मायक्रोसॉफ्टच्या याच मध्यवर्ती स्मृतिकक्ष तंत्रज्ञान विभागाचे प्रमुख सत्या नाडेला यांच्याकडे आता बामर यांच्यानंतर मायक्रोसॉफ्टची सूत्रे येत आहेत. एका भारतीयाची इतक्या उच्चपदी नियुक्ती झाल्यानंतरचा बालसुलभ आनंद सध्या आपल्याकडे सर्वत्र साजरा होत असला तरी या आनंदामागील आव्हानाचा आकार समजून घेणे गरजेचे आहे.
तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात कालबाहय़तेचा कटू स्पर्श कधी होतो, ते कळतही नाही. मग ती व्यक्ती असो वा कंपनी. समस्त प्रगत्योत्सुक मानवसमूहाला संगणक साक्षरतेकडे नेणाऱ्या बिल गेट्स यांच्या मायक्रोसॉफ्ट या जगड्व्याळ कंपनीचे सध्या असे झाले आहे. नव्वदीच्या दशकात बिल गेट्स हे आधुनिक यक्षाचे दुसरे नाव होते आणि त्याची यशोगाथा घराघरात प्रेरणास्रोत म्हणून वाचली जात होती. गेट्स म्हणजे कोणी जग बदलवून टाकणारा युगपुरुष आहे अशा कौतुकभरल्या नजरेतून त्यांच्याकडे पाहिले जात होते. जगातील संगणक व्यवहारावर जवळपास १०० टक्के मक्तेदारी गेट्स यांच्या मायक्रोसॉफ्टची होती आणि त्यांच्या संपत्तीच्या कहाण्या या दंतकथा बनून गेल्या होत्या. संगणक विज्ञान हे अत्यंत चंचल असते. १९८९ साली टिम बर्नर्स ली यांनी इंटरनेटचे तंत्र विकसित करून जगभरातल्या संगणकांना जोडले आणि बघता बघता या माहिती महाजालाच्या महाप्रचंड जालात पृथ्वीतलावरील समस्त प्रगत मानवसमूह ओढला गेला. त्याही वेळी वास्तविक गेट्स यांनी पुढचे जग हे इंटरनेटचे असेल असे जगाला बजावले होते आणि एकटादुकटा संगणक हा निरुपयोगीच ठरेल असा इशारा दिला होता. परंतु या संगणक व्यवसायाच्या विस्तारात अडकल्यामुळे असेल वा अन्य कारणाने, गेट्स यांचे या संगणकाच्या जाळय़ाकडे अकारण दुर्लक्ष झाले आणि गुगल या अगदी नवख्या कंपनीने माहिती महाजालाचा ताबा घेतला. यातील विरोधाभास असा की माहिती महाजालात जोडले गेलेले संगणक गेट्स यांच्या मायक्रोसॉफ्टचे. पण महाजालात ते आल्यानंतर बोलबाला मात्र गुगलचा अशी परिस्थिती त्या वेळी निर्माण झाली. गेट्स यांच्या मायक्रोसॉफ्टने संगणकांची प्रणाली विकसित केली, हे तर खरेच. परंतु अशा विकसित संगणकांच्या अस्तित्वाचे प्रयोजन मात्र गुगलने पुरवले. या प्रयोजनाचा आकार इतका उंचावला की त्यामुळे संगणक हा नव्या विश्वरूपाचा पायाचा दगड बनला. असे झाले की एक होते. पायाचा दगड जरी कोणत्याही इमल्याचा आधार असला तरी नंतरच्या वास्तुविकासात पायाच्या दगडाला स्थितिशीलत्व येते. मायक्रोसॉफ्ट्स आणि बिल गेट्स यांना असे गतिशून्यत्व प्राप्त झाले आणि त्यांच्या पायावर संगणकविश्वाने अकल्पित अशी भरारी घेतली. याच काळात आणखी एक द्रष्टी व्यक्ती नव्या संगणकविश्वाला आकार देण्याच्या प्रयत्नात होती. ती म्हणजे स्टीव्ह जॉब्स. गेट्स आणि जॉब्स या दोन भिन्न व्यक्ती आणि प्रकृतीही. शाळेत गृहपाठ कधीही न चुकवणाऱ्या, आज्ञाधारक आणि वर्गात पहिला वगैरे येणाऱ्यांचे प्रतिनिधित्व बिल गेट्स यांच्याकडे जाते तर कल्पक आणि क्रियाशील, आणि म्हणून वांड ठरून शिक्षेसाठी वर्गाबाहेर राहणाऱ्यांचे रूप म्हणजे स्टीव्ह जॉब्स. जगण्याच्या सर्वच या क्षेत्रांत या दोन प्रवृत्तींचा नेहमीच संघर्ष होत असतो. तसा तो या क्षेत्रातही झाला आणि केवळ उपयुक्ततावादी असणाऱ्या बिल गेट्स यांच्या मायक्रोसॉफ्टला स्टीव्ह जॉब्स यांच्या कल्पक, कलात्मक अ‍ॅपल उत्पादनांनी बघता बघता मागे टाकले. संगणक युगात प्रत्येक पिढीने काही ना काही नवी कल्पना राबवून या विश्वाचे क्षितिज विस्तारले आहे. गुगल माहिती महाजालातील सर्वोत्तम वाटाडय़ा बनली तर अ‍ॅपलने ध्वनिचित्राला संगणकाच्या साठवण क्षमतेत आणून एक वेगळी क्रांती केली. खरे तर या दोघांच्याही व्यवसाय विस्ताराचा पाया होता तो गेट्स यांची मायक्रोसॉफ्ट्स. पण संगणकविश्वाची पायाभरणी केल्यानंतर वर उभा राहणारा इमला कसा असेल याचे कल्पनाचित्र रेखाटण्यात गेट्स कमी