेकला गेला होता. त्यातच या मोसमात मँचेस्टर सिटीची सुरुवात खराब झाली होती. दुसऱ्या सामन्यात त्यांना कार्डिफ सिटीविरुद्ध पराभव आणि चौथ्या सामन्यात स्टोक सिटीविरुद्ध बरोबरी पत्करावी लागली होती. पण प्रशिक्षक मॅन्युएल पॅलेग्रिनी यांनी संघात आक्रमकपणा आणल्यानंतर मँचेस्टर युनायटेड, अर्सेनल आणि टॉटनहॅम हॉट्सपर या दिग्गज संघांना घरच्या मैदानावर पाणी पाजत आपण तीन वर्षांत दुसरे जेतेपद जिंकू शकतो, हा विश्वास चाहत्यांना दिला. बाकीचे संघ धोके पत्करत असताना मँचेस्टर सिटी संघ प्रत्येक सामन्यागणिक कामगिरी उंचावत होता. लिव्हरपूलने आक्रमक खेळाचे तंत्र अवलंबले होते तर अर्सेनलने अधिकाधिक वेळ चेंडूवर ताबा मिळवण्याची रणनीती आखली होती. प्रतिस्पध्र्याना ९० मिनिटे झुंजवून विजय मिळवण्याचे चेल्सीचे तंत्र होते. पॅलेग्रिनी यांनी मात्र एका वेळी एका सामन्यावर लक्ष केंद्रित करण्याचे डावपेच आखले होते. त्यांचे हे डावपेच अखेरच्या क्षणी फायद्याचे ठरणार, हा विश्वास त्यांना होता. अखेर तसेच झाले. अग्रस्थानावर मुसंडी घेणारा लिव्हरपूल संघ जेतेपद मिळवणार आणि त्यांची २४ वर्षांपासूनची जेतेपदाची प्रतीक्षा संपणार, असे वाटले होते. विजयासाठी लिव्हरपूलला अखेरचे तीन सामने जिंकणे गरजेचे होते. पण नशीब त्यांच्या बाजूने नव्हतेच. शेवटून तिसऱ्या सामन्यात चेल्सीकडून पराभूत झाल्यानंतर लगेचच क्रिस्टल पॅलेसविरुद्ध ३-० असे आघाडीवर असतानाही शेवटच्या नऊ मिनिटांत बरोबरी पत्करावी लागल्यामुळे लिव्हरपूलच्या जेतेपदाच्या आशा संपुष्टात आल्या. लिव्हरपूलच्या दोन सामन्यांतील खराब कामगिरीचा फायदा मँचेस्टर सिटीने उठवला. जेतेपद पटकावण्यासाठी मँचेस्टर सिटीला अखेरच्या सामन्यांत एका गुणाची आवश्यकता होती. कोणतीही चूक न करता वेस्ट हॅमवर २-० असा विजय मिळवून मँचेस्टर सिटीने दिमाखात जेतेपदाला गवसणी घातली. वर्षभरापूर्वी मँचेस्टर सिटीचे प्रशिक्षकपद स्वीकारल्यानंतर पॅलेग्रिनी यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागले. खेळाडूंचे आपापसातील बिघडलेले संबंध त्यांनी सुधारले. कोणताही अहंभाव न ठेवता मृदूभाषी असलेल्या पॅलेग्रिनी यांनी खेळाडूंना एकत्र आणण्याचे काम केले. अनेक गोष्टींमध्ये बदल करीत त्यांनी नवीन गोष्टी रुजवल्या. गुणवत्ता असूनही काहीसा मागे पडलेल्या समीर नासरीला आपल्या कारकिर्दीला झळाळी देण्याची संधी त्यांनी दिली. या मोसमात सर्वाधिक गोल करणाऱ्या लिव्हरपूलच्या लुईस सुआरेझमुळे याया टौरेच्या कामगिरीकडे दुर्लक्ष झाले. पण उपकर्णधार याया टौरेने सिटीच्या जेतेपदात मोलाची भूमिका बजावली. सर्जिओ अ‍ॅग्युरो, अल्वारो नेग्रेडो, डेव्हिड सिल्वा, समीर नासरी आणि इडिन झेको या आक्रमकवीरांसह कर्णधार विन्सेन्ट कोम्पानी आणि पाबलो झाबालेटा यांची बचावातील सुरेख कामगिरी मँचेस्टर सिटीला जेतेपद मिळवून देणारी ठरली. कामगिरीतील सातत्य आणि चतुर डावपेच हेच त्यांच्या यशाचे रहस्य ठरले.