मन आणि बुद्धी यांचं ऐक्य झालं आणि त्यायोगे चित्ताचं समत्व साधलं की मग चित्ताला अखंड प्रसन्नता प्राप्त होते. मग तिथे संसारदु:खांची तमाच उरत नाही. पोटातच जर अमृताचा झरा वाहू लागला तर जशी तहान-भुकेची चिंताच उरणार नाही, त्याप्रमाणे- तैसें हृदय प्रसन्न होये। तरी दु:ख कैचें कें आहे। तेथ आपैसी बुद्धि राहे। परमात्मरूपीं।। जर हृदय प्रसन्न असेल तर दु:ख उरणार नाही आणि मग बुद्धी आपोआप परमात्मरूपात स्थिर राहील. मग वारं नसलेल्या ठिकाणी दिवा जसा शांतपणे तेवतो त्याप्रमाणे वृत्तीचं वारं नसेल तिथे मन, चित्त, बुद्धीला कोणताही कंप उरणार नाही आणि स्थिरबुद्धीने हा योगयुक्त स्वस्वरूपात राहील. जैसा निर्वातींचा दीपु। सर्वथा नेणे कंपु। तैसा स्थिरबुद्धि स्वस्वरूपु। योगयुक्त ।।  तेव्हा आपण ज्या दोन ओव्या पाहात आहोत, तिथे परतलो आहोत. या दोन्ही ओव्यांत दोन गोष्टींना अत्यंत महत्त्व आहे. पहिली म्हणजे हृदय प्रसन्न होणं आणि दुसरी गोष्ट म्हणजे बुद्धी स्थिर होणं! इतकंच नव्हे तर हृदय प्रसन्न झालं तर बुद्धी आपोआप स्थिर होईल, असंही म्हटलं आहे! आता बुद्धीचं काम आहे विचार करणं, निर्णय घेणं, निवड करणं. आपण आपापल्या बौद्धिक क्षमतेनुसार विचार करतो, निर्णय करतो, निवड करतो. पण याचा अर्थ आपला विचार, आपला निर्णय, आपली निवड योग्यच असेल, असे मात्र नाही! योग्य विचार, योग्य निर्णय, योग्य निवड करणारी बुद्धी ही सूक्ष्म सद्बुद्धीच असते. काही वर्षांपूर्वी ‘मनाच्या श्लोकां’वर चिंतन सुरू होतं. वाटलं, अकराव्या श्लोकात मोठं रहस्य आहे. तो श्लोक