भारतातील सर्वात प्राचीन वैद्यक नीती आयुर्वेदात आढळते.  शरीर व मनास बलवान ठेवणे, वैभव संपादन करणे आणि मोक्षप्राप्ती करून घेणे ही मानवी कर्तव्ये स्पष्ट करताना चरकाने वैद्यक नीतिसूत्रे सांगितली.
‘‘औषधे घेणे टाळण्याचे प्रशिक्षण लोकांना देणे हे डॉक्टरचे आद्य कर्तव्य आहे’’
      – विल्यम ओस्लर (१८४९-१९१९)
    ‘आधुनिक वैद्यकाचा जनक’
 माणूस आणि विविध प्रकारच्या अतिसूक्ष्म ते महाकाय पशुपक्ष्यांचा नतिक मूल्यांच्या दृष्टिकोनातून विचार करणारी उपयोजित नीतिशास्त्राची शाखा म्हणजे जीवनीतिशास्त्र (बायोएथिक्स). मानवेतर पशुपक्षी हे माणसाचे केवळ सहनिवासी नाहीत तर नातेवाईक आहेत, असे जीवनीतिशास्त्र गृहीत धरते. त्यावर आधारित ‘‘जगातील कोणत्याही मानवेतर सजीवाशी माणसाचे कोणते आणि कशा स्वरूपाचे नतिक नाते असावे’’ याचा धोरणात्मक नतिक निर्णय घेते. पृथ्वीवर जीवन कसे सुरू झाले, जीवनाचा अंत कसा होतो, शेतीविषयक संशोधन आणि वैद्यकीय संशोधनाची मूल्ये (वैज्ञानिक आणि नतिक) कोणती? यांचा अभ्यास हे जीवनीतिशास्त्राचे मुख्य विषय आहेत. जीवनीतिशास्त्रातून वैद्यकीय नीतिशास्त्राचा उगम होतो.  
सार्वजनिक आरोग्यविषयक धोरण, जीवनाचा अंत करण्याची नीती, साथीचे रोग, सजीवांचे प्रजनन, मानवी सुप्रजनन (?), प्राण्यांवरील प्रयोग, वैद्यकीय प्रशिक्षणात रोग्यांवर प्रयोग करण्याचे नीतिशास्त्र (क्लिनिकल एथिक्स), क्लोिनग आणि स्टेमसेल, जीवतंत्रज्ञान हे (तसेच नीतिशास्त्र आणि विज्ञान हा व्यापक मुद्दा) हे जीवनीतिशास्त्र आणि वैद्यकीय नीतिशास्त्र यांचे समान विषय आहेत.
हे विषय केवळ माणसापुरते सीमित करण्यात आले तेव्हा मानवी वैद्यकीय नीतिशास्त्र (मेडिकल एथिक्स किंवा ह्य़ूमन मेडिकल एथिक्स) अस्तित्वात आले. त्याच वेळी प्राणिहक्क, प्राण्यांवरील प्रयोग, त्यांचे पृथ्वीवर अस्तित्वात असण्याचे महत्त्व, प्राण्यांचे नतिक व सौंदर्यशास्त्रीय मूल्य (विशेषत: बालकांच्या भावजीवनातील पशुपक्ष्यांचे अविभाज्य स्थान!) इत्यादींचा विचार होऊन प्राणिवैद्यकीय नीतिशास्त्र (अ‍ॅनिमल मेडिकल एथिक्स) अस्तित्वात आले.    
हिप्पोक्रेटिसची (इ.स.पू. ४६०-३७०) शपथ, फॉम्र्युला कोमिटिस अर्कित्रोरम (इ.स.पू. पाचवे शतक) ही आचारसंहिता, रोमन डॉक्टर गालेन (१३१-२०१), इस्लामी परंपरेत इश्क इब्न अल-रुहावी या अरबी वैद्याचा आदाब अल-तबीब हा ग्रंथ, मुहम्मद इब्न झकेरिया आर-राझी आणि ज्यू वैद्य-तत्त्ववेत्ता माईमोनिडेस (११३५-१२०४), थॉमस अक्विनास (१२२५-१२७४) असा वैद्यकीय नीतिविचार सर्व संस्कृतीत आढळतो. थॉमस पर्सव्हि (१७४०-१८०४) या ब्रिटिश डॉक्टरने प्रथम ‘मेडिकल एथिक्स’ आणि मेडिकल ज्युरिसप्रूडन्स हे शब्द वापरले.
