जिल्ह्या-जिल्ह्यांतील ६३१ कृषी विस्तार केंद्रे, त्यांतील सुमारे दहा हजार कृषी वैज्ञानिक व तंत्र साहायक असा व्याप आता दिल्लीतून सांभाळणारे भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या (इकार) विस्तार विभागाचे उपमहासंचालक डॉ. किरण दत्तात्रय कोकाटे महाराष्ट्राच्या मातीशी जोडले गेले, ते बालपणीच्या कष्टांमुळे आणि पुढे व्यवसायामुळे! कृषी संशोधनाला  वीज, पाणी आणि बाजारपेठेच्या नियोजनाची जोड देणे, हा आजचा कृषिधर्म रुजवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे..
देशाच्या सत्तेचे केंद्र असलेल्या दिल्लीत करिअरसाठी यायला मराठी तरुण फारसा उत्सुक नसतो. सरकारी नोकरीत मोठे पद मिळविण्यासाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या स्पर्धा परीक्षांनाच तो प्राधान्य देतो. अर्थात, ही मानसिकता अलीकडे बदलत चालली असली तरी इतर राज्यांच्या मानाने विशेषत: केरळ, तामिळनाडू, बिहार, उत्तर प्रदेश, कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि पंजाबच्या तुलनेत दिल्लीत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व अजूनही कमीच आहे. भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या (इकार) विस्तार विभागाचे उपमहासंचालक डॉ. किरण दत्तात्रय कोकाटे यांचे उदाहरण त्याबाबतीत ठळक ठरावे. चाळीस वर्षांपूर्वी डॉ. कोकाटे विद्यार्थी म्हणून अभ्यास दौऱ्यानिमित्त कर्नालला आले तेव्हा तिथे जाधव आणि पवार या ज्येष्ठ सहकाऱ्यांना बघून त्यांना आपल्या शहराबाहेर पडण्याची प्रेरणा मिळाली. डॉ. कोकाटे यांनी शिक्षण आणि नोकरीसाठी हरयाणा, राजस्थान, हिमाचल प्रदेश आणि दिल्लीत सोळा वर्षे वास्तव्य केले. आज इकारमध्ये होणारे कृषी संशोधन देशाच्या कानाकोपऱ्यातील शेतकऱ्यापर्यंत पोहोचविण्याची महत्त्वपूर्ण जबाबदारी त्यांच्यावर आहे. सुमारे दहा हजार कृषी वैज्ञानिक व तंत्र साहायकांचे नेतृत्व करताना जिल्हास्तरावरील ६३१ कृषी विस्तार केंद्रांच्या माध्यमातून भारताला अन्न सुरक्षेचे लक्ष्य गाठून देण्याच्या देशव्यापी कार्यात ते सतत व्यस्त असतात. केंद्राच्या कृषी मंत्रालयात अतिरिक्त सचिवाच्या समकक्ष असलेल्या इकारमध्ये उपमहासंचालकाचे पद भूषविणारे ते पहिलेच मराठी अधिकारी ठरले आहेत.
डॉ. कोकाटेंचा जन्म पुण्यातील पाषाण गावातील कोकाटेंच्या संयुक्त कुटुंबातला. अर्धशिक्षित वडिलांची कृषी खात्यातील नोकरी, काकांचे किराणा मालाचे दुकान, पिठाची गिरणी आणि दोन एकर शेती अशा बेताच्याच परिस्थितीशी ओढाताण करीत ते मॉर्डन हायस्कूलमध्ये पहिली ते अकरावी आणि पुणे कृषी महाविद्यालयात पदवीपर्यंत शिकले. पन्नास वर्षांपूर्वी शिवाजीनगरात बालगंधर्व थिएटरपाशी एका खोलीत आईवडील, तीन सख्ख्या आणि एका चुलत भावंडांसोबत दाटीवाटीने दिवस काढणारे कोकाटे आज दिल्लीत चार बेडरूमच्या ऐसपैस बंगल्यात एकटेच राहतात. त्यांच्या पत्नी सुनीता फग्र्युसन महाविद्यालयात भौतिकशास्त्राच्या अध्यापिका आहेत. कन्या कृष्णा आयुर्वेदात एमडी करीत आहे, तर मुलगा ऋतुराज नुकताच इंजिनीअर झाला आहे, पण मितभाषी कोकाटे आपले जुने दिवस विसरलेले नाहीत. बालवयात शेतीत काकूसोबत पेरणीपासून कापणीपर्यंत शेतीची सर्व छोटीमोठी कामे ते करीत. महाराष्ट्राच्या कृषी खात्यात अधीक्षक म्हणून निवृत्त झालेले वडील दत्तात्रय कोकाटे आणि महात्मा फुले कृषी विद्यापीठात संशोधन विभागाच्या संचालकपदी असलेले सासरे