मुंबई क्रिकेट संघटनेच्या १७ जागा. त्यांसाठी ३४ उमेदवार आणि त्यांचे भाग्यविधाते असे ३२९ मतदार. निवडणूक म्हणाल तर आकाराने लहानखुरीच, पण अत्यंत महत्त्वाची. याचे कारण या संघटनेच्या हाती असलेली, क्रिकेटच्या अर्थकारणाच्या नाडय़ा हाती ठेवणारी सत्ता. बुधवारी झालेल्या निवडणुकीत या सत्तेची सूत्रे पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे गेली. गेली काही वर्षे हाही तसा एक उपचाराचाच भाग झाला होता, एवढी पवार यांची या संघटनेवरील मांड पक्की होती. यंदा मात्र त्यांना ‘क्रिकेट फर्स्ट’ या गटाच्या डॉ. विजय पाटील यांनी चांगलीच झुंज दिली. त्यांना साथ होती शिवसेनेची. शिवसेनेने मनोहर जोशी यांच्यानंतर यंदा प्रथमच आपला उमेदवार निवडणूक मैदानात उतरविला होता. भाजपचे मुंबई अध्यक्ष आशीष शेलार हेही निवडणुकीच्या मैदानात होते, पण पवारांच्या बाजूने. या विचित्र समीकरणांमुळे निवडणुकीत रंगत आली एवढेच. एरवी ती एकतर्फीच होणार असल्याचे दिसत होते. तसेच झाले. तेव्हा या निवडणुकीच्या निकालाहून त्यानिमित्ताने पुढे आलेले काही मुद्दे अधिक लक्षणीय असून त्यांची चर्चा होणे आवश्यक आहे. त्यातील पहिला मुद्दा म्हणजे खेळ आणि राजकारणी यांचा संबंध. त्यावर अनेकांचा आक्षेप असतो. खेळात खेळाडूच हवेत, राजकारणी नको, असे म्हणण्यात मुळातच समजुतीचा घोटाळा असून, तो समजून घेतला पाहिजे. अभ्यासातील हुशार मुलानेच वर्गाचा मॉनिटर व्हावे असे म्हणण्यासारखे ते आहे. मॉनिटर होण्यासाठी अभ्यासातील हुशारीबाहेरचेही काही गुण आवश्यक असतात. ते ज्याच्याकडे असतील त्याने मॉनिटर व्हावे. हेच क्रीडा संघटनेबाबतही आहे. क्रीडा संघटना सक्षमपणे चालवायच्या असतील तर तेथे राजकीय व्यक्तीच हव्यात, असे पवार म्हणतात म्हणून ते चुकीचे ठरत नाही आणि हे खुद्द पवार यांनी सिद्ध करून दाखविले आहे. पवारांचे राजकारण आणि अर्थकारण हा वेगळा विषय झाला; परंतु एक मात्र खरे की, त्यांनी मुंबई क्रिकेटच्या विकासासाठी काही चांगली कामे करून ठेवली आहेत. वानखेडेवरील क्रिकेट सेंटर, वांद्रे-कुर्ला संकुलातील इनडोअर अकादमी, सचिन तेंडुलकर जिमखाना ही कामे पवारांच्या नावावर आहेत हे विसरता येणार नाही. मात्र याचा अर्थ मुंबई क्रिकेट अगदी विकसित आहे असा नाही. रणजीतील मुंबईच्या संघाचा पूर्वीचा रुबाब राहिलेला नाही. कांगा लीगसारखी स्पर्धा वादात सापडली आहे. पवार यांच्यापुढे खरे आव्हान आहे ते हे. युवा क्रिकेटपटूंसाठी शिडीची पहिली पायरी असलेल्या आंतरमहाविद्यालयीन स्पर्धा वैभवशून्य झाल्या आहेत. क्रिकेटमध्ये आर्थिक लाभाची गणिते महत्त्वाची, परंतु त्यापलीकडेही खेळ म्हणून काही असते हे विसरता कामा नये. पवार यांच्यासारख्या कुशल संघटकाने निवडणूक प्रचारात केलेली भावनात्मक भाषणे ऐकून येथील क्रिकेटपटूंच्या अपेक्षा नक्कीच उंचावल्या आहेत. त्यावर काही काम झाले तर राजकारण्यांच्या मैदान मारण्याला काही अर्थ!