पडले. वास्तविक तशी संधी त्यांना होती. परंतु २००० साली गेट्स यांच्याकडून कंपनीची सूत्रे हाती घेणारे स्टीव्ह बामर यांच्या पारंपरिक नजरेला ती दिसली नाही. बामर यांच्याकडे जेव्हा मायक्रोसॉफ्टचे सुकाणू आले त्या वेळी अ‍ॅपलचे आयपॅड बाजारात यायचे होते, गुगल सर्च इंजिनला नुकतीच सुरुवात झाली होती आणि अ‍ॅमेझॉनइतकी भव्य होईल याची शक्यताही नव्हती. तरीही यातील प्रत्येकाने आपापल्या कल्पनाशक्तीने मायक्रोसॉफ्टला मागे टाकले आणि गेट्स यांच्या प्रणेत्या कंपनीला यातील प्रत्येकाची नक्कल करावी लागली. अ‍ॅपलच्या आयपॅडला उत्तर देण्यासाठी मायक्रोसॉफ्टने टॅब्लेट पीसी आणला, गुगलकडून मार खाल्ल्यानंतर बिंग हे सर्च इंजिन सुरू केले आणि अ‍ॅमेझॉनने दाखवलेल्या मध्यवर्ती स्मृतिकक्षाची.. क्लाउड कम्प्युटिंग.. वेगळी नक्कल केली. मायक्रोसॉफ्टच्या याच मध्यवर्ती स्मृतिकक्ष तंत्रज्ञान विभागाचे प्रमुख सत्या नाडेला यांच्याकडे आता बामर यांच्यानंतर मायक्रोसॉफ्टची सूत्रे येत आहेत.
एका भारतीयाची इतक्या उच्चपदी नियुक्ती झाल्यानंतरचा बालसुलभ आनंद सध्या आपल्याकडे सर्वत्र साजरा होत असला तरी या आनंदामागील आव्हानाचा आकार समजून घेणे गरजेचे आहे. तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपनी प्रचंड मोठी झाल्यावर तिचे उद्दिष्ट केवळ महसूल वा नफा हेच नसते. मायक्रोसॉफ्टचेही ते नाही. त्याची काळजी करण्याचेही कारण या कंपनीस अद्याप नाही. कारण या कंपनीचा महसुलाचा ओघ अद्यापही सशक्त असून जगातील अतिबलाढय़ समूहांत तिची गणना होते. इतकी उंची गाठल्यानंतर समूहास महसुलापेक्षा अधिक काही लागते. ते म्हणजे प्रयोजन. आपले तंत्रज्ञान, आपण बाजारात आणलेल्या कल्पना यांनी बाजारपेठेची कल्पनाशक्ती काबीज केल्याचे पाहण्याचा आनंद महसुलाच्या आकडय़ापेक्षा मोठा असतो. मायक्रोसॉफ्टचे दु:ख हे की ही कंपनी तो आनंद घालवून बसलेली आहे. गेल्या दोन दशकांत या कंपनीने जी काही उत्पादने आणली ती केवळ स्पर्धेत टिकून राहण्याच्या मिषाने. या कंपनीच्या उत्पादनांनी स्पर्धा घडवून आणली असे झालेले नाही. म्हणजेच या कंपनीवर बाजारपेठीय रेटय़ाच्या मागे फरफटत जाण्याची वेळ आली असून तीपासून मुक्ती घेत, स्वत:ला वेगळे करून पुन्हा एकदा आघाडी घेणे हे सत्या यांच्यासमोरील आव्हान असणार आहे. याचाच दुसरा अर्थ असा की मायक्रोसॉफ्ट केवळ कालसुसंगत ठेवणे हे उद्दिष्ट ठेवून त्यांचे भागणार नाही. तर काळाच्या पुढे पाहणारी, काळास आकार देणारी उत्पादने आणि कल्पना अमलात आणणे हे ध्येय त्यांना डोळय़ासमोर ठेवावे लागणार आहे. ते साध्य करणे त्यांना जमणार नाही, असे मानण्याचे काहीही कारण नाही. तरीही या संदर्भातील एक घटना नमूद करावयास हवी. ती म्हणजे खुद्द बिल गेट्स यांचे पुनरागमन. गेली काही वर्षे गेट्स यांनी कंपनीपासून फारकत घेतली होती. सत्या नाडेला यांची मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नेमणूक केली जात असतानाच गेट्स यांनी स्वत: कंपनीच्या कार्यात लक्ष घालण्याचे ठरवले असून इतक्या वर्षांचे निष्क्रिय अध्यक्षपद सोडून कंपनीच्या नवीन उत्पादनांचे तांत्रिक सल्लागार म्हणून काम करण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे. बिल गेट्स यांनीच या संदर्भात घोषणा केली असून आपला धर्मादाय कामांचा वेळ आपण कमी करून कंपनीत लक्ष घालणार असल्याचे म्हटले आहे. गेट्स कंपनीच्या दैनंदिन कामकाजात लक्ष घालणार नसले तरी आगामी काळात कंपनीने नवीन काय करावे, कोणती उत्पादने आणावीत यावर त्यांचेच नियंत्रण राहणार आहे.
सत्या नाडेला यांच्या नियुक्तीचा आनंद साजरा करताना या आनंदाच्या कारणांमागील सत्यासत्यतेचे भान आपणास असावयास हवे. वास्तवापासून फारकत घेणारा आनंद स्वप्नभंग करणारा असतो. असा आणखी एक स्वप्नभंग मायक्रोसॉफ्टला परवडणारा नाही. ते पाप सत्या नाडेला यांच्याकडून न घडो, हीच इच्छा.