सूक्ष्म सद्बुद्धी जागी होणं फार दुर्लभ आहे, असं माउली सांगतात. आता असं पाहा, सद्बुद्धीचं खरं कार्य असतं ते माझ्या जगण्यातील विसंगती दाखवणं आणि त्या दूर करण्यासाठी माझ्यात आंतरिक पालट घडवणं. या जगात खरं पाहता प्रत्येक बुद्धिवंत हाही सूक्ष्म बुद्धी प्राप्त व्हावी म्हणून धडपडत असतो.  त्याचा हेतू आंतरिक पालट घडवणं, हा नसतो तर बाह्य़ जगतात बुद्धीच्या जोरावर आपला प्रभाव पाडणं, हा असतो. अशा बुद्धिवंताला माउली फार सुरेख शब्द वापरतात ‘विचारशूर’! माउली म्हणतात, ‘‘पार्था बहुतीं परीं। हे अपेक्षिजें विचारशूरीं। जे दुर्लभ चराचरीं। सद्वासना।।’’ या बुद्धिवंताला विचार करण्यात मोठी गोडी असते, त्याला सर्व बाजूंचे आणि आपल्या मताच्या विरोधातले विचारही ऐकून त्यांचा प्रतिवाद करण्यास आवडतं. जणू या वैचारिक लढाईत त्याला मर्दुमकी गाजवायला मिळते. त्याची एकच खंत असते ती म्हणजे त्याच्या बुद्धीला मर्यादा असते. या मर्यादेपायी वैचारिक लढाईत तो नेहमी जिंकेलच, याची हमी नसते. म्हणूनच त्याला या चराचरात दुर्लभ अशी सूक्ष्म बुद्धी मिळवण्याची तीव्र इच्छा असते. माउली मात्र सांगतात की, ही सद्बुद्धी अत्यंत दुर्लभ आहे. ती सहजप्राप्य नाही. ‘‘..दुर्लभ जे सद्बुद्धि। जिये परमात्माचि अवधि। जैसा गंगेसी उदधि। निरंतर।। तैसी ईश्वरावांचूनि कांहीं। जिये आणकि लाणी नाहीं। ते एकचि बुद्धि पाहीं। अर्जुना जगीं।।’’ या सद्बुद्धीचे अंतिम ध्येय परमात्मऐक्यताच आहे. त्यामुळेच ती दुर्लभ आहे. गंगेला ज्याप्रमाणे समुद्रात विलीन होण्यावाचून अन्य गती नाही त्याप्रमाणे जिला ईश्वरावाचून अन्य आश्रयस्थान नाही अशी एकमात्र सद्बुद्धीच आहे. ही जागी झाली तर काय घडतं? माउली सांगतात, ‘‘अर्जुना ते पुण्यवशें। जरी अल्पचि हृदयीं बुद्धि प्रकाशे। तरी अशेषही नाशे। संसारभय।।’’ अर्जुना, पुण्याच्या बळाने हृदयात अल्पशी जरी सद्बुद्धी जागी झाली ना, तरी ती उरलंसुरलं संसारभयही नष्ट करते! मग माउली या सद्बुद्धीला फार सुरेख उपमा वापरतात, ‘‘जैसी दीपकळिका धाकुटी। परि बहु तेजातें प्रगटी। तैसी सद्बुद्धि हे थेंकुटी। म्हणों नये।।’’ दिव्याची ज्योत अगदी लहानशी असते पण ती संपूर्ण खोली प्रकाशानं उजळून टाकते, त्याप्रमाणे ही सद्बुद्धी अगदी सूक्ष्म असते पण ती अवघं जीवन उजळून टाकते! तेव्हा केवळ परमात्म्यातच अर्थात शाश्वतातच केंद्रित राहून जीवनातील अशाश्वतता संपवून जीवन उजळवून टाकणारी ही  दुर्लभ अशी जी सद्बुद्धी आहे ती जसजशी जागी होत जाईल तसतसं हृदय आनंदानं भरून जाईल. ते आनंदानुभवात निमग्न झालं की मग स्थूल बुद्धीही परमात्म्यातच केंद्रित होऊ लागेल. मग कुठलं दु:खं? कुठली तळमळ? कुठला सोस? कुठली खंत? मन भौतिकाच्या प्रभावातून निवृत्त होऊन परमतत्त्वात प्रवृत्त होत जाईल. वृत्तींचं वारं थांबेल आणि शांत तेवणाऱ्या दिव्याप्रमाणे बुद्धीही स्थिरपणे परमतत्त्वातच निमग्न राहील. दहा इंद्रिये आणि अकरावे इंद्रिय असलेले मन, या घोडय़ांचे लगाम बुद्धीच्या हातात गेले की मग जीवनाचा रथही योग्य दिशेने अग्रेसर होत राहील.