‘फ्लाइंग सीख’ अशी ख्याती मिळवलेल्या मिल्खा सिंग यांना अ‍ॅथलेटिक्समध्ये कारकीर्द करताना जे विलक्षण अनुभव आले, त्या अनुभवांची ‘द रेस ऑफ माय लाइफ’ ही कहाणी आहे. आयुष्याच्या सुरुवातीस व कारकीर्द घडत असताना मिल्खा सिंग यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागले. त्यामुळे हे आत्मचरित्र ज्यांना खेळात कारकीर्द करावयाची आहे, त्यांच्यासाठी  एक प्रेरणादायी मार्गदर्शक आहे.  
पाकिस्तानातील बालपण, शाळेत जाताना करावी लागणारी कसरत, मुलांनी शिकून मोठे व्हावे यासाठी त्यांच्या आई-वडिलांना करावा लागलेला संघर्ष वाचताना लक्षात येते की, अव्वल दर्जाचा खेळाडू होण्यासाठी आवश्यक असणारी जिद्द, चिकाटी व चिवटपणा या गोष्टी मिल्खा सिंग यांनी बालपणीच आत्मसात केल्या. फाळणीच्या वेळी त्यांच्या आई-वडिलांची झालेली हत्या, त्यांच्या गावात झालेला नरसंहार याचे वर्णन वाचताना माणसे धर्माध झाल्यानंतर किती क्रूरपणे वागतात, याची कल्पना येते. निर्वासितांच्या छावणीत पोट भरण्यासाठी करावा लागलेला संघर्ष, बहीण इसरत हिच्या शोधासाठी केलेली तडफड, तरुणपणी झालेला तुरुंगवास.. आपल्याला सोडवण्यासाठी इसरत हिला दागिने विकावे लागले, या उपकारांचे ओझे सतत डोक्यावर ठेवतच मिल्खा सिंग यांनी वाटचाल केली. केवळ एक ग्लासभर दूध जास्त मिळविण्यासाठी त्यांनी शर्यत जिंकण्याकरिता केलेला आटापिटा, सेनादलात खेळाडू म्हणून सुरुवातीस आलेल्या अनेक अडचणी, अन्य काही खेळाडूंकडून झालेला त्रास, एक पाय जायबंदी असूनही भारतीय संघात स्थान मिळविण्यासाठी केलेली जीवघेणी शर्यत, एरवी सरावास वेळ मिळत नाही म्हणून रात्री भोजनाच्या वेळी किंवा पहाटे उठून केलेला सराव.. या सर्वातून ध्येय साकार करण्यासाठी मिल्खा सिंग यांची जिद्द प्रतीत होते.
भारतीय संघात स्थान मिळवल्यानंतर मेलबर्न येथे १९५६ मध्ये झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेतील पराभवाची बोच मिल्खा सिंग यांना अस्वस्थ करत होती. पाठीला टायर बांधून, डोंगर-दऱ्याखोऱ्यांमध्ये धावण्याचा सराव करणे ही काही सोपी गोष्ट नाही. अनेक वेळा अनवाणी केलेला सराव, नाकातोंडातून रक्त आले तरी सरावात खंड पडू नये यासाठी मिल्खा सिंग यांनी केलेली धडपड वाचताना आपण हरखून जातो.
पंडित जवाहरलाल नेहरू यांच्याशी मिल्खा सिंग यांची दोन-तीन वेळा भेट झाली. नेहरू व त्यांच्या कुटुंबीयांविषयी मिल्खा सिंग यांना खूप आदर आहे. पाकिस्तानातील शर्यतीत सहभागी होण्यास मिल्खा सिंग सुरुवातीला तयार नव्हते. खुद्द नेहरू यांनी हस्तक्षेप केल्यानंतर मिल्खा सिंग येथील शर्यतीत सहभागी होण्यास तयार झाले. हा प्रसंगही चांगल्या पद्धतीने मांडला आहे. पाकिस्तानातील मित्रत्वाच्या स्पर्धेस जाताना त्यांना वाघा सीमेजवळ देण्यात आलेला निरोप, पाकिस्तानात त्यांचे झालेले भव्य स्वागत, प्रत्यक्ष स्पर्धेच्या वेळच्या वातावरणाचे वर्णन वेधक झाले आहे. या शर्यतीपूर्वी मिल्खा सिंग यांचे तेथील मौलवीबरोबर झालेले संवाद खुमासदार आहेत. ही मित्रत्वाची स्पर्धा असली तरी येथेही पाकिस्तानी मौलवी काय किंवा राजकारणाशी एरवी संबंध नसलेले प्रेक्षक काय,  मिल्खा सिंगचा पराभव व्हावा व पाकिस्तानी धावपटू जिंकावा अशीच अपेक्षा करत होते, हे अप्रत्यक्षरीत्या  नमूद केले आहे.
