चॉकलेट, कॅडबरी अशा ‘खाऊ’चे आकर्षण कोणाला नसते? विश्वभरातील आबालवृद्धांपासून लहान मुले, मुली, ‘टिनएजर्स’ तरुण-तरुणी असे सर्वच या खाऊच्या प्रेमात पडलेले असतात. विलक्षण योगायोग असा की, या चॉकलेट, ‘न्यूटेला चॉकलेट’चा जागतिक स्तरावर मान्यता पावलेला निर्माता मिकेली फेरेरो यांनी आताच झालेल्या ‘व्हॅलेण्टाइन डे’च्या दिवशी, १४ फेब्रुवारी रोजी मॉण्टे कालरे या आपल्या गावी वयाच्या ८८ व्या वर्षी जगाचा निरोप घेतला. इटाली ही त्यांची जन्मभूमी व कर्मभूमीही. न्यूटेला चॉकलेट व रॉशर चॉकलेटचे उद्गाते म्हणून जगभरात त्यांचे नाव मान्यता पावले. तो काळ होता दुसऱ्या महायुद्धाच्या समाप्तीचा. तेव्हा कोकोची मोठय़ा प्रमाणावर कमतरता भासू लागली होती आणि त्याला पर्याय म्हणून मिकेली फेरेरो यांचे वडील पिइट्रो यांनी ‘न्यूटेला चॉकलेट’च्या निर्मितीत लक्ष घातले. पण त्याला मूर्त स्वरूप दिले ते मिकेली यांनीच. १९४९ च्या सुमारास इटालीमधल्या अल्बा या छोटेखानी शहरात न्यूटेलाच्या उत्पादनास सुरुवात झाली. नंतरच्या सुमारे दीड दशकात उत्पादनाच्या या प्रक्रियेने असा काही वेग घेतला की, १९६४ पासून ‘न्यूटेला’ चॉकलेटचा जगभरात डंका वाजला. ‘न्यूटेला’ हे नाव सर्वतोमुखी झाले. ‘न्यूटेला’ या नावाला एवढी लोकप्रियता मिळाली की, इटाली सरकारने त्याच्या सन्मानार्थ एक टपाल तिकीटही जारी केले. मिकेली फेरेरो यांचे ‘न्यूटेला’वरच समाधान झाले नाही. १९६८ मध्ये त्यांनी ‘किंडर’ चॉकलेटची निर्मिती केली. त्यापाठोपाठ, १९७२ मध्ये त्यांनी निर्माण केलेल्या ‘टिक टॅक’ चॉकलेट्सचाही सर्वत्र बोलबाला झाला. इथेच न थांबता फेरेरो यांनी १९८२ मध्ये ‘फेरेरो रोशर’ या चॉकलेटचे उत्पादन सुरू केले. फेरेरो रोशर चॉकलेट्सची युरोप व अमेरिकेतही विक्री होऊ लागली होती.
मिकेली फेरेरो यांनी चॉकलेट आणि तत्सम उत्पादनांवर आपली अशी काही नाममुद्रा उमटविली की, त्यांची ‘फेरेरो ग्रुप’ ही कंपनी जागतिक स्तरावर चौथ्या क्रमांकाची सर्वात मोठी कंपनी ठरली. मागील वर्षी या कंपनीची उलाढाल २३.४ अब्ज डॉलर होती. कंपनीत सध्या २२ हजार कर्मचारी आहेत. जगातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्तींमध्ये फेरेरो यांचा ३० वा क्रमांक होता. स्वत:चे खासगी आयुष्य जपण्यावर फेरेरो यांचा कटाक्ष होता. आपल्या कुटुंबीयांविषयी फारच कमी वेळा त्यांनी माध्यमांशी गप्पा मारल्या होत्या. विशेष म्हणजे, इटालीच्या औद्योगिक वर्तुळापासून त्यांनी स्वत:स दूर ठेवले होते. सभा-समारंभांमध्येही ते फारसे मिसळत नव्हते. असा हा ‘न्यूटेला’चा निर्माता व्हॅलेण्टाइन दिनीच आपल्यातून कायमचा निघून गेला आहे.