माया अँजलू या अमेरिकन लेखिकेच्या स्मृत्यर्थ काढलेल्या टपाल तिकिटावर दुसऱ्याच अमेरिकी लेखिकेच्या ओळी वापरल्या जातात आणि तीही गप्प राहाते. कलाकृतीवरचा नैतिक अधिकार ही संकल्पना युरोपात मानली जाते. भारतातही कलाकाराला कलाकृतीचे उचित श्रेय घेण्याचा आणि कलाकृतीचे बीभत्सीकरण रोखण्याचा नैतिक अधिकार कायद्याने दिला आहे..  अमेरिका मात्र या नैतिक अधिकाराकडे पाहात नाही!
माया अँजलू.. एक प्रसिद्ध अमेरिकन लेखिका.. अतिशय खडतर आयुष्य पार पाडलेली एक स्त्री.. लेखिका बनण्याआधी तिने एक बार नíतका, पत्रकार, स्वयंपाकी असे अनेक उद्योग पोटापाण्यासाठी केलेले. माया अँजलू विशेष ओळखल्या जातात त्या त्यांनी सात भागांत लिहिलेल्या त्यांच्या आत्मवृत्तासाठी. त्यातला पहिला भाग विशेष प्रसिद्ध पावला ज्याचे नाव होते ‘व्हाय ए केज्ड बर्ड सिंग्स’. त्यांच्या हयातीत त्यांच्या लिखाणासाठी त्यांना अनेक पारितोषिके आणि जवळपास ५० सन्माननीय (ऑनररी) पदव्या बहाल करण्यात आल्या. मे २०१४ मध्ये वयाच्या ८६व्या वर्षी त्या निवर्तल्या. त्यानंतर अमेरिकन पोस्ट खात्याने त्यांच्या सन्मानार्थ एक पोस्टाचे तिकीट काढले. या तिकिटावर अँजलूबाईंचा फोटो आणि एक ओळ होती ती अशी- ‘अ बर्ड डझन्ट सिंग बिकॉज इट हॅज अ‍ॅन आन्सर, इट सिंग्ज बिकॉज इट हॅज अ साँग’. अमेरिकन पोस्ट खात्याच्या म्हणण्याप्रमाणे त्यांनी या तिकिटासाठी ही ओळ निवडली कारण मायाबाई त्यांच्या भाषणात अनेकदा ही ओळ उद्धृत करत असत. शिवाय त्यांच्या आत्मवृत्ताच्या नावाशीही या ओळीचे साधम्र्य आहे आणि म्हणून या तिकिटावर लिहिण्यासाठी त्यांना ही ओळ अतिशय सुयोग्य वाटली.
पण नंतर असा शोध लागला की, जरी या ओळीचा उल्लेख मायाबाई नेहमी करत असत तरी त्याची लेखिका आहे जोन वाल्श आँग्लंड. मुलांसाठी लेखन करणाऱ्या या लेखिकेने ‘ए कप ऑफ सन’ या पुस्तकात या ओळी लिहिलेल्या होत्या. जोन वाल्श आँग्लंड या अमेरिकेत फारशा कुणाला माहिती नसलेल्या. त्या माया यांच्या इतक्या प्रसिद्ध लेखिका तर नक्कीच नव्हेत. या ओळी मी लिहिलेल्या आहेत असे मायाबाईंनी कधीही म्हटले नाही. पण त्या वेगवेगळ्या मुलाखतींमध्ये अनेक वेळेला उद्धृत केल्या. इतक्या की त्या त्यांच्याच असाव्यात असे लोकांना वाटू लागले. स्वत: बराक ओबामा यांनी एका पारितोषिक समारंभात मायाबाईंना सन्मानित करताना त्या ओळींचा उल्लेख केला. म्हणूनच बहुधा अमेरिकेच्या पोस्ट खात्याचा असा गरसमज झाला की, त्या ओळी त्यांच्याच असाव्यात.. त्यांनी त्या तिकिटावर वापरल्या! त्या माया यांच्या नव्हेत हा शोध लागल्यानंतरही पोस्ट खात्याने असे म्हटले की, आम्ही काही आता त्या ओळी काढणार नाही.. त्या तिकिटावर तशाच राहू देणार आहोत. शिवाय जोन वाल्श यांचीही याला काही हरकत नसावी, कारण त्या असे म्हणाल्या की, त्या स्वत: मायाबाईंच्या चाहत्या आहेत. पण समजा जोन यांनी त्यांच्या ओळी त्यांच्या नामनिर्देशाशिवाय छापण्याबद्दल कायदेशीरपणे हरकत घेतली असती तर काय झाले असते?