वैद्यक व्यवसाय करताना डॉक्टर आणि इतर पूरक सेवा देणाऱ्या प्रत्येक सहकारी घटक व्यक्ती व संस्था यांनी कोणती नतिक मूल्ये आणि नतिक निर्णय उपयोजनात आणावेत, त्याचे मार्गदर्शन करणाऱ्या तत्त्वांची सुव्यवस्था रचना करणे म्हणजे वैद्यक व्यवसायाचे नीतिशास्त्र. वैद्यकाचा इतिहास, धर्मशास्त्र, समाजशास्त्र आणि तत्त्वज्ञान या साऱ्यांचा यात समावेश होतो.
‘वैद्यकनीतीची चार सूत्रे (चतु:सूत्री) नावाने ओळखली जाणारी चार मूलतत्त्वे’ ‘प्रिन्सिपल्स ऑफ बायोमेडिकल एथिक्स’ या ग्रंथात टॉम ब्यूचॅम्प आणि जेम्स चिल्ड्रेस (दोघे विद्यमान) अमेरिकन तत्त्ववेत्त्यांनी दिली आहेत. (१) रुग्णाची स्वायत्तता (उपचार घेण्याचा अथवा नाकारण्याचा रुग्णाचा हक्क), (२) परोपकारभाव (डॉक्टरने केवळ रुग्णाचे हित पाहावे म्हणजेच आíथक लोभ टाळावा), (३) रुग्णाविषयी केवळ शुद्ध व निखळ हितचिंतकवृत्ती (रुग्णाला कोणत्याही परिस्थितीत इजा न करणे) बाळगावी, (४) न्यायबुद्धी (औषधांचा तुटवडा असताना उपलब्ध औषधांचे योग्य वाटप करणे आणि उपचार करताना कोणास कसे किती प्राधान्य द्यावयाचे याचे तारतम्य बाळगणे, म्हणजे रुग्णाबाबत रास्तपणा आणि समता बाळगणे). त्याचप्रमाणे हिप्पोक्रेटिसची शपथ, डॉक्टर-रुग्ण संबंध (पितृत्ववाद- डॉक्टरने रुग्णाचा पिता असणे), डॉक्टर-डॉक्टर संबंध आणि डॉक्टर-समाज संबंध असे मुख्य तीन दृष्टिकोन; विश्वासार्हता आणि सचोटी (रुग्ण व त्याचे नातेवाईक यांना उपचाराची माहिती देणे व त्यांची संमती मिळविणे), रुग्णाची व्यक्ती म्हणून असलेली प्रतिष्ठा, रुग्णाचे हक्क आणि रुग्णाची कर्तव्ये या समस्यांचा समावेश या नीतिशास्त्रात होतो.
विसाव्या शतकाच्या अखेरीस गर्भपात (स्त्रीवादी चळवळीने आणलेला वैद्यकीय नतिक मुद्दा), दयामरण, स्वेच्छामरण, अवयवरोपण, आत्महत्या हे मुद्दे, विकसनशील देशांच्या संदर्भात आरोग्यविषयक उत्पादनांच्या पेटंटची समस्या, औषध उत्पादक कंपन्यांचे राजकारण, वैद्यकीय संशोधनातील पुढील टप्पे (उदा. जनुक संस्करणाची नतिक व वैज्ञानिक स्थिती), तसेच या व्यवसायास आलेले नफेखोरीच्या धंद्याचे स्वरूप,  ग्राहक संरक्षण कायदा हे वैद्यकीय नीतीचे नवे उग्र प्रश्न आहेत.
भारतातील सर्वात प्राचीन वैद्यक नीती आयुर्वेदात आढळते. सृष्टी व जीवन यांच्यासंबंधी एका सुसंगत व समग्र विचारसरणी आयुर्वेदात मांडली आहे. आयुर्वेद हे एकमेव खरे भारतीय विज्ञान आहे. चरक (इ.पू. ३००) सुश्रुत (चरकाचे समकालीन) आणि वाग्भट (सातवे शतक) या तिघांना वृद्धत्रयी, बृहद्त्रयी या नावांनी ओळखले जाते. शरीर व मनास बलवान ठेवणे, वैभव संपादन करणे आणि मोक्षप्राप्ती करून घेणे ही मानवी कर्तव्ये स्पष्ट करताना चरकाने वैद्यक नीतिसूत्रे सांगितली.
