कुवेंपु म्हणजे कुप्पळ्ळी वेंकटप्पा पुट्टप्पा हे कन्नड कवी, नाटककार, कथालेखक आणि टीकाकार. कर्नाटकात १९०४ साली जन्मलेल्या आणि १९९४ मध्ये जगाचा निरोप घेतलेल्या या थोर साहित्यकाराच्या नावाने शिमोग्यात एक विद्यापीठही आहे आणि म्हैसूरमधले त्यांचे राहते घर तसेच कुप्पळ्ळी येथील वाडा आता स्मारक म्हणून जतन करण्यात आला आहे. ‘कुवेंपु प्रतिष्ठाना’ने मानचिन्हांसह पाच लाख रुपयांचा जो राष्ट्रीय पुरस्कार २०१३ पासून सुरू केला, त्यासाठी यंदा श्याम मनोहर यांची निवड जाहीर झाली हे अनेकार्थानी आनंददायी आहे. ‘कुवेंपु कोण?’ या प्रश्नाच्याच चालीवर ‘श्याम मनोहर कोण?’ असेही मराठीत विचारणारे लोक असू शकतात. मराठीत निराळे, वाचनीय लिहिणाऱ्या साहित्यिकांची जितकी नावे माहीत नसतील, तितक्या नावांच्या मोटारगाडय़ा चालवून पाहून त्या गाडय़ांबद्दल अधिकारवाणीने बोलणारा एक वर्ग महाराष्ट्रात आहे आणि तो वाढतोही आहे. त्याहीपेक्षा एक मोठा वर्ग, आधी सांगितलेल्या वर्गासारखे होण्यात एवढा व्यग्र आहे की, त्याला मराठीत काही वाचण्यासाठी उसंतच उरलेली नाही. या दोन्ही वर्गाच्या बाजूचे पण मनोहर असे की, त्या दोन्ही वर्गातल्या प्रत्येकाच्या घरात काय चालले आहे, त्यांची नाती आज कुठे आहेत हे त्यांना कळते. आकांक्षा, इच्छा व्यक्तीच्याच असतात असे पूर्वापार गृहीतक आताशा कसे चुकू लागले आहे हेही मनोहरांना कळते आणि त्याहीपुढे, व्यक्तींचा अहंभाव हादेखील तिच्या लागेबांध्यांच्या आणि लिप्ताळ्यांच्या जाळ्यातील गाठीप्रमाणे असतो, याचा उलगडा ते अलगद करत असतात. निराळ्या शब्दांत सांगायचे तर, अनेकांच्या ‘अहं’ना एकाच वेळी तोलून धरणारी व्यवस्था म्हणजे समाज, हे मनोहर यांनी वाचकांपर्यंत पोहोचवले आहे. यामुळे होते असे की, ‘ही व्यक्ती’ आणि ‘हा समाज’ असा ठोकळेबाज झगडा त्यांच्या कथांमध्ये नसतो, कादंबऱ्यांमध्ये किंवा नाटकांमध्येही नसतो. त्यांच्या कथा/कादंबऱ्यांतल्या व्यक्ती किंवा नाटकांतली पात्रे एकमेकांशी जे बोलतात, त्यातून आपल्याला समाजही कळतो- हे कळणे म्हणजे माहिती मिळणे नव्हे. कळणे म्हणजे ज्ञानच होणे. ‘नॉलेज सोसायटी’सारखे शब्द संगणकोत्तर जगात फार चालतात, पण समाजाचे आणि त्याच्या संस्कृती-सभ्यतेचे माणसामाणसांतून होणारे ज्ञान, ही काही जागतिकीकरणामुळे वगैरे मनोहरांना प्राप्त झालेली सिद्धी नव्हे. समाज साध्या माणसांनी बनतो आणि ही साधी माणसे स्वत:ला जर फसवत असतील, तर सांस्कृतिक विसंगती वाढत जातात.. ते फाटलेपण पाहणे जितके वेदनादायी तितकेच मनोहारी असते, असा प्रत्यय देणाऱ्या त्यांच्या कथा ‘सत्यकथा’ नियतकालिकात येत असत. तेथून ‘कळ’, ‘उत्सुकतेने मी झोपलो’पर्यंत आणि पुढच्याही प्रवासात मानवी अस्तित्व आणि या अस्तित्वाला दिसणारे, भिडणारे, छळणारे, प्रश्न पाडणारे जग यांच्या अनेक रचना मनोहरांनी दाखवल्या आहेत. मनोहरांचा मजला वरचाच आहे, हे कुवेंपु पुरस्काराने पुन्हा सिद्ध झाले इतकेच.