यशासाठी सातत्य हा मुद्दा नेहमीच कळीचा ठरतो. या घोटीव सातत्याची परिणती मक्तेदारीत होते. मक्तेदारी दिग्गज खेळाडूंचे वर्चस्व सिद्ध करते. मात्र त्याच वेळी जिंकणार कोण याचा आराखडा तयार असल्याने दुसऱ्या फळीची मंडळी कायम प्रतीक्षा यादीतच राहतात. रॉजर फेडरर, राफेल नदाल आणि नोव्हाक जोकोव्हिच हे त्रिकूट आधुनिक टेनिसमधील मक्तेदारीचे स्तंभ. या तिघांच्या तावडीतून ग्रॅण्डस्लॅम जेतेपद सुटण्याची दुसऱ्या फळीतल्या मंडळींची प्रतीक्षा यंदा संपुष्टात आली. क्रोएशियाचा मारिन चिलिच आणि जपानचा केई निशिकोरी यांच्यात जेतेपदाचा मुकाबला रंगला आणि त्यात चिलिचने बाजी मारली. आम्हीही ग्रॅण्डस्लॅम जेतेपद पटकावू शकतो, हा आत्मविश्वास मारिन चिलिच याच्या जेतेपदाने अन्य खेळाडूंना दिला आहे. ग्रॅण्डस्लॅम स्पर्धा म्हणजे टेनिस विश्वाचा गाभा.  चिलिच आणि निशिकोरी दोघांनीही प्रत्येक टप्प्यावर आपली गुणवत्ता आणि कर्तृत्व सिद्ध केले आहे. प्रतिबंधित उत्तेजक सेवन चाचणीत दोषी आढळल्याने चिलिचला गेल्या वर्षी या स्पर्धेत खेळताच आले नव्हते. कायदेशीर लढय़ात तो केवळ तांत्रिकदृष्टय़ा दोषी असल्याने त्याला केवळ चार महिन्यांची बंदी घालण्यात आली. या प्रकरणाने मनोधैर्य खच्ची होऊ न देता गोरान इव्हानसेव्हिक याच्या मार्गदर्शनाखाली चिलिचने जेतेपदापर्यंत वाटचाल केली. जपानमध्ये टेनिसचे मूलभूत धडे गिरवल्यानंतर अमेरिकेतल्या प्रशिक्षणाचा खर्च घरच्यांना परवडणारा नसल्याने शिष्यवृत्तीच्या बळावर निशिकोरीने चौदाव्या वर्षी अमेरिकेतील आयएमजी अकॅडमी गाठली. अत्यंत भिन्न वातावरण, संस्कृती, माणसे या सगळ्यांशी जुळवून घेत निशिकोरीने प्रगत प्रशिक्षण पूर्ण केले. चिलिच आणि निशिकोरी पंचविशीत आहेत. जेतेपदात सातत्य आणण्यासाठी दोघांकडे पुरेसा वेळ आहे. या दोघांची लढत ही दुसऱ्या फळीतल्या टेनिसपटूंच्या पर्वाची मुहूर्तमेढ ठरू शकते. दुसरीकडे ढासळता फॉर्म आणि कारकिर्दीच्या अखेरीस आलेला फेडरर, दुखापतींनी ग्रासलेला नदाल आणि सातत्यात खंड पडलेला जोकोव्हिच, असे चित्र असल्याने त्रिकुटाची सद्दी मोडते आहे. एका कालखंडात या दिग्गजांचा खेळ पाहण्याचे भाग्य टेनिसरसिकांनी अनुभवलेच, पण आता नव्या दमाच्या युवा प्रतिभेला सलाम करण्याची वेळ आली आहे. दुर्दैवाने महिला टेनिससाठी अजूनही ‘विल्यम्स’ हा बुरूज पार करणे अन्य खेळाडूंना शक्य नाही. सौंदर्य, डिझायनर वस्त्रे, मासिकांची मुखपृष्ठे यापेक्षाही खणखणीत खेळ, तंदुरुस्ती आणि वाढत्या वयातही जपलेली अफाट ऊर्जा हे सेरेनाच्या जेतेपदाचे रहस्य आहे. हारजीत कोणाची झाली यापेक्षा दर्जेदार खेळ पाहायला मिळावा, ही टेनिसरसिकांची किमान अपेक्षाही महिला टेनिसपटू पूर्ण करू शकत नाहीत.  एकतर्फी सामने आणि सेरेनाने उंचावलेला चषक या चित्राचीच सवय झाली आहे. टेनिस विश्वाच्या ग्रॅण्डस्लॅम पसाऱ्यात भारत कुठे याचे उत्तर सानिया मिर्झाने दिले आहे. खेळापेक्षा वादविवादांशी जोडल्या जाणाऱ्या सानियाने अजूनही आंतरराष्ट्रीय टेनिससाठी सज्ज असल्याचे सिद्ध केले आहे. सानिया तेलंगणची, भारताची का पाकिस्तानची यावर खमंग चर्चा रंगतात; त्याकडे दुर्लक्ष करीत सानियाने ‘टेनिसपटू’ या तिच्या भूमिकेला सार्थ न्याय दिला आहे. झिम्बाब्वेची साथीदार कॅरा ब्लॅकच्या साथीने खेळणाऱ्या सानियाकडून महिला दुहेरीत जेतेपदाची अपेक्षा होती. मात्र या प्रकारात उपविजेतेपदावर समाधान मानावे लागणाऱ्या सानियाने ब्राझीलच्या ब्रुनो सोरेस या नव्या साथीदारासह खेळताना जेतेपदाची कमाई केली. सानियाच्या खेळाचे कौतुक करायचे, का तिच्यानंतर कोणीच नाही, या प्रश्नाचा वेध घ्यायचा, अशी दुहेरी जबाबदारी भारतीय टेनिस संघटनेवर आहे.