भारतात इंडियन मेडिकल कौन्सिलने आचारसंहिता दिली आहे खरी, पण अतिमहागडे वैद्यक शिक्षण, औषध कंपन्यांची जीवघेणी स्पर्धा, विविध पातळ्यांवरील कट-पॅ्रक्टिस ते मृतदेहावर उपचार करण्यापर्यंत अधमपण अनुभवास येते. आरोग्य विमा (मेडिक्लेम)ने तर नवे हितसंबंधी राजकारण व अर्थकारण निर्माण केले आहे. भारतीय आरोग्य सेवा कुटुंबचलित आणि उद्योग समूहचलित ही खासगी आणि सरकारी सेवा ही सार्वजनिक असून दोन्हीकडे व्यापक प्रमाणात प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष लूटमार आहे. ग्रामीण-आदिवासी भागात आणखी वेगळे प्रश्न आहेत. फोरम फॉर मेडिकल एथिक्स सोसायटीचे दि इंडियन जर्नल ऑफ मेडिकल एथिक्स हे त्रमासिक १९९३ पासून सुरू झाले.
प्राणी व्यावसायिक नीतिशास्त्र (व्हेटेरिनरी प्रोफेशनल एथिक्स) आणि प्राणी नीतिशास्त्र (अ‍ॅनिमल एथिक्स) यांनी मिळून प्राणिवैद्यक नीतिशास्त्र बनते. ‘प्राण्यांचे आरोग्य’ हा विषय अ‍ॅरिस्टॉटलपासून तत्त्ववेत्ते आणि वैद्यकजगतात चíचला जात आहे. माणसाने माणसाचे मानवी वैद्यक विज्ञान विकसित करणे, यात वेगळे वैशिष्टय़ नसून माणसाने प्राण्यांच्या आरोग्याची काळजी घेणारे वैद्यक नीतिभान विकसित करणे यात आहे, असे म्हणता येईल.
 ‘वैद्यकाचे तत्त्वज्ञान’ ही नवी ज्ञानशाखा एलिशा बार्टलेट (१८०४-१८५५) या डॉक्टर व कवी विचारवंतांच्या ‘अ‍ॅसेज ऑन दि फिलॉसॉफी ऑफ मेडिकल सायन्स’ या ग्रंथाने सुरू झाली. आधुनिक परिभाषेत लिहिले गेलेला हा जगातील अ‍ॅकेडेमिक स्वरूपाचा पहिला ग्रंथ मानला जातो. ‘वैद्यकाचे तत्त्वज्ञान’ हा विषय तत्त्वज्ञानात येतो की वैद्यकात, याबद्दल बराच खल होऊन ती आता आंतरविद्याशाखीय ज्ञानशाखा मानली जाते. ‘डॉक्टर विचार कसा करतात?’ (हाऊ डॉक्टर्स िथक) या एकाच नावाचे दोन ग्रंथ गेल्या दशकात प्रकाशित झाले. वैद्यकीय मानव्यविद्या संशोधिका कॅथरिन मॉण्टगोमेरी (२००६) आणि डॉ. जेरोमी ग्रूपमन (२००७) यांनी ही पुस्तके लिहिली.
भारतात प्राणिनीतीचा विचार झाला आहे. पालकाप्य मुनीचा हस्त्यायुर्वेद आणि नारायण पंडिताचा मातंगलीला हे हत्तीसंबंधी मोठे वैद्यक ग्रंथ, बकरी, गाय इ. पशुचिकित्सेचा ग्रंथ म्हणजे १४ व्या शतकातील शारङ्गधर पद्धती. त्यातील ‘उपवनविनोद’ हा वृक्षवैद्यक विभाग आणि कुणी राघवभट्टाने लिहिलेल्या वृक्षायुर्वेद नामक ग्रंथाचा उल्लेख ‘आयुर्वेद का इतिहास’ या दुर्गादत्तशास्त्री लिखित पुस्तकात केला आहे, असे लक्ष्मणशास्त्री जोशी सांगतात.
*लेखक संगमनेर महाविद्यालय, संगमनेर येथे तत्त्वज्ञान विभागप्रमुख आणि सहयोगी प्राध्यापक आहेत.  

Loksatta kutuhal Creator of artificial intelligence Judea Perl
कुतूहल: कृत्रिम बुद्धिमत्तेचे रचनाकार – ज्युडेया पर्ल
Why is neem and jaggery consumed during Gudi Padwa 2024
गुढीपाडव्याला कडुलिंब आणि गुळाचे सेवन का करतात? काय आहे कारण, तज्ज्ञांकडून जाणून घ्या….
upsc exam preparation guidance mpsc exam preparation tips in marathi
MPSC मंत्र : सामान्य विज्ञान
27 March Daily Mesh To Meen Rashi Bhavishya
२७ मार्च पंचांग, राशी भविष्य: कुणाच्या नशिबी नात्यांचं प्रेम, सुख व गोडवा तर कुणाची वाढेल डोकेदुखी, आज काय होणार?