मजबूत मध्यवर्ती सरकार आणि बाजारपेठीय अर्थधोरणास मजबूत मोकळेपणा ही थॅचरबाईंची विचारसूत्री. पंतप्रधान किती ठाम असू शकतात, याचं अलीकडच्या काळातलं उदाहरण म्हणून थॅचरबाईंकडे पाहता येतं. बोटचेप्या राजकारणाला तिलांजली देणाऱ्या आणि योग्य निर्णय घ्यायला न डगमगणाऱ्या थॅचरबाईंच्या राजकारणाचा उल्लेख ‘थॅचरिझम’ म्हणून केला जातो, ते याच कारणासाठी.

राजकारणी म्हणून मार्गारेट थॅचर कधी आवडायला लागल्या हे नक्की आठवत नाही. पण जागतिक राजकारण आवडायला लागणं आणि थॅचर यांचं तिथं असणं हे एकाच वेळी झालेलं असावं. १९८२चं फॉकलंडचं युद्ध निर्णायक ठरलं त्याबाबत. १९७१च्या भारत-पाकिस्तान युद्धाच्या वेळी आमची पिढी अगदीच सहा-सात वर्षांची होती. त्यामुळे त्यावेळच्या युद्धस्य रम्य कथा समजून घ्यायला बराच काळ जावा लागला. आणि त्यातही लक्षात राहिली ती अमेरिकी नौदलातली विमानवाहू नौका भारताकडे कशी येत होती आणि सोविएत रशिया आपल्या बाजूने कसा उभा राहिला..वगैरे. आपल्या विक्रांतची धाडसी कारवाई ही नंतर बराच काळ प्राथमिक शालेय छाती फुगवण्यासाठी उपयोगी पडत होती. पण कळायला लागल्यानंतरचं खरं युद्ध म्हणजे फॉकलंडचं.
त्यात थॅचरबाईंनी मंत्रिमंडळातल्या समस्त वृद्धांना कसं बाजूला सारलं आणि झपाटा दाखवला, हजारो किलोमीटरपलीकडच्या बेटांवर अर्जेटिनाला जो धडा शिकवला, त्यामुळे या बाई मनात घर करून बसल्या. या युद्घानंतर दोनच वर्षांनी आला ब्रिटिश टेलिकॉम, ब्रिटिश एअरवेज आणि ब्रिटिश गॅसबाबतच्या निर्णयांचा धडाका. या कंपन्यांच्या खासगीकरणाचा दट्टय़ा जो बाईंनी लावला, त्यामुळे सगळं चित्रच बदललं. त्याच वर्षी थॅचरबाईंशी ज्यांची तुलना केली जायची त्या आपल्या इंदिरा गांधी यांची हत्या झाली. आयरिश रिपब्लिकन आर्मीनं थॅचर यांनाही मारण्याचा प्रयत्न केला होता. तो जमला नाही आणि आपल्याकडे दहशतवादी यशस्वी झाले ही तुलनाही मनातल्या मनात आमच्या पिढीच्या अनेकांत होत गेली. त्यानंतर काही वर्षांतच मार्क टली आणि सतीश जेकब यांचं अमृतसर नावाचं पुस्तक आलं. पंजाब समस्येवरचं. गोविंदराव तळवलकरांनी त्याचं परीक्षण केलं होतं. त्यामुळे ते वाचणं भागच होतं. तेव्हा ते वाचल्यावर आपल्याकडची फुटीरतावादी चळवळ, त्याला व्यवस्थेतनंच मिळणारं खतपाणी आणि ब्रिटनमधल्या आयआरएसारख्या संघटनेशी लढताना तिथल्या सरकारनं दाखवलेला निर्धार यांचीही तुलना नकळतपणे झाली असावी. तात्पर्य, इतकंच की मार्गारेट थॅचर आवडत गेल्या.