दत्तात्रय गोपाळ भापकर यांच्यामुळे कृषी क्षेत्राशी त्यांचे नाते अधिकच दृढ झाले. आपल्या वाटचालीत आई, वडील, काका, काकू, सासरे आणि मित्रांच्या योगदानाचा तसेच शाळेतील शिक्षकांच्या संस्कारांचा ते कृतज्ञतापूर्वक उल्लेख करतात. वरिष्ठांशी संघर्ष न करता त्यांनी गुरुशिष्याचेच संबंध ठेवले. आपापल्या क्षेत्रात मोठय़ा पदांवर पोहोचलेल्या मॉर्डनच्या अकरावी ‘क’मधील राम जाधवराव, सुहास ढोले, भावेश ओझा, सुनील भिडे, गोपाल पटवर्धन, सुरुद्ध सरदेसाई आदींशी त्यांची आजही घट्ट मैत्री आहे. मित्रांमुळे नैतिक धैर्य उंचावले आणि अडचणीच्या वेळी पैशाची मदत झाल्याचे ते नमूद करतात. अनेक संकटांना तोंड देण्याची क्षमता निर्माण करणाऱ्या संयुक्त कुटुंब पद्धतीचे ते खंदे समर्थक आहेत.
शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षण पुण्यात पूर्ण करून कोकाटेंनी हरयाणाच्या कर्नालमधील राष्ट्रीय दुग्ध संशोधन संस्थेत एमएस्सी आणि पीएचडी केले. १९८४ साली कृषी वैज्ञानिक सेवेत दाखल होत जोधपूरच्या सेंट्रल अ‍ॅरिड झोन रिसर्च इन्स्टिटय़ूटमध्ये, १९८९ साली हिमाचल प्रदेशातील सिमला सेंट्रल पोटॅटो रिसर्च इन्स्टिटय़ूटमध्ये, १९९४ साली धुळ्यात राहुरीच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठात कृषी विस्ताराचे प्राध्यापक, १९९६ साली दापोलीत कोकण कृषी विद्यापीठात विभाग प्रमुख आणि २००५ साली पुन्हा राहुरीमध्ये कृषिविस्तार संचालक अशा जबाबदाऱ्या सांभाळत २००९ साली ते दिल्लीत उपमहासंचालक पदावर पोहोचले. नावाजलेले विस्तार संशोधक आणि तज्ज्ञ, कुशल प्रशासक असा लौकिक असलेल्या डॉ. कोकाटेंनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून कृषी क्षेत्रातील उत्पादकता वाढविण्यासाठी कौशल्य पणाला लावले आहे. कृषी क्षेत्रातील देशविदेशातील दीर्घ अनुभव गाठीशी असलेल्या कोकाटे यांचे राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर योगदान महत्त्वपूर्ण ठरले आहे. कृषी धोरणाचे नियोजन, अंमलबजावणी, व्यवस्थापन आणि समन्वय करून शेतकऱ्यांना कमी उत्पादन खर्चात जास्तीत जास्त कसा लाभ करून देणाऱ्या तंत्रज्ञानाचा त्यांनी ध्यास घेतला आहे.
डॉ. कोकाटे यांच्या मते देशापुढे हवामान बदलाचे आव्हान आहे. पाण्यावर अवलंबून असलेल्या शेतीचे काम आव्हानात्मक आहे. शेतीवर अवलंबून असलेली ५२ टक्के लोकसंख्या, जैवविविधता, हवामानाचे विविध प्रदेश, सहाशे लाखांहून अधिक गावे, सहाशेहून अधिक भाषा असलेल्या भारतात शेतकऱ्यापर्यंत पोहोचण्यासाठी केंद्र, राज्य आणि कृषी विभाग यांच्यात समन्वय असणे महत्त्वाचे आहे. शेतकऱ्यांनाच प्रशिक्षित करून किंवा मोबाइलसह नवनव्या माध्यमांतून बिनखर्चाच्या, पण महत्त्वाच्या सूचना त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. जिथे अन्य सेवा प्रस्थापित झालेल्या आहेत, तिथे संशोधनाचा फायदा होतो. शेतीसाठी पाण्याचे नियोजन सर्वात महत्त्वाचे. पिकाला एखादे पाणी मिळाले तरी दुप्पट उत्पादन होऊ शकते. खते आणि बाजारपेठेची उपलब्धताही महत्त्वाची. ऊर्जा, सिंचन आणि पणन विभागांनी राज्यस्तरावर एकत्र येऊन वीज, पाणी आणि बाजारपेठेचे नियोजन केल्यास शेतकऱ्यांना संशोधनाचा लगेच फायदा होऊ शकेल. त्यांच्यापुढे पर्याय ठेवणे हे आमचे काम असते. शेतकरी हुशार असतात आणि चांगल्या पद्धतीने नियोजन करतात. ते आता खऱ्या अर्थाने एकात्मिक अन्नद्रव्य, पाणी व्यवस्थापनाकडे लक्ष देऊ लागले आहेत.
