जोशी आडनावाच्या सर्वानाच भविष्यवेधाची कला असती, तर शिवसेनेच्या भूतकाल आणि वर्तमानाचा वेध घेणाऱ्या मनोहर जोशी यांनी पक्षाच्या भविष्याचाही वेध स्वत:च घेतला असता. पण शिवसेनेवर शोधनिबंध लिहिताना, उद्याच्या शिवसेनेचा वेध घेण्याचे काम मात्र त्यांनी इतरांवरच सोपविले. शिवसेनेचे भविष्य दुरूनच पाहण्याचे आणि दुसऱ्यांकडूनच वदविण्याचे त्यांनी त्याच वेळी ठरविले असावे, असे आजच्या त्यांच्या स्थितीकडे पाहता वाटू लागते. बाळासाहेब ठाकरे आणि मनोहर जोशी यांचे एकमेकांशी असलेले नाते पाहता, बाळासाहेबांच्या हयातीत जोशी यांच्या स्थानाला आणि अस्तित्वाला धक्का लावण्याची इच्छा असली तरी तशी िहमत न झालेले अनेक जण अखेर जोशी यांना दूषणे न देता सेनानेतृत्वावर आगपाखड करीत पक्षाबाहेर गेले. गेल्या महिन्यात खुद्द जोशी यांनी पक्षनेतृत्वाच्या क्षमतेवर बोट ठेवल्यानंतर जेव्हा त्यांना अपमानित स्थितीत दसरा मेळाव्याचे व्यासपीठ सोडून पळ काढावा लागला, तेव्हा त्यापकी काहींनी जोशी यांच्याविरुद्ध मनात खदखदणाऱ्या असंतोषाला प्रथमच वाट करून दिली. मनोहरपंत जोशी एक महत्त्वाकांक्षी व्यक्ती असून मनात असते ते घडवून आणल्याखेरीज राहात नाहीत, असे खुद्द बाळासाहेब ठाकरे यांनीच नमूद केले आहे. या गुणांच्या जोरावरच महापौरपद ते लोकसभाध्यक्षपदापर्यतची मानाची सारी पदे मनोहरपंतांकडे चालून आली असावीत.  बाळासाहेबांच्या पश्चात सेनेतील सर्वात ज्येष्ठत्वाची झूल आपल्याच अंगावर असल्याच्या समजुतीत, कदाचित, नेतृत्वाला ज्येष्ठत्वाच्या अधिकाराचे चार बोल सुनावण्याचे अधिकार स्वत:कडे घेण्याची त्यांची इच्छा या वेळी फळाला आली असती, तर सेनेतील त्यांचे महत्त्व आणि ज्येष्ठत्वदेखील अबाधित राहिले असते. पण त्यांचा अंदाज चुकला. चार वर्षांपूर्वी सेनेच्या भविष्याकडे दुसऱ्याच्या नजरेतून पाहिल्याचा हा परिणाम असावा. २००९ मध्ये ‘शिवसेना- काल, आज आणि उद्या’ हा संशोधन प्रबंध लिहून डॉक्टरेट मिळविणाऱ्या पंतांना पुढच्या तीन वर्षांतच भविष्यानेच ‘हात’ दाखविला. शिवसेनेवर हा शोधनिबंध लिहिताना मनोहरपंत केवळ स्वानुभवावर विसंबून नव्हते. मराठी माणसाची संघटना ते राजकीय पक्ष अशा वाटचालीचे त्रयस्थपणे निरीक्षण करणाऱ्या, सुधा गोगटे, दीपंकर गुप्ता, मेरी कॅट्झेन्स्टीन यांच्यापासून संजय राऊत यांच्यापर्यंत अनेकांची पुस्तकेही त्यांनी चाळून काढली होती. त्या पुस्तकांतून राहून गेलेली शिवसेना आपल्या शोधनिबंधातून व्यक्त करण्याचा जोशी यांचा प्रयत्न होता. गेल्या चार वर्षांतील शिवसेना हा त्यांच्या प्रबंधानंतरचा शिवसेनेचा भविष्यकाळ होता आणि मनोहरपंत या काळात पुस्तकातील प्रकरणाप्रमाणेच सेनेपासून अलिप्त राहिले होते. हा चार वर्षांचा काळ प्रबंधानंतरचा भविष्यकाळ असला, तरी आजचा ‘भूतकाळ’ आहे. त्यामुळे त्याकडे पाहताना हे सहज स्पष्ट होते. जोशी यांनी पक्षनेतृत्वाच्या क्षमतेवर केलेले भाष्य वर्तमानाने साफ चुकविले आणि वक्तव्यापासून माघार न घेण्याचा त्यांचा पवित्रादेखील फोल झाला. आता राज्यसभेची जागा किंवा लोकसभेची उमेदवारी ही त्यांच्या अस्वस्थ भविष्यकाळाची शिदोरी आहे. म्हणूनच,  त्यांनी ‘घालीन लोटांगण’ म्हटले. अन्य असंतुष्टांप्रमाणे जय महाराष्ट्र न करता, पक्षातच राहून त्यांना आता कदाचित ‘वंदीन चरण’ म्हणावे लागेल. भविष्यापासून स्वत:ला अलिप्त ठेवणे आपल्या आडनावाला साजेसे नाही, हे त्यांना उमगले असेल..