त्या वेळी त्यांची काही पुस्तकंबिस्तकं नव्हती. पण त्यांच्या वागण्यातला र्कुेबाजपणा कौतुकास्पद वाटायचा. राजकारण्यांनी, ज्याला काही कसलं नेतृत्व करायचं आहे त्यांनी हे असं मिजासखोरच असायला हवं..असंही मत बनत गेलं. त्यात कुठेतरी एक जाणवायचं आपल्याकडे नम्रपणाला नको इतकं महत्त्व दिलं जातं. आपल्याला एखादा बदमाश जर लबाड असेल तर चालतो. पण एखादा प्रामाणिक मिजासखोरीमुळे लबाड मानला जातो. ही सांस्कृतिक दांभिकता थॅचरबाईंचं मूल्यमापन करताना मधे यायची आणि थॅचरबाई अधिक खऱ्या असल्याचं लक्षात यायचं. पुढे पत्रकारितेत आल्यावर आपले आणि ते अशी तुलना करायची सवय लागली आणि त्यामुळे थॅचरबाई मोठय़ाच वाटू लागल्या. मग सोविएत रशियात गोर्बाचोव आले आणि त्यांच्या त्या ग्लासनोस्त आणि पेरिस्त्रोयका या शब्दांची भलतीच दहशत त्या वेळी होती. तेव्हा एका बाजूला रोनाल्ड रेगन यांचं हडेलहप्पी राजकारण आणि दुसरीकडे विद्वान अशा गोर्बाचोव यांचं मूलगामी असं राजकारण आणि मधून जागतिकीकरण रेटणाऱ्या थॅचर असं चित्र मनात झालं होतं. मग रशियाचंच विघटन झालं, युरोपीय संघटना आली वगैरे. पण या सगळ्यावर थॅचरबाईंचं मत काय, हे जाणून घ्यायची उत्सुकता होतीच.
ती पहिल्यांदा काही प्रमाणात पुरवली त्यांच्या ‘स्टेटक्राफ्ट’ या पुस्तकानं. साधारण दहा वर्षांपूर्वी ते वाचल्याचं आठवतंय. मार्गारेट थॅचर यांचा युरोपीय संघटनेला विरोध होता आणि त्यातही ब्रिटननं या संघटनेच्या जवळपासदेखील फिरकू नये असं त्यांचं मत होतं. एका अर्थाने ते कालबाहय़ होतं. पण आज या संघटनेची जी काही वाताहत झालीये, ती पाहता ते तितकंसं अयोग्य नव्हतं असंही म्हणता येईल. या पुस्तकाची आणखी एक गंमत म्हणजे थॅचरबाई पुस्तकभर तिसऱ्या जगाविषयी त्यांच्या मनामध्ये एक प्रकारची तुच्छता होती ती दाखवत राहतात. काही आशियाई, आफ्रिकी किंवा अगदी लॅटिन अमेरिकेतीलदेखील देशांना त्यांच्या मते फारशी काहीही किंमत द्यायची गरज नाही. थॅचर यांचं म्हणणं असं की मुळात हे देश स्वतंत्र विचारांचे, स्वातंत्र्याचा पुरस्कार करणारे नाहीत. मजबूत मध्यवर्ती सरकार आणि बाजारपेठीय अर्थधोरणास मजबूत मोकळेपणा ही थॅचरबाईंची विचारसूत्री. ती त्यांनी कधीच लपवली नाही. हे मूल्य राबवणारा त्यांच्या मते एकमेव देश म्हणजे युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका. तेव्हा अर्थातच हे पुस्तक अमेरिकाधार्जिणं आहे याबाबत शंका असायचं काहीच कारण नाही. पण थॅचरबाईंचा एकांगीपणा असा की पुढे जाऊन युरोप हा त्या तुलनेत विश्वास ठेवण्यासारखा नाही, असं त्या लिहितात. त्याचं कारण काय? तर युरोप हा युरोपिअनांनी भरलाय आणि युरोपीय नेहमीच कटकटे असतात.
