मानवाला होणाऱ्या वेदनांपासून आराम पडण्यासाठी आणि रोगांपासून सुटका होण्यासाठी विकसित झालेले औषधशास्त्र हे सध्याच्या जगातील एक सर्वात मोठे औद्योगिक उत्पादनाचे केंद्र बनले आहे. सुमारे ३९ लाख कोटी रुपयांचा जगातील औषधांचा व्यवसाय पृथ्वीवरील माणसांचे जगणे सुखकर करण्याच्या प्रयत्नात असताना औषध विक्रेत्यांनी सायंकाळी सहा वाजल्यानंतर दुकाने बंद करण्याचा घेतलेला निर्णय रुग्णांसाठी जसा आश्चर्यकारक आहे, तसाच समाजाच्या स्वास्थ्यासाठीही हानिकारक आहे. औषधांची विक्री करणे आणि धान्य वा कापडाची विक्री करणे यांत मूलभूत फरक असल्याने ब्रिटिशांनी १९४० मध्ये कायदा करून औषधविक्री करण्यासाठी त्याबद्दलची पूर्ण माहिती असलेल्या पदवीधराकडेच त्याची जबाबदारी सोपवण्याची व्यवस्था केली. अन्न व औषध प्रशासनाने आजवर या कायद्याची अंमलबजावणी करण्यात कुचराई केली. ही चूक दुरुस्त करण्यासाठी शासनाने गेल्या काही महिन्यांत अनेक औषध दुकानांमध्ये तपासणी करून अनेकांचे परवाने रद्द केले किंवा स्थगित केले. यापूर्वी अशी कारवाई झाली नाही, याचे एक कारण औषध विक्रेते आणि अधिकारी यांची हातमिळवणी हे होते. औषध विक्रेत्यांचे म्हणणे असे, की राज्यात फार्मासिस्टचा जो अभ्यासक्रम शिकवला जातो, त्यात रुग्णाशी सल्लामसलत करण्याबाबतच्या अभ्यासाचा समावेश नाही. कायद्यानुसार दुकानात फार्मासिस्ट असल्याचे प्रमाणपत्र असल्याशिवाय दुकानासाठी अन्न व औषध प्रशासन परवानगीच देऊ शकत नाही. आजवर प्रशासनानेच जर अशा परवानग्या दिल्या असतील, तर त्यात विक्रेत्याचा दोष कोणता, असे त्यांचे म्हणणे आहे. यापूर्वी जुलै आणि ऑक्टोबर महिन्यांत औषध विक्रेत्यांनी आपल्या मागण्यांसाठी संप करण्याचे आवाहन केले होते, तेव्हा शासनाने मध्यस्थी करून मार्ग काढण्याचे आश्वासन दिले होते. त्याची पूर्तता झाली नसल्याने केवळ नियमानुसार काम आंदोलन सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, असे औषध विक्रेता संघटनेचे पदाधिकारी सांगतात. औषधविक्री हा एकमेव व्यवसाय आहे, की ज्यामध्ये कमीत कमी सोळा टक्के नफ्याची अधिकृत तरतूद आहे. त्याशिवाय अन्य मार्गाने मिळणारा नफा लक्षात घेतला, तर हे प्रमाण किती तरी पटींनी अधिक होते. अशा वेळी रुग्णाला योग्य ते औषध मिळते आहे ना, हे पाहण्याची जबाबदारी औषध विक्रेत्याने घेतलीच पाहिजे, या शासनाच्या म्हणण्यात काही गैर आहे, असे दिसत नाही. सध्या कोणत्याही औषधांच्या दुकानात औषधांपेक्षा सौंदर्य प्रसाधने, गोळ्या, कॅडबरी यांसारखी उत्पादनेच अधिक असल्याचे दिसते. माणसाच्या वेदनांशी संबंधित असलेल्या या व्यवसायात मूळ कारणापासून होत असलेली ही फारकत बेकायदा तर आहेच, परंतु त्यामुळे समाजाच्या आरोग्याशीही आपले काही देणे आहे, याचे भान सुटत जाते. औषधांच्या दुकानात विक्रेत्याचे काम करणाऱ्या प्रत्येकाला आपण कोणते औषध देत आहोत, याची शास्त्रीय माहिती असणे आवश्यक आहे. ही अट जाचक आहे, असे म्हणता येणार नाही. कमी किंवा जास्त मात्रांची औषधे आणि चुकीची औषधे देण्याचे जगातील एकूण औषधाच्या व्यापारातील प्रमाण सुमारे पन्नास टक्के आहे, ही केवढी तरी चिंतेची बाब आहे. अशा वेळी औषधांची दुकाने ही केवळ नफेखोरीसाठी नसून मानवतेचाही त्याच्याशी निकटचा संबंध आहे, असे मानण्यात काही गैर आहे, असे म्हणता येणार नाही. शासनाने औषध दुकानांवर कडक कारवाई केलीच पाहिजे, कारण त्यामुळेच सामान्यांना काही आधार मिळेल आणि चुकीच्या गोष्टींना आळा बसेल. मात्र, कारवाई करण्यापूर्वी औषध विक्रेत्यांच्या मागण्यांबाबत दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करण्याची जबाबदारीही पार पाडली पाहिजे.