आंतरराष्ट्रीय फुटबॉल संघटना (फिफा) किंवा भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) या आर्थिक सुबत्ता असलेल्या संघटना नेहमीच वादात अडकलेल्या असतात. अगदी गेल्याच आठवडय़ात ‘फिफा’ संघटनेच्या काही पदाधिकाऱ्यांना भ्रष्टाचाराच्या आरोपावरून तुरुंगात धाडण्यात आले तर संघटनेचे १७ वर्षे अध्यक्षपद भूषविलेल्या सेप ब्लाटर यांनी राजीनाम्याची घोषणा केली. आर्थिक सुबत्ता असलेल्या क्रीडा क्षेत्रातील संघटनांवर वर्चस्व प्रस्थापित करण्याकरिता भलेभले आपली प्रतिष्ठा पणाला लावतात. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या पाठोपाठ श्रीमंत गणल्या जाणाऱ्या मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या (एमसीए) पुढील आठवडय़ात होणाऱ्या निवडणुकीतही राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप, शिवसेना, रिपब्लिकन असे साऱ्याच राजकीय पक्षांचे नेते रिंगणात उतरले आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघटनेचे अध्यक्षपद भूषविलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांना मुंबई क्रिकेट असोसिएशनचा मोह काही सुटत नाही. मध्यंतरी भारतीय क्रिकेट मंडळाच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत उतरण्याकरिता त्यांनी चाचपणी करून बघितली. त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचीही त्यांनी म्हणे भेट घेतली होती. पण श्रीनिवासन वा जगमोहन दालमिया या दुहीपुढे पवारांची डाळ काही शिजली नाही. मग पवारांनी अध्यक्षपदाचा नाद सोडून दिला. भारतीय क्रिकेटचे अध्यक्षपद मिळाले नाही तरी मुंबई क्रिकेटचे अध्यक्षपद आपल्याकडे कायम ठेवण्यासाठी पवार पुन्हा पॅड बांधून सज्ज झाले आहेत. मुंबई भाजपचे अध्यक्ष आशीष शेलार, शिवसेनेचे राहुल शेवाळे व प्रताप सरनाईक किंवा रिपब्लिकन पक्षाचे रामदास आठवले हे रिंगणात उतरले आहेत. शेलार हे पवार यांच्या पॅनेलमधून निवडणूक लढवीत असल्याने किक्रेटच्या मैदानात राष्ट्रवादी आणि भाजपची युती झाली आहे. शिवसेनेने भाजपच्या शेलार यांना या निवडणुकीपासून दूर ठेवले. यावरूनही भाजप आणि शिवसेनेत कुरघोडीचे राजकारण सुरू झाले. खेळाच्या राजकारणात पक्षाभिनिवेश बाजूला ठेवले जातात. मग भाजपाचे अरुण जेटली कधी पवार यांना पाठिंबा देतात, तर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या  निवडणुकीत भाजपचे खासदार अनुराग ठाकूर हे पवार गटाच्या पाठिंब्यावर निवडून येतात. काँग्रेसचे राजीव शुक्ला पवार यांच्या पॅनेलमध्ये वर्षांनुवर्षे बरोबर होते. मुंबई क्रिकेटच्या अध्यक्षपदासाठी पवार यांना डी. वाय. पाटील यांचे पुत्र विजय पाटील यांनी आव्हान दिले आहे. शिवसेनेने पाटील यांना पाठिंबा दिला आहे. पाटील यांचे दुखणे वेगळेच आहे. नवी मुंबईत कोटय़वधी खर्च करून स्टेडियम उभारण्यात आले, पण या मैदानात गेली दोन वर्षे कोणतेच महत्त्वाचे सामने आयोजित केले जात नाहीत. किमान ‘आयपीएल’चे सामने भरवावेत, अशी पाटील यांची अपेक्षा असल्याचे बोलले जाते. या संघटनेवर आपले वर्चस्व कायम ठेवण्याकरिता पवार यांनी काही वर्षांपूर्वी विलासराव देशमुख या आपल्या राजकीय विरोधकाला ताकद देऊन निवडून आणले होते. क्रिकेटच्या विकासासाठी मुळात ही संघटना आहे; पण क्रीडापटू पडले मागे आणि राजकारण्यांच्याच हातात मुंबई क्रिकेटची सूत्रे गेली आहेत. यंदाही निकाल काहीही लागला तरी या मुंबई क्रिकेटवर राजकारण्यांचेच वर्चस्व राहणार आहे.