समरसून जगण्याच्या वृत्तीतून, जीवनानुभवातून स्मृतिकोष व त्यातून कलाकृती तयार होतात. कलाकृतींचं रसग्रहण करताना संवेदनानुभव, त्यांच्यामुळे निर्माण होणाऱ्या भावना यांना विस्तारपूर्वक पाहता, समजता येतं.
दर वर्षी उन्हाळय़ाच्या शेवटी, एखाद्या संध्याकाळी अचानक थंड वारा सुटून पाऊस सुरू झाला, सहचरासारखा कायम राहिला की, माझ्या नकळत, माझ्या मनात काही गोष्टी प्रकटतात. या गोष्टी म्हणजे पावसाच्या स्मृती आहेत. कलाकृतींमधील पावसाच्या रूपाच्या स्मृती आहेत. कलाकृती आणि स्मृती यांचं नातं खूप गहिरं आहे.
रोजच्या जीवनात आपण अनेक अनुभव घेत असतो. बहुतेक वेळा रोजचं जीवन म्हणजे काळ-काम-वेगाचं गणित असतं. त्याच्या भरधाव वेगात आपण संवेदनानुभव, त्यांचे तपशील, त्यामुळे निर्माण होणाऱ्या भावना यांना चिरडून टाकतो. (अगदी साधा चहासुद्धा, त्याच्या संवेदनानुभवाकडे लक्ष न देता आपण बहुतेक वेळा पितो. चहाची वेळ झाली म्हणून, सवय म्हणून किंवा भेटीगाठीतल एक पेय म्हणून..) परिणामी बऱ्याच वेळा आपण त्या अनुभवांना केवळ घटना म्हणून पाहू लागतो, लक्षात ठेवतो. मग अचानक कधी तरी, काळ-काम-वेगाच्या गणिताकडून बाहेर आलो, निवांतपणे आपल्या जीवनातील अनुभवांकडे पुन्हा पाहू लागलो, आठवू लागलो, की त्यांचे विविध स्तर हळूहळू उलगडतात. संवेदनानुभव, त्यांचे तपशील, त्यामुळे निर्माण होणाऱ्या भावना यांना अगदी सूक्ष्मदर्शकामधून एखादी गोष्ट बघावी त्याप्रमाणे पाहिल्याचा अनुभव येतो. परिणामी अशा पाहण्यातून अंतर्दृष्टी, एखाद्या विषयाचं गमक समजल्याचा आनंद होतो, ज्ञान प्राप्त होते. या अंतर्दृष्टीला, त्यातून प्राप्त होणाऱ्या ज्ञानाला काळ-काम-वेगाच्या जीवनात काही स्थान असतंच असं नाही. परिणामी या अंतर्दृष्टी स्मृतींच्या रूपात मनात साठत राहतात. स्मृतींचे कोष तयार होतात. त्यातले संवेदनानुभव, अळीने कोषातून रंगीबेरंगी फुलपाखरू म्हणून बाहेर पडावं त्याप्रमाणे कलेमध्ये रूपांतरित होतात. म्हणूनच कलाकृती व स्मृती यांचं गहिरं नातं आहे.
दर पावसाळय़ात ज्या कलाकृतींच्या मधला पाऊस मला आठवतो त्यात संगीत रचना व चित्रं आहेत. सर्वप्रथम पंडित कुमार गंधर्व यांनी निर्मिलेलं आणि अतिशय सुंदरपणे सादर केलेलं ‘गीत वर्षां’! ज्यात उन्हाळय़ाच्या काहिलीने प्रियकराची वाट पाहावी तशी पावसाची आर्त वाट पाहणे. मग घनदाट ढग, विजांच्या कडकडाटासह पावसाचं येणं, त्याचं सुख, पावसाने हळूहळू चराचराला व्यापणे, सृष्टीने नवचैतन्य साकारणे अशा सर्व गोष्टी त्याशी संबंधित भाव, विविध गीतांद्वारे कुमारजी व्यक्त करतात. या गीतांच्या रचनांत विविध लोकगीतं, त्यामागची संगीत परंपरा आदींचे स्रोत इतक्या सुंदरपणे कुमारजींनी गुंफले आहेत की, पावसाळय़ाच्या निमित्ताने निसर्ग व मानव यातील नात्याची घट्ट वीण आपल्याला उमगते.
