स्वातंत्र्यानंतरच्या पहिल्या दशकातच आकाशवाणीने भारतीय संगीताला जो आश्रय दिला, त्याने संगीत चहुअंगांनी बहरू लागले होते. नव्या कलावंतांसाठी हे माध्यम तेव्हा अतिशय अप्रूपाचे होते. मराठी माणसाच्या मनातली संवेदना स्वराकार घेऊन उभ्या राहिलेल्या भावगीत या एका नव्याच संगीत प्रकाराला ज्या काळात भरभरून दाद मिळाली, तेव्हा कृष्णा कल्ले यांनी आपली तयारी सादर करायला सुरुवात केली होती. भारतीय चित्रपटसृष्टी स्थिरस्थावर होत असताना, महाराष्ट्रातील भावसंगीत तेवढेच फुलू लागले होते. गजानन वाटव्यांपासून ते सरस्वतीबाई राणेंपर्यंत अनेक कलावंतांनी गायलेल्या भावगीतांनी रसिकांना अक्षरश: वेड लावले होते. कृष्णा कल्ले यांनी त्यानंतरच्या काळात लोकप्रियतेचा जो अनुभव घेतला, तो अपूर्व होता. जन्म महाराष्ट्राबाहेरचा, शिक्षणही मराठी भाषेतले नाही, अशा परिस्थितीतही त्यांनी गायलेली मराठी भावगीते आजही तेवढीच टवटवीत वाटतात, याचे कारण त्यांच्या आवाजातील नितळपणा आणि भावना व्यक्त करण्याची त्यांची क्षमता. हिंदी भाषा पुरेशी अवगत असल्याने या आवाजाचा उपयोग त्या काळातील हिंदी चित्रपटांसाठी न होता, तरच नवल. कृष्णा कल्ले यांनी किमान दोनशे चित्रपटांसाठी गाणी गायली. त्यातली अनेक प्रसिद्धीच्या शिखरापर्यंत पोहोचलीदेखील. त्याच काळात मराठी भावगीताच्या दुनियेत त्यांनी पाऊल ठेवले आणि अनेक गीते रसिकांच्या ओठांवर तरळू लागली. ‘गोड गोजिरी, लाज लाजिरी, ताई तू होणार नवरी’ किंवा ‘परिकथेतील राजकुमारा, स्वप्नी माझ्या येशील का’ यांसारखी त्यांची अनेक भावगीते आकाशवाणीच्या कार्यक्रमात हमखास हजेरी लावत असत. कवी, गायक आणि संगीतकाराचे नाव सांगून मगच ऐकवल्या जाणाऱ्या या गाण्यांमुळे रसिकांच्या मनात कल्ले यांनी आपली मुद्रा उमटवली. खरे तर प्रसिद्धीच्या झोतापासून दूर राहण्याचा तो काळ नव्हता. कलावंतांना समाजात मानाचे स्थान असे आणि त्यांच्याबद्दल कमालीची आपुलकीही असे. कृष्णा कल्ले मात्र या प्रकाशझोतापासून कायम दूर राहिल्या. त्यांनी फारच क्वचित जाहीर कार्यक्रमात भाग घेतला किंवा वृत्तपत्रांना मुलाखती दिल्या. तो त्यांचा स्वभाव नव्हता आणि त्यांना त्यात रसही नव्हता. आपण कुणी तरी मोठे आहोत, याचा गंड कधीच न बाळगल्यामुळे त्यांचे छायाचित्र प्रसिद्ध न झाल्याबद्दल त्यांना कधी खंतही वाटली नाही. १९६० ते ७० हे दशक त्यांच्यासाठी फार भाग्याचे ठरले. त्या काळात त्यांनी केलेले काम नंतर किती तरी वर्षे ओळखले जात राहिले. योग्य वेळी बाजूला होण्याचे मानसिक धैर्य त्यांच्याकडे होते. तोवर आकाशवाणीची जागा पूर्वमुद्रित ध्वनिफितींनी घेतलेली होती. चित्रपटसृष्टीचे नियम आणि आडाखेही बदलत चालले होते. एका अर्थाने त्यात व्यावसायिकतेच्या पलीकडची कठोरता येत चालली होती. अशा वेळी त्यातून बाहेर पडण्याचा निर्णय त्यांनी घेतला. नव्या नियमांशी जुळवून घेण्यापेक्षा हा निर्णय अधिक मन:शांती देणारा असेल, असेही त्यांना वाटले असेल कदाचित; परंतु त्यांनी गायन थांबवले आणि त्यानंतर पुन्हा कधी झोतात येण्याची अपेक्षाही बाळगली नाही. कलावंताकडे अशी स्थितप्रज्ञता फारच विरळा. राज्य शासनाचा लता मंगेशकर पुरस्कार मिळाल्याने त्या पुन्हा एकदा पडद्यावर आल्या; परंतु त्यानेही फार बहरून न जाता आपण आपले काम चोख केल्याचे समाधान घेऊनच त्या काळाच्या पडद्याआड गेल्या!