याचे उत्तर असे आहे की, निदान अमेरिकेत काहीही झाले नसते. कारण कलाकारांचे श्रेय त्यांना दिले जाण्याचा जो नतिक अधिकार कॉपीराइट कायद्यात आहे, त्याला अमेरिकन कॉपीराइट कायदा काहीही भाव देत नाही.
या लेखमालेच्या अगदी सुरुवातीच्या लेखात कलाकारांचे नतिक हक्क त्यांना देण्यात देशदेशांत कशा तफावती आहेत ते आपण पाहिले होते आणि अमेरिका हा असा देश आहे जो कॉपीराइटमधील आíथक हक्कांनाच पूर्ण महत्त्व देतो. पण युरोपीय देशांत मात्र कलाकारांच्या नतिक हक्कांना अतिशय महत्त्व आहे. कलाकाराला निर्मितीमुळे मिळणाऱ्या केवळ भौतिक हक्कांमध्ये- म्हणजे पशांमध्ये- रस नसतो. त्याची खरी इच्छा असते त्याची कलाकृती त्याच्या नावाने ओळखली जावी अशी. ती कलाकृती त्याचे बौद्धिक अपत्य म्हणून गणली जावी अशी आणि म्हणून नामनिर्देशाचा अधिकार हा कलाकाराचा एक महत्त्वाचा नतिक अधिकार युरोपीय देशांत समजला जातो. याशिवाय दुसरा महत्त्वाचा नतिक अधिकार आहे कलाकृतीचे बीभत्सीकरण रोखण्याचा अधिकार.
हे दोन्ही नतिक अधिकार अमेरिकन कॉपीराइट कायदा ओळखतच नाही. भौतिकतेवर आधारलेली अमेरिकन संस्कृती प्राधान्याने विचार करते साधनांचा, पशांचा, वस्तूंचा.. आणि म्हणून कॉपीराइट्सचा विचार करताना तिथला कायदा त्यातून मिळणाऱ्या आíथक अधिकारांपलीकडे पाहत नाही. कलाकाराला त्याचे श्रेय मिळण्याचा (राइट ऑफ अ‍ॅट्रिब्युशन) किंवा आíथक हक्क विकून टाकल्यावरही आपल्या कलाकृतीची अवहेलना किंवा बीभत्सीकरण थांबविण्याचा अधिकार असतो हे अमेरिकन कायद्याच्या खिजगणतीतही नाही आणि म्हणूनच अमेरिकन पोस्ट खाते जे खुद्द अमेरिकन सरकारने चालवलेले एक खाते आहे, ते खुशाल एका कलाकाराचा नतिक अधिकार धुडकावून द्यायला धजावू शकते. याउलट युरोपीय संस्कृती ही चित्रकार, संगीतकार, शिल्पकार यांनी समृद्ध केलेली संस्कृती. त्यांच्या चित्रांवर, शिल्पांवर ही संस्कृती पोसली गेली आणि अजूनही त्यांच्याबाबत इथे प्रचंड कृतज्ञता आहे. म्हणून इथे कलाकारांच्या नतिक अधिकारांना आíथक अधिकारांपेक्षा जास्त महत्त्व आहे.