पाऊस चराचराला सुखावतो व दर पावसाळय़ात आपण पुन:पुन्हा नव्याने प्रेमात पडतो. दूरदर्शनवरील छायागीताच्या काळापासून, दर पावसाळय़ात भेटीला येणारे चित्रपटगीत म्हणजे, अमिताभ आणि मौसमी चटर्जीवर चित्रित झालेलं ‘रिमझिम गिरे सावन सुलग सुलग जाए मन’ हे गाणं हिंदी सिनेमामध्ये नायक-नायिका, प्रेमात पावसात भिजत, नाचत-बागडत असलेली गाणी भरपूर! पण त्या गाण्यात पाऊस केवळ निमित्त! नायिकेच्या भिजण्यालाच जास्त महत्त्व! या गाण्याचं तसं नाही, याच्या चित्रीकरणाची मजाच काही और! हे गाणं म्हणजे पावसाचा एक मस्त दृश्यानुभव. (माहीत नसेल तर यू टय़ूबवर जाऊन पहा.)
संपूर्ण गाण्यात मुसळधार पावसाचं वातावरण, सगळीकडे गडद करडे ढग, ओले चमकणारे रस्ते, पावसाच्या धारा, वाऱ्यामुळे सगळीकडे धुरकट पांढऱ्या रंगाचं बाष्प-धुकं! एकंदरीत गाण्याला मुसळधार पावसाने आलेली मंद दृश्य लय.
हे धुकं इतकं मस्त चित्रित केलंय की, आपण चित्रीकरणाचा रंगीतपणा विसरूनच जातो. गाणं पाहता पाहता ओलेचिंब होतो. या सगळ्या वातावरणात अमिताभ व मौसमी (मौसमीचा अल्लडपणा पाहण्यासारखाच) कमी वस्तीच्या, दक्षिण मुंबईत सभोवतालचं भान विसरून, मस्त भिजत फिरतायत. कधी ओव्हल मैदानात साचलेल्या पाण्यात, कधी एअर इंडियासमोर, मरिन ड्राइव्ह, गेटवे, रेडिओ क्लब, तर कधी अगदी थेट कार्टर रोड. हे दोघंही गाणं गात नाहीयेत. गाणं पाश्र्वभूमीला आहे, नायिकेच्या मनातील भावना व्यक्त करणारं! गाण्याच्या चित्रीकरणाची धुंदी इतकी मस्त आहे की, अमिताभचा सूट-बूट, त्याचं पायी पायी खूप अंतर फिरणं, अशा काळ-काम वेगाच्या वास्तवाचा आपल्याला चक्क विसर पडतो. या गोष्टी तेव्हा लक्षातच येत नाहीत. हीच आहे पावसाची मज्जा!
जे-जेमध्ये असताना जपानमधील १८व्या शतकातील चित्रकार हिरोशिगे याची चित्रं पाहिली. त्यातलं पहिलं चित्रच पावसाचं! ‘अटाकेजवळील
ओहाशी ब्रिज, अचानक पाऊस’ या नावाचं! चित्राची रचना अशी की, आपण एखाद्या खिडकीतून दृश्य पाहतोय असं वाटावं. वरच्या भागात गडद काळे ढग, आपण आणि ब्रिज यामध्ये जोराच्या पावसाच्या धारा. त्यांना अगदी नाजूक, बारीक रेषांच्या पडद्याद्वारे हिरोशिगे दर्शवतो. परिणामी चित्रात पाऊस-वारा यामुळे तयार होणारं दृश्य सुंदरपणे तयार होतं. दूरवर बाष्प-धुक्यातून फिकट दिसणारी नदीकाठची झाडं, नदीच्या प्रवाहात तराफा वाहून नेणारा एकमेव नाविक. त्याखाली काहीसा वळणं घेणारा पूल. पुलावर मोजकीच माणसं आपले पायघोळ कपडे वर उचलून, स्वत:ला छत्रीखाली ठेवत कसेबसे पावसात भिजण्यापासून वाचवत, भिजत आहेत.