थॅचरबाई जगाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या काळात पंतप्रधान होत्या. ब्रिटनची इभ्रत दुसऱ्या महायुद्धानं पुसून टाकली होती आणि महासत्तापदाची खुर्ची तर कधीच गेली होती. तरीही केवळ नेतृत्वगुण आणि धडाडी याच्या जोरावर थॅचर यांच्या काळात ब्रिटननं जगाचं नेतृत्व केलं. तेव्हा या पुस्तकात जग दिसतं ते थॅचरबाईंच्या नजरेतून हे साहजिकच म्हणायला हवं. त्यांच्या काही मतांविषयी जरूर आक्षेप असू शकतील. थॅचरबाईंच्या बाबतीत लोकांची टोकाची मतं व्हायची. एक समर्थक तरी विरोधक तरी. तरीही त्यांचं या पुस्तकातलं एक प्रतिपादन वाचून तेव्हाही चमकायला झालं होतं. ते म्हणजे दुसऱ्या महायुद्धानंतरच्या शीतयुद्धात सगळ्यांचीच दमछाक झाली..दोन देश तेवढे सशक्तपणे, समर्थ सत्ता म्हणून पुढे येतील.एक अमेरिका आणि दुसरा चीन.
बाई किती बरोबर होत्या ते आता जाणवतंय. मुळात त्यांच्याविषयी आदर होताच. हे वाचून तो अधिकच दुणावला. तेव्हा त्यांनी काहीही लिहिलेलं वाचणं हे कर्तव्यच बनलं. त्यातूनच गेल्या वर्षी हाती आलं ‘डाउनिंग स्ट्रीट इयर्स’ हे त्यांचं ब्रिटिश पंतप्रधानपदाच्या कारकिर्दीतल्या आठवणींचं पुस्तक. चांगलंच जाडजूड आहे ते. नऊएकशे पानं आहेत. बाईंचं स्वत:वरचं प्रेम इतकं अमाप की ते व्यक्त करायला इतकी जागा लागणारच. बाईंसारख्या स्वभावाच्या व्यक्तीला आपण चुकलोय असं कधीही वाटत नाही. ‘डाउनिंग स्ट्रीट..’मध्ये प्रत्येक पानावर त्याची झलक दिसते.
त्यांच्या पंतप्रधानपदाच्या काळात वेस्टलॅण्ड हेलिकॉप्टरचं एक प्रकरण घडलं होतं. त्यांच्या हुजूर पक्षातच या प्रश्नावर मतभेद होते. (आपल्या सरकारलाही या वेस्टलॅण्डनं नुकतंच छळलं.) ब्रिटिश मालकीची वेस्टलॅण्ड ही हेलिकॉप्टर कंपनी डबघाईला आली होती आणि तिचं काय करायचं हा प्रश्न होता. संरक्षणमंत्री मायकेल हेझलटाइन यांचं म्हणणं होतं ही कंपनी, ब्रिटिश एअरोस्पेस आणि इटलीची ऑगस्टा या तीनही कंपन्यांच्या विलीनीकरणातून एक मोठी कंपनी तयार करायची. थॅचरबाईंना ते मान्य नव्हतं. त्यांना वाटत होतं वेस्टलॅण्डचं विलीनीकरण अमेरिकी कंपनीत करायला हवं. यावरनं उभयतांत इतके तीव्र मतभेद झाले की हेझलटाइन यांना मंत्रिपद सोडावं लागलं. हुजूर पक्षीयांना हवं होतं ते ठाम, मोकळं आणि हवंहवंसं वाटणार नेतृत्व..ते मी दिलं..असं थॅचरबाई लिहितात. पुस्तकात त्या कुठेही मी अमुक केलं..तमुक केलं असं म्हणत नाहीत..सगळे उल्लेख आम्ही असं केलं, आम्ही तसं केलं.असेच.
साहजिकच तसं ते. अशा व्यक्तींसाठी मी हाच आम्ही असतो. कमालीची आत्मकेंद्रितता, गंड वगैरे बाजूला सारून हे वाचायला हवं. पंतप्रधान इतके ठाम असू शकतात याचा विसर आपल्याला गेल्या काही वर्षांत पडला असेल तर..