05 April 2020

News Flash

व्हिन्सेंट लेनेरो

‘संघटित धर्म गोंधळलेलाच असतो. शुद्धता जपण्यासाठी गतकाळातच राहायचे की वर्तमानकालीन आव्हाने पचवताना स्वत:च पातळ व्हायचे, या पेचात तर धर्म अडकतोच,’ हे ज्येष्ठ मेक्सिकन लेखक व्हिन्सेंट

| December 6, 2014 01:18 am

‘संघटित धर्म गोंधळलेलाच असतो. शुद्धता जपण्यासाठी गतकाळातच राहायचे की वर्तमानकालीन आव्हाने पचवताना स्वत:च पातळ व्हायचे, या पेचात तर धर्म अडकतोच,’ हे ज्येष्ठ मेक्सिकन लेखक व्हिन्सेंट लेनेरो यांचे मत ख्रिस्ती चर्चबद्दल होते. अशा परखड मतांनिशी पत्रकारिता आणि लेखन- म्हणजे कादंबरी, नाटक, पटकथा लेखन तसेच दिग्दर्शनही त्यांनी केले. सव्यसाची लेखनामागे विचाराचा पाया आणि बांधीलकीचा पीळ असावा लागतो, याचे उदाहरण जगण्या-लिहिण्याद्वारे देऊन, परवाच्या ३ डिसेंबर रोजी त्यांचा जीवनप्रवास संपला.
‘या विविधांगी लिखाणासाठी माझी स्तुती वगरे करू नका- खरी गोम अशी, की मी दोन कादंबऱ्या एकाच वेळी सुरू केल्या होत्या आणि १९६५ साली दोन्ही अजिबात पुढे जाईनात इतका मी अडलो, म्हणून नाटक लिहून त्याचा प्रयोगही केला’- हे लेनेरोंचे उद्गार  ‘मेक्सिकन नॉव्हेल कम्स ऑफ एज’ या समीक्षाग्रंथाचे लेखक वॉल्टर लँगफर्ड यांनी, लेनेरोंवरल्या प्रकरणात नोंदले आहेत. आणखीही एक समीक्षाग्रंथ लेनेरोंच्या कादंबऱ्यांबद्दल लिहिला गेला; त्याचे लेखक डॅनी जे. अ‍ॅण्डरसन यांनी सामाजिक टीकाकाराची लेनेरो यांची मूळ भूमिका कादंबऱ्यांतूनही कशी दिसते, हे ३००हून अधिक पानांत सोदाहरण लिहिले आहे. दक्षिण अमेरिकेतील अन्य स्पॅनिशभाषी देशांतले लेखक ‘मॅजिक रिअ‍ॅलिझम’च्या अवगुंठनातून सत्य सुचवत असताना, लेनेरोंनी वास्तव थेटपणे मांडले.
दहा कादंबऱ्या, १४ नाटके व १८ पटकथा असा लेनेरोंचा लेखनपसारा आहे. तरीही, ‘पत्रकार’ ही त्यांची ओळख त्यांनी उतारवयातही नियतकालिकांत वैचारिक लिखाण करून प्रयत्नपूर्वक कायम राखली होती. प्रोसेस्को हे नियतकालिक त्यांनीच स्थापले व दीर्घकाळ चालविले.
 गवंडी काम करणाऱ्यांचे जगणे लेनेरोंनी कादंबरीत मांडले. त्यावर पटकथाही लिहिली आणि ‘ब्रिकबिल्डर्स’ या त्या चित्रपटाला बíलन चित्रपट महोत्सवात १९७७ साली पुरस्कारही मिळाला. पुढे २००२ मध्ये, त्यांची कथा-पटकथा असलेला ‘द क्राइम ऑफ फादर अमॅरो’ हा चित्रपट ऑस्करच्या नामांकनापर्यंत पोहोचला होता. हेरॉड्स लॉ हाही चित्रपट लेनेरोंच्या कथेसाठी गाजला. अन्य अनेक चित्रपट इंग्रजीत आले नाहीत.  कादंबऱ्याही इंग्रजीत कमीच आल्या. नाटके तर स्पॅनिशमध्येच राहिली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 6, 2014 1:18 am

Web Title: mexican writer and journalist vicente lenero
Next Stories
1 व्ही. आर. कृष्ण अय्यर
2 वीणापणी चावला
3 देवेन वर्मा
Just Now!
X