भारतीय शास्त्रीय संगीतावरील सर्वश्रेष्ठ समजला जाणारा ‘संगीत रत्नाकर’ हा ग्रंथ ज्याने लिहिला, तो शारंगदेव ज्ञानेश्वरांच्या पूर्वी होऊन गेला.  या ग्रंथात साहित्य, संगीत आणि सौंदर्यशास्त्र यांचे सिद्धान्त काश्मीर शैव तत्त्वज्ञानाच्या चौकटीत चर्चिले गेले असून एवढा महत्त्वाचा ग्रंथ वाचणाऱ्या व समजणाऱ्या वाचकांची तयारीही तशीच असणार. हा मराठी समाज जितका रसिक तितकाच तत्त्वज्ञानाचा जाणकार होता. ज्ञानेश्वर याच विशेषणांनी आपल्या श्रोतृवृंदास संबोधतात हे लक्षात घेतले म्हणजे याविषयी शंका राहू नये.
महाराष्ट्रातल्या लोकांचा संस्कृतीस्वभाव, या लोकांच्या समाजात झालेली सामाजिक, राजकीय स्थित्यंतरे यांच्यात काय संबंध आहे, या निर्मितीत आंतरिक प्रेरणांचा किती भाग आहे व अनुकरणाचा किती हे नीट स्पष्ट करता आले, तरच मराठीचा अस्सल वाङ्मयेतिहास सिद्ध होईल, हे मुद्दाम सांगायची गरज नाही.
या संबंधाची चर्चा करताना मराठीचे पूर्वरूप असलेल्या महाराष्ट्री प्राकृतपर्यंत मागे जायला हवे. इ.स.पू. २०० ते इ.स. २०० हा काळ राजकीयदृष्टय़ा सातवाहन घराण्याच्या सत्तेचा कालखंड मानला जातो. या काळात महाराष्ट्र सर्व आघाडय़ांवर पुढे होता. उत्तरेकडून येणाऱ्या शकांसारख्या जबरदस्त परकीय आक्रमकांचा बंदोबस्त करण्यात सातवाहनांना यश मिळाले. सातवाहनांच्याच काळात महाराष्ट्राची निर्यात वाढली व तो समृद्ध झाला. हा कालखंड धार्मिक सहिष्णुतेचा काळही मानता येतो. यज्ञयाग करणाऱ्या सातवाहन राज्यकर्त्यांच्या काळात महाराष्ट्रात बौद्ध लेण्यांची निर्मिती झाली आणि प्रस्तुत चर्चेच्या संदर्भातील महत्त्वाची बाब म्हणजे मराठीचे पूर्वरूप असलेल्या प्राकृत भाषेस सातवाहन राजांनी आश्रय देऊन आपल्या दरबाराची व कारभाराची भाषा बनवली. प्राकृत भाषेत शिलालेख कोरवले.
विशेष गोष्ट म्हणजे या काळात महाराष्ट्री प्राकृत साहित्याची भाषा म्हणून प्रतिष्ठा पावली. सातवाहन राजांमधील हाल सातवाहन हा स्वत: कवी होता व त्याने समकालीन कवींच्या कवितांचे संपादन करून त्यांचा संग्रह सिद्ध केला. सातशे गाथांचे हे संकलनसंपादन ‘गाथा सप्तशती’ (मूळ नावाचे संस्कृत भाषांतर) म्हणून प्रसिद्ध आहे. सप्तशतीतील काही कविता कवयित्रींनी रचल्या होत्या त्याचीही नोंद घ्यायला हवी.
हाल सातवाहनाच्या संग्रहातील कवितांनी संपूर्ण देशातील रसिकांचे व विद्वान साहित्यविमर्शकांचे लक्ष वेधून घेतले. या गाथांच्या संस्कृत छाया (अनुवाद) तयार करून त्यांचा उपयोग अलंकारादिकांची उत्कृष्ट उदाहरणे म्हणून करण्यात येऊ लागला. या उदाहरणांच्या शिवाय संस्कृत काव्यशास्त्राचे पानही हालू नये अशी परिस्थिती निर्माण झाली.
संस्कृत साहित्यमीमांसकांनी सर्वश्रेष्ठ काव्याची चर्चा करताना रससिद्धान्त पुढे आणला. शृंगाररस रसांचा राजा मानला गेला आणि त्याहीपेक्षा लक्षणीय बाब म्हणजे उत्कृष्ट कवितेचा अर्थ वाच्यार्थ किंवा लक्ष्यार्थ नसून ध्वन्यर्थ किंवा व्यंजितअर्थ असावा या विषयी सर्वाचे एकमत झाले. परंतु, अशा प्रकाराच्या सूचित आणि सुंदर अर्थाची उदाहरणे संस्कृत वाक्यापेक्षा महाराष्ट्री प्राकृतातच जास्त सापडत असल्यामुळे संस्कृत साहित्यशास्त्रावरील ग्रंथात उदाहरणे प्राकृतातील अशी मजेशीर विसंगती दिसू लागली!