सेनादलातल्या नोकरीनंतर नेहरूंवरील आस्थेचा विचार करून मिल्खा सिंग यांनी नवीन खेळाडू घडवण्यासाठी पंजाबच्या क्रीडा खात्यातील नोकरीचा स्वीकार केला. ही जबाबदारी पार पाडताना त्यांनी सुरू केलेल्या अनेक योजनांची माहिती या पुस्तकात दिली आहे. क्रीडा खात्यात काम करणाऱ्यांना ही माहिती खूपच उपयुक्त ठरणारी आहे. एखादी सक्षम व्यक्ती जोपर्यंत पदावर असते, तोपर्यंत त्याच्या योजना यशस्वीरीत्या राबवल्या जातात. त्याचा उत्तराधिकारी त्या चालवेल की नाही याबाबत साशंकता असते. मिल्खा सिंग यांनी सुरू केलेल्या योजना त्यांच्या निवृत्तीनंतर सुरू राहिल्या नाहीत. त्याचा अनिष्ट परिणाम पंजाबच्या क्रीडा क्षेत्रावर झाला. त्यामुळे मिल्खा सिंग यांना खूप मानसिक त्रासही झाला.
हातातोंडाशी आलेली पदकाची संधी हुकल्यानंतर मिल्खा सिंग यांना झालेले दु:ख या पुस्तकातून अनेक वेळा येते. ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेत पदक मिळवण्यासाठी वर्षांनुवर्षे तपश्चर्या करावी लागते, मेहनत करावी लागते. पदकाची लढाई मी गमावली, मात्र तुम्ही हे युद्ध जिंकले पाहिजे, असाच संदेश त्यांनी आपल्या पुस्तकाद्वारे दिला आहे. भारतीय क्रीडा क्षेत्राविषयी त्यांना असलेली आस्था या पुस्तकातील विविध प्रकरणांमधून स्पष्ट होते.
हे पुस्तक कदाचित अन्य इंग्रजी आत्मचरित्रांइतके अलंकारिक नसले तरी एखादा खेळाडू प्रतिकूल परिस्थितीशी संघर्ष करत आपली कारकीर्द कशी घडवतो, याची समर्पक कहाणी यात आहे. त्यामुळे केवळ अ‍ॅथलेटिक्स नव्हे तर अन्य क्षेत्रांमध्येही कारकीर्द करू इच्छिणाऱ्यांकरिताही हे पुस्तक मार्गदर्शक ठरू शकेल.
द रेस ऑफ माय लाइफ : मिल्खा सिंग,
प्रकाशक- रूपा पब्लिकेशन्स, नवी दिल्ली,
पाने : १५०, किंमत : २५० रुपये.

mpsc mantra study current affairs State National International Level Events
mpsc मंत्र: चालू घडामोडी अभ्यासाचा ‘आधार’
The Kerala Story screening in church
‘लव्ह जिहाद’चं कारण देत विद्यार्थ्यांना दाखवला ‘द केरला स्टोरी’ चित्रपट; केरळच्या चर्चमधला प्रकार!
Pune Police Arrest Nigerian Woman in Mumbai for Mephedrone Smuggling
मेफेड्रोन तस्करी प्रकरणात पुणे पोलिसांची कामगिरी; मुंबईत नायजेरियन महिलेला अटक
gaanewali program at tarun tejankit
सक्षम भविष्याचे स्वप्न सत्यात उतरवणाऱ्या प्रज्ञेचा सन्मान