चित्रात माणसांचं महत्त्व कमी! कारण पावसाच्या अनुभवाला खूप महत्त्व आहे इथे. या चित्राने असा दंश केला की, मग मी जेवढा मिळाला तेवढा सर्व हिरोशिगे पाहिला. पाहिला आणि अवाक्  झालो, कारण मुसळधार पाऊस, भुरुभुरु पाऊस, पावसात सैरावैरा उडणारा पक्षी, रात्रीच्या मिट्ट काळोखात घुमणारा पाऊस, विजांच्या कडकडाटासह कोसळणारा वादळी पाऊस, बेसावध प्रवाशांना, वाटसरूंना गाठून त्यांची त्रेधातिरपीट उडवणारा पाऊस अशी कित्येक रूपं त्याने त्याच्या चित्रांत आपल्याला दाखवली आहेत. जसजशी मी जपानी चित्रकला बघू लागलो तसतसं मला वाईटही वाटू लागलं, कारण जपानी चित्रं पाहताना, जपानी चित्रकला जीवनाला किती भिडलीय ते लक्षात येऊ लागलं. आपल्याकडील चित्रकला अशा प्रकारे जीवनाला भिडून, समरसपणे जगून व्यक्त होत नाही याची सल होती ती वाढली. मी भारतीय काव्य, संगीत आदींप्रमाणे पावसाला, ऋतूंना, जीवनाला प्रतिसाद देणारं चित्र शोधत होतो. हा शोध हिरोशिगेच्या भेटीनंतर अनेक र्वष चालू होता.
एके दिवशी छायाचित्रकार, चित्रपट निर्माता संदेश भंडारे याच्या फोटोंच्या प्रदर्शनात हा शोध संपला. संदेशने गेली काही र्वष अत्यंत आपुलकीने समाजात एकरूप होऊन, सजग, संवेदनशीलतेनं महाराष्ट्राचं समाजजीवन आपल्याला दर्शवलंय.
त्याच्या एका छायाचित्रात पाऊस सुरू झालाय म्हणून लगबगीने डोक्यावर नांगर घेऊन शेताकडे जाणाऱ्या स्त्रीचा फोटो पाहिला. फोटोत वातावरण पावसाचं, रस्त्याच्या कडेने, पटपट पावलं टाकण्यासाठी पायतल्या चपला हातात घेऊन चालणारी ही, विजेप्रमाणे धक्का देऊन गेली. छायाचित्रात या ‘नायिकेच्या’ चालण्याची लय पावसाच्या धारांमध्ये मिसळून गेलीय. आपल्या मनात शेतकऱ्याच्या कारभारणीची व नांगराची कधीच जोड झालेली नसते. तो संबंधही या छायाचित्रात दिसून येतो. त्यामुळे एक क्षण ती एखाद्या देवतेप्रमाणेही भासते. संदेश अशी दृश्यं, घटना शोधतो का? माहीत नाही! पण गेली कित्येक र्वष त्याची संवेदनशीलता, सामाजिक समरसता, महाराष्ट्राच्या सामान्य जनतेच्या जीवनाविषयीची आस्था, ही त्याच्या छायाचित्रांतून ओसंडून वाहते. त्यातूनच त्याला हे विषय ‘दिसतात’. आपल्याकडील चित्रकलाही या अंगाने जाईल अशी आशा करू या.
समरसून जगण्याच्या वृत्तीतून, जीवनानुभवातून स्मृतिकोष व त्यातून कलाकृती तयार होतात. कलाकृतींचं रसग्रहण करताना संवेदनानुभव, त्यांच्यामुळे निर्माण होणाऱ्या भावना यांना विस्तारपूर्वक पाहता, समजता येतं. अशा रीतीने कलाकृती पाहणं हे एका अर्थी जीवनानुभव पुन:पुन्हा पाहणं असतं. परिणामी कलाकृतींचा अनुभव हा जीवनानुभवाबाबत एका वेगळ्या तीव्रतेच्या स्मृती तयार करतात. स्मृतींतून कलाकृती तयार होऊन, स्मृतींचीच नवनिर्मिती करतात आणि एका अर्थी ‘स्मृतिचक्र’ पूर्ण होतं. कलाकृती आणि स्मृती याचं नातं खूप गहिरं आहे.
लेखक चित्रकला महाविद्यालयांचे अभ्यासक्रम सल्लागार आणि कलासमीक्षक आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

महेंद्र दामले – mahendradamle@gmail.com

मराठीतील सर्व कळण्याची दृश्यं वळणे बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Memorable pictures of rain
First published on: 04-07-2015 at 01:00 IST