ऑस्ट्रेलियाला वेगवान गोलंदाजांची वानवा कधीच नव्हती. डेनिस लिली, जेफ थॉमसन, जेफ लॉसन, क्रेग मॅकडरमॉट यांच्यानंतर ग्लेन मॅक्ग्रा, जेसन गिलेस्पी, ब्रेट ली असे एकामागून एक अव्वल दर्जाचे वेगवान गोलंदाज लाभले; पण त्यानंतर मात्र ऑस्ट्रेलियामध्ये सातत्यपूर्ण वेगवान गोलंदाजांचा अभाव दिसू लागला. अतिप्रयोगशीलतेमुळे वेगवान गोलंदाज संघात जास्त काळ टिकू शकले नाहीत; पण यामध्ये एक वेगवान गोलंदाज संघातील स्थान कामगिरीच्या जोरावर कायम सांभाळून होता आणि तो म्हणजे मिचेल जॉन्सन, ज्याच्या भेदक गोलंदाजीची दखल आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनेही (आयसीसी) घेतली आहे. आयसीसीने यंदाचा सर्वोत्तम क्रिकेटपटू आणि सर्वोत्तम कसोटी क्रिकेटपटू हे पुरस्कार देऊन मिचेलला गौरविले आहे. यापूर्वी २००९ सालीही त्याला आयसीसीचा सर्वोत्तम क्रिकेटपटूचा पुरस्कार मिळाला होता.
क्वीन्सलॅण्डमध्ये एक मिसरूडही न फुटलेला १७ वर्षांचा मुलगा भेदक गोलंदाजी करीत असल्याचे लिली यांनी पाहिले. या डावखुऱ्या गोलंदाजाची गुणवत्ता पाहून त्यांनी त्याला ऑस्ट्रेलिया क्रिकेट अकादमीमध्ये आणले. त्यानंतर जॉन्सन हा नेहमीच प्रकाशझोतात राहिला तो त्याच्या सातत्यपूर्ण कामगिरीमुळे. दुखापतींचा ससेमिरा त्याच्या मागे लागला होताच; पण त्यामधून सावरून त्याने केलेले पुनरागमन वाखाणण्याजोगेच.  फलंदाजावर जवळपास तो धावतच जाताना दिसतो; पण चेंडू टाकल्यावर फलंदाज नेमका कसा त्याचा सामना करतो, हेही आवर्जून प्रत्येक चेंडूगणिक तो पाहताना दिसतो. त्यानुसार त्याचा पुढचा चेंडू फलंदाजाला बुचकळ्यात टाकणारा असतो. जेवढय़ा आक्रमकपणे तो बाऊन्सर टाकून भंबेरी उडवतो, तसाच त्याचा यॉर्करही भल्या भल्यांची यष्टी उडवतो. आपल्या भात्यातील अशा एकामागून एक अस्त्रांचा वापर करीत फलंदाजांना धारातीर्थी पाडणारा जॉन्सन हा सध्याच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सर्वोत्तम गोलंदाजांच्या पंक्तीत आहे.
गेल्या वर्षभरात त्याने कसोटीमध्ये ५९, तर एकदिवसीय सामन्यांत २१ बळी मिळवले. ही कामगिरी ३३ व्या वर्षी आणि तीदेखील वेगवान गोलंदाजाकडून म्हणजे आश्चर्य आहे. सध्या जॉन्सन हा ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजीचा आधारस्तंभ आहे. जर ऑस्ट्रेलियाला विश्वचषकावर मोहोर उमटवायची असेल, तर त्यांच्यासाठी मिचेल हा गोलंदाजीचा हुकमी एक्का असेल, कारण त्याच्याएवढा अनुभवी गोलंदाज ऑस्ट्रेलियाच्या ताफ्यात नाही, त्याचबरोबर तळाला उपयुक्त फलंदाजी करीत जॉन्सनने बऱ्याचदा ऑस्ट्रेलियाला तारले आहे. आयसीसीच्या पुरस्काराने मिचेलचा आत्मविश्वास नक्कीच उंचावला असेल. आता यापुढे जॉन्सन अजून काय करामत करून दाखवतो, याकडेच क्रिकेटजगताचे लक्ष असेल.