पंडितवर्य राजारामशास्त्री भागवतांच्या मते प्राकृतातील या कवितांवर ओढूनताणून शृंगारिक ध्वन्यर्थ लादण्याचे काम संस्कृत टीकाकारांचे. या टीकाकारांना जणू शृंगाराशिवाय दुसरे काही सुचतच नसे.
‘ज्ञानकोश’कार श्रीधर व्यंकटेश केतकर यांनी तर या बाबतीत अगदीच वेगळे मत मांडले आहे. त्यानुसार प्राकृतातील या गाथा मुळात प्राकृत नाटकांमधील पद्य भाग असला पाहिजे. संस्कृत पंडितांनी या गाथांना नाटकाच्या मूळ संदर्भ चौकटीपासून तोडून त्यांचा स्वतंत्र शृंगारिक अर्थ लावला. भागवतांनी आपला युक्तिवाद एका महत्त्वाच्या निरीक्षणाने पुष्ट केला आहे. संस्कृत नाटकांमधील काही पात्रे महाराष्ट्री बोलतात व नाटकातील पद्य भाग सहसा महाराष्ट्री असतो. म्हणजेच शुद्ध संस्कृत नाटक सापडणार नाही. पण शुद्ध प्राकृत नाटक मात्र आढळते. यावरून नाटय़वाङ्मयाची सुरुवात प्राकृतात झाली असे शास्त्रीबुवा म्हणतात.
ते काहीही असो. मुद्दा असा आहे, की ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहिली, तेव्हा संस्कृत काव्यशास्त्र पूर्णत: प्रतिष्ठित झाले होते. भागवत म्हणतात, त्याप्रमाणे शास्त्रीपंडितांनी प्राकृत काव्यावर शृंगारिक अर्थ लादला असो किंवा संस्कृत नाटककारांनी प्राकृत नाटकांमधील कविता बाजूला काढून त्यांचा संदर्भ सोडून शृंगारिक अन्वयार्थ लावला असो, संस्कृत प्राकृत साहित्याच्या आधारे शास्त्राने शृंगाररसाची रसराज म्हणून प्रतिष्ठापना केली होती.
शृंगाररसाला आव्हान असलेच तर ते शांतरसाचे होते. विशेषत: काश्मीरमधील शैव तत्त्ववेत्ते शांतरसाला सर्वश्रेष्ठ मानीत होते. इतर रस शांतरसातून निष्पन्न होतात, असे त्यांचे मत होते. या मताला भक्कम तात्त्विक अधिष्ठान होते. आचार्य अभिनवगुप्त यांनी शांतरसाची चर्चा सीमेपर्यंत पोहोचवली होती. मात्र, शांतरसासाठी उदाहरणे कोठून आणायची हा प्रश्न त्यांच्यासमोर होता. हर्षांने लिहिलेली ‘नागानन्द’सारखी नाटके त्यांच्यासमोर नव्हती असे नाही. तथापि ती अवैदिक परंपरेतील होती आणि रससिद्धान्ताच्या चर्चाविश्वात आपला मुद्दा सिद्ध करण्यासाठी वैदिक परंपरेतील उदाहरणांची गरज होती.
अभिनवगुप्तांना अशा वेळी महाभारताची आठवण होणे साहजिक होते. भारतीय युद्धात जी प्रचंड प्राणहानी झाली, ज्यांना विजय मिळाला त्या पांडवांनाही विजयोत्सव साजरा करता यावा अशी परिस्थिती उरली नाही. उपभोग उपलब्ध असूनही ते घेण्याची इच्छाच होऊ नये इतका उद्वेग, उबग आला. यालाच पारिभाषिक शब्दात ‘निर्वेद’ असे म्हणतात. रससिद्धान्तातील एका पक्षानुसार निर्वेद हा शांतरसाचा स्थायिभाव होय. हा उल्लेख अभिनवगुप्त करतात. पण ते शेवटी आत्मस्वरूप हाच शांतरसाचा स्थायी असल्याचा प्रतिपादनापर्यंत पोहोचतात. महाभारताच्या भल्यामोठय़ा अरण्यात भटकंती करण्यापेक्षा भगवद्गीता नावाच्या महाभारतातीलच उपकथनकावर  मुक्काम करणे त्यांना सोयीचे वाटते. भगवद्गीतेत आत्मस्वरूपाची चर्चा आहेच. ते तत्त्वज्ञान हेसुद्धा शांतरसाचा स्थायिभाव मानता येते. हे सर्व ठीक आहे. परंतु, त्यासाठी गीतेचा त्या प्रकारचा अन्वयार्थ लावता आला पाहिजे. गीता हा एक काव्यग्रंथ असून, त्यातून ध्वन्यर्थ व्यंजित झालेला आहे. हे काव्य शांतरसाला निष्पन्न करणारे आहे. आत्मज्ञान किंवा आत्मा हाच त्याचा स्थायिभाव आहे. हे त्या अर्थातून दाखवून द्यायची जबाबदारी स्वीकारून गीतेवर तसे भाष्य लिहिणाऱ्या समर्थ भाष्यकाराची गरज होती.
