फर्गसन. अमेरिकेतील मिसौरी राज्यातील सेंट लुई नामक शहराचे छोटेसे उपनगर. लोकसंख्या साधारणत: २१ हजार. १९९० मध्ये तेथे ७५ टक्के श्वेतवर्णीय राहत होते. गेल्या २० वर्षांत हे प्रमाण ३३ टक्क्यांवर आले. तेथील कृष्णवर्णीयांची लोकसंख्या कमालीची वाढली. फर्गसन हा त्यांचा जणू घेटोच झाला. आज हा घेटो वर्णभेदविरोधी लढय़ाचे रणमैदान बनला आहे. ९ ऑगस्टला तेथे एका पोलिसाने मायकल ब्राऊन या १८ वर्षीय कृष्णवर्णीय तरुणाला गोळ्या घालून ठार मारले. या उपनगरातील पोलीस दल प्रामुख्याने श्वेतवर्णीय. त्यांनी कृष्णवर्णीयांना हटकणे, त्यांची झडती घेणे, अटक करणे, मारहाण करणे या घटना नव्या नव्हत्या. हे करताना आपण सातत्याने कृष्णवर्णीयांच्या आत्मसन्मानाची हत्या करीत आहोत, याची जाणीवही त्यांना नसावी. एखादी जमात उपद्रवी, घाणेरडी, व्यसनी, समाजकंटक असे ठरविल्यानंतर मग विवेकाची टोचणीही कमी होते. फर्गसनमधील पोलिसांवर आज नेमका हाच आरोप होत आहे. किंबहुना या वर्णद्वेषी दृष्टिकोनामुळेच त्या पोलिसाने मायकलची हत्या केली असे म्हटले जाते. त्या हत्येने तेथील नागरिकांच्या मनात साठून राहिलेल्या संतापाचा उद्रेक झाला. दंगल पेटली आणि पुढे अनेक दिवस हे उपनगर जळत राहिले. पण ही साधी दंगल नव्हती. तिने गेली अनेक वर्षे मनाच्या सांदीकोपऱ्यांत उबत बसलेल्या वंशवादी प्रवृत्ती चव्हाटय़ावर आणल्या. प्यू रिसर्च या संस्थेने या दंगलीच्या पाश्र्वभूमीवर केलेल्या सर्वेक्षणातून तरी हेच दिसून आले. बराक ओबामा यांच्यासारखा कृष्णवर्णीय गृहस्थ अमेरिकेचा अध्यक्ष बनतो याचा अर्थ या देशातील ‘व्हाइट अँग्लो-सॅक्सन’ नागरिकांनी वंशवादाला तिलांजली दिली, असे ज्यांना वाटले त्यांचे डोळे या दंगलीने उघडले. एखादी महिला उच्चस्थानी गेली म्हणजे महिलाराज आले असे नसते. तसेच एखादा कृष्णवर्णीय राष्ट्राध्यक्ष झाला म्हणजे सगळय़ा कृष्णवर्णीयांचा सन्मान झाला असे नसते, ही वस्तुस्थिती या दंगलीने सुस्पष्ट केली. पण त्याहून अधिक म्हणजे ओबामांच्या विजयामुळे अमेरिकेतील ज्या कृष्णवर्णीयांच्या मनात ‘हम हो गए कामयाब’ असा विश्वास निर्माण झाला, त्यांचा पुरता भ्रमनिरास झाला. फर्गसन दंगलीसंदर्भात प्रामुख्याने समाज माध्यमांतून उमटत असलेल्या प्रतिक्रियांतून ही निराशा स्पष्ट जाणवते. तेथील श्वेतवर्णीयांच्या प्रतिक्रिया मात्र नेमक्या याच्या उलट असल्याचे दिसून आले आहे. त्यात आश्चर्याचा काहीच मुद्दा नाही. पण प्यू रिसर्चच्या सर्वेक्षणानुसार, या दंगलीमागील वंशवादाच्या मुद्दय़ाला महत्त्व ‘विनाकारण’ दिले जात असल्याचे तेथील ३७ ते ४७ टक्के गौरवर्णीयांचेच म्हणणे आहे. ही आश्चर्याची बाब आहे. याचे कारण गौरेतरांवर ते गौरेतर आहेत म्हणून काही अन्याय होतो, त्यांना संधी नाकारली जाते, असे या वर्गाला मुळी वाटतच नाही. वर्ण-वंशभेद राहिलाच आहे कुठे? ‘या कृष्णवर्णीयांना ‘अॅफर्मेटिव्ह अॅक्शन’च्या माध्यमातून आरक्षण दिले जाते. सरकारतर्फे त्यांच्यासाठी सामाजिक सुरक्षेच्या योजना आहेत. गुणवत्ता असेल तर त्यांना सर्व प्रकारच्या संधीची दारे खुली आहेत. तेव्हा आता हा प्रश्न राहिलेलाच नाही,’ असे मानणारे हे सर्व लोक आहेत. आणि विशेष म्हणजे असे मानणाऱ्यांमध्ये अमेरिकेतील रिपब्लिकन या उजव्या विचारसरणीच्या पक्षाच्या मतदारांचे प्रमाण अधिक आहे. फर्गसनमधील घटनेने अमेरिकेतील सामाजिक आणि राजकीय विभाजन असे ऐरणीवर आणून ठेवले आहे. मनातला काळोख उजेडात आणला आहे आणि त्यावर उपाय करण्याऐवजी ओबामा प्रशासनाचे हितेच्छू यानिमित्ताने बंदूक नियंत्रण कायद्याच्या गरजेवर प्रवचने देत आहेत. इकॉनॉमिस्टसारखी माध्यमे दंगली कशा आवाक्यात आणाव्यात यावर खल करीत आहेत. फर्गसनच्या दंगलीचा खरा धडा अजून कोणी घेतलाच नाही, असा याचा अर्थ आहे.