फळबागायती, कडधान्य, मत्स्योत्पादन, पशुसंवर्धन, प्रक्रिया आणि मूल्यवर्धन या गोष्टींचे शेतकऱ्यांना मार्गदर्शन आवश्यक आहे. हरयाणात प्रतिहेक्टर ५२ क्विंटल गव्हाची विक्रमी उत्पादकता आली आहे. गेली साठ वर्षे आपण १४० टक्के उत्पादन वाढविले. येणाऱ्या साठ वर्षांमध्ये सत्तर टक्के उत्पादन वाढवायचे आहे. सर्व काही कमी कमी होत जात असताना जास्तीत जास्त लोकांसाठी उत्पादकता वाढवावी लागेल. त्यासाठी राज्यनिहाय योग्य कृषी धोरण महत्त्वाचे ठरणार असून कृषी क्षेत्रातील तज्ज्ञ मंडळींची मदत घेण्याची गरज आहे.
अधिकाधिक वैविध्य असलेल्या महाराष्ट्रातील शेतीकडे ते आदर्श शेती म्हणून बघतात. १९९० साली फळबागायतीखाली रोजगार हमी योजनेंतर्गत फळबागायतीचा विकास झाला नसता तर केवळ दोन लाख हेक्टर क्षेत्र असलेल्या महाराष्ट्रात फळक्रांती यायला अनेक वर्षे लागली असती. आज हे क्षेत्र वीस लाख हेक्टरवर गेले आहे. संशोधनाद्वारे दर्जेदार प्लांटिंग मटेरियल विकसित केल्यामुळे चांगल्या प्रकारे वैविध्य येऊन शेतकऱ्यांचा फायदा झाला. महाराष्ट्रात दुग्ध व्यवसाय, उपलब्ध पाण्याचे नियोजन करून योग्य वापर, मायक्रो इरिगेशन, कोरडवाहू शेतीचे काम फार चांगले झाले. हे संशोधन आणि विस्ताराचे सर्वोत्तम उदाहरण ठरावे. महाराष्ट्राने देशाच्या शेतीला दिशा देण्याचे काम केले आहे, असे ते म्हणतात. पाण्याची सोय नसताना हनुमंत गाजरेने तेरा वर्षांपूर्वी डाळिंबाची शेती सुरू केली आणि एकरी एक रुपया खर्च करून चौदा रुपये मिळविण्याचे अर्थशास्त्र विकसित केले. तेलकट डागांची समस्या संपवून स्पॉटलेस डाळिंबे तयार केली. डाळिंबाच्या शेतीतून एकरी सात-आठ लाख ते बारा-तेरा लाखांवर उत्पन्न मिळू शकते. आम्हाला नोकरी नको, डाळिंबाची शेती करतो, असे सोलापूर, अहमदनगर, नाशिककडची मुले म्हणतात, याकडे ते लक्ष वेधतात.
त्यांच्या मतेभविष्यात व्यवस्थापकीय कौशल्य आणि तंत्रज्ञानाचा वापर करून परिस्थिती अनुकूल करून घेणे हेच यशस्वी शेतीचे गमक ठरणार आहे. उपमहासंचालक पदावर काम करताना खूप शिकायला मिळते. कृषी धोरण ठरविण्यात, संसदीय कामकाजात, बारावी पंचवार्षिक योजना तयार करण्यात आपला सहभाग आहे, याचे त्यांना मोठे समाधान आहे. दिल्लीत मोठय़ा पातळीवर काम करण्याची संधी असल्यामुळे महाराष्ट्रातील लोकांनी स्वत:साठी व इतरांसाठीही पुढे येणे आणि मोठी आव्हाने स्वीकारणे गरजेचे आहे, असे त्यांचे मत आहे. दिल्लीत मराठी लोक आले, तर कुठल्या ना कुठल्या माध्यमातून राज्याच्या प्रगतीत हातभार लागेल, असे ते स्वानुभवातून सांगतात. दिल्लीतून देशाचा कृषिधर्म पाळणारे डॉ. कोकाटे यांचा हा अनुभव इतरांसाठी निश्चितच प्रेरक ठरू शकतो.