विशेष म्हणजे स्वत: अभिनवगुप्तांनी गीतेवर भाष्य लिहिले होते, पण त्यांनाही संपूर्ण गीतेचा याप्रमाणे अर्थ लावता आला नाही, ही वस्तुस्थिती आहे.
भगवद्गीतेचा या प्रकारचा अर्थ लावण्याचे आव्हान ज्ञानेश्वरांनी स्वीकारले आणि ते पेलूनसुद्धा दाखवले, हे विशेष. पण हा उपक्रम त्यांनी संस्कृत भाषेत न करता मराठीत केला हे आणखी विशेष. आपण आपल्या भाषेत शांतरसाकरवी शृंगाराला जिंकणार आहोत याचा स्पष्ट उच्चार करायलाही ज्ञानेश्वर कचरत नाहीत.
भारतीय साहित्यशास्त्राच्या परंपरेचा तात्त्विक अंगाने विकास होत असताना तो एका बाजूने वेदान्ताच्या पद्धतीने झाला. त्याचा कलशाध्याय जगन्नाथ पंडिताने रचला. दुसऱ्या बाजूने हा विकास काश्मीर शैव दर्शनाच्या पद्धतीने झाला. त्याचा परिपोष ज्ञानेश्वरांनी सिद्धान्त आणि व्यवहार या दोन्ही क्षेत्रात करून दाखवला.
मुद्दा, ज्ञानेश्वरांना हे तत्त्वज्ञान कोठे गवसले याच्या शोधाचा आहे. त्याचे एक उत्तर ज्ञानेश्वरांचा नाथ पंथ हे संभवते. पण नाथ संप्रदाय रसिकतेसाठी कधीच प्रसिद्ध नव्हता. तेव्हा दुसऱ्या मार्गाने शोध घ्यायला हवा. सुदैवाने हे काम फार अवघड नाही. कारणे किंवा स्रोत काहीही असोत. ज्ञानेश्वरकालीन म्हणजेच यादवांच्या राजवटीत काश्मीर शैव विचार महाराष्ट्राला चांगलाच परिचित झाला होता.
भारतीय शास्त्रीय संगीतावरील सर्वश्रेष्ठ समजला जाणारा ‘संगीत रत्नाकर’ हा ग्रंथ ज्याने लिहिला, तो शारंगदेव ज्ञानेश्वरांच्या पूर्वी यादवराजांच्या दरबारात म्हणजे देवगिरीमध्ये होऊन गेला. त्याचे आजोबा महाराष्ट्रात आले, तेव्हापासूनच त्या घराण्याला यादवांनी आश्रय दिला होता. शारंगदेवाच्या संगीत रत्नाकरात साहित्य, संगीत आणि सौंदर्यशास्त्र यांचे सिद्धान्त काश्मीर शैव तत्त्वज्ञानाच्या चौकटीत चर्चिले गेले आहेत.

एवढा महत्त्वाचा ग्रंथ वाचणाऱ्या व समजणाऱ्या वाचकांची तयारीही तशीच असणार हे उघड आहे. हा मराठी समाज जितका रसिक तितकाच तत्त्वज्ञानाचा जाणकार होता. ज्ञानेश्वर याच विशेषणांनी आपल्या श्रोतृवृंदास संबोधतात हे लक्षात घेतले म्हणजे या विषयी शंका राहू नये. मराठी समाजाची अभिरुची आणि तिच्यातील स्थित्यंतरे हा एक स्वतंत्र अभ्यासविषय आहे.
*लेखक पुणे विद्यापीठात तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक असून संतसाहित्याचे व्यासंगी व विचारवंत आहेत.