भारताचा कॉपीराइट कायदाही कलाकारांचा नतिक अधिकार मानतो. आपल्या कॉपीराइट कायद्यात त्याचा स्पष्ट उल्लेख आहे. चेतन भगत यांनी ‘थ्री इडियट्स’मध्ये त्यांचा नामउल्लेख सुस्पष्टपणे न होण्याबद्दल हरकत घेतली होती, ती हाच अधिकार डावलला गेल्यामुळे, तर अमरनाथ सगल यांनी खुद्द भारत सरकारवर त्यांच्या कलाकृतीची अवहेलना केल्याचा खटला केला होता आणि ते तो जिंकलेही होते. भारत सरकारच्या एका खात्याने १९५९ साली अमरनाथ सगल यांची नेमणूक दिल्लीच्या विज्ञान भवनात एक भव्य शिल्प उभारण्यासाठी केली. विज्ञान भवन ही दिल्लीमधील प्रसिद्ध वास्तू. इथे मोठमोठी प्रदर्शने भरत असतात. खुद्द भारत सरकार तिथे किती तरी कार्यक्रम आयोजित करत असते. अमरनाथ सगल यांचे शिल्प विज्ञान भवनाच्या प्रमुख दारातील कमानीत होते, पण १९७९ मध्ये विज्ञान भवनाचे नूतनीकरण करण्यात आले, तेव्हा हे सुप्रसिद्ध शिल्प तिथून काढले गेले.. ते कुठेही सन्मानपूर्वक हलवले गेले नाही. ते तुटून फुटून अक्षरश: त्याचे तुकडे झाले. त्याची अशी अवहेलना झालेली पाहून सगल उद्विग्न झाले, कारण जरी हे शिल्प घडवल्याचा आíथक मोबदला त्यांना मिळाला असला तरी त्यावर अजूनही त्यांचा नतिक अधिकार होता. भारतीय कायद्यातील याच तरतुदीखाली त्यांनी भारत सरकारवर केस केली. ती ते जिंकले आणि त्यांचा नतिक अधिकार डावलण्यात आल्यामुळे त्यांना पाच लाख रुपये इतकी नुकसानभरपाईही मिळाली.
असाच एक प्रकार काही वर्षांपूर्वी भिलाई इथे झाला. जतीन दास हे एक वयोवृद्ध शिल्पकार. भिलाई इथल्या स्टील कारखान्याने त्यांची नेमणूक भिलाईमधील एका चौकात एक भव्य शिल्प उभारण्यासाठी केली. ‘फ्लाइट ऑफ स्टील’ नावाचे हे अवाढव्य शिल्प या चौकात दिमाखाने उभे राहिले. या शिल्पातील एका कुक्कुटामुळे हा चौक मुरगा चौक म्हणून ओळखला जाऊ लागला, पण २०१२ मध्ये दास यांना कुठलीही पूर्वसूचना न देता हे शिल्प तिथून हलविण्यात आले. दास यांनी चौकशी केल्यावर त्यांना सांगण्यात आले, की त्या चौकातून एक उड्डाणपूल जाणार आहे आणि म्हणून हे शिल्प ‘काळजीपूर्वक’ मत्री झू या प्राणी संग्रहालयात हलविण्यात येत आहे. तिथे जाऊन पाहिल्यावर दास यांना त्यांच्या शिल्पाच्या ठिकऱ्या उडालेल्या आढळल्या आणि आता दास याबाबत कोर्टात जाण्याचा विचार करीत आहेत.
एखाद्या कलाकाराला त्याची कलाकृती पोटच्या पोरासारखी प्रिय असते. त्याने ती बनवून कुणाला विकली तरी तिची अवहेलना त्याला कशी सहन व्हावी? त्याच्या कलाकृतीचा अवमान झाला तर भविष्यात त्याला उत्तमोत्तम कलाकृतींची निर्मिती करण्याची प्रेरणा मिळणार कशी? पसे मिळणे न मिळणे हे शेवटी दुय्यम आहे. आपले नाव होणे, आपली कलाकृती आपल्या नावाने ओळखली जाणे, तिचा सन्मान होणे हे सर्वात महत्त्वाचे.. शेवटी कलाकार काय किंवा सर्वसामान्य माणूस काय.. या कौतुकावर जगत असतो.. पशाने पोट भरेल, पण या कौतुकाने आत्मसन्मान जपला जाईल.. आणि माणूस म्हणून किंवा कलाकार म्हणून जगायला प्रेरणा देत राहील! कॉपीराइट कायद्याअंतर्गत असे अन्याय ज्यांच्यावर होतात (विशेषत: अमेरिकेसारख्या देशात) ते कलाकार मनातल्या मनात नक्की असाच आक्रोश करत असतील :
खिशाकडे हात जाताच हसत हसत उठला
पसे नकोत रसिक हो.. जरा अपमान वाटला
पशाशिवायही शाबूत आहे निर्मितीचा कणा
पाठीवरती हात ठेवून फक्त ‘कलाकार’ म्हणा
(कुसुमाग्रजांची क्षमा मागून).
प्रा. डॉ. मृदुला बेळे – mrudulabele@gmail.com

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

*लेखिका औषध निर्माण शास्त्राच्या प्राध्यापिका असून बौद्धिक संपदा कायद्यातील पदवीधर व पेटंट सल्लागार आहेत.

मराठीतील सर्व कथा अकलेच्या कायद्याची बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maya angelou copyright for an artist
First published on: 02-07-2015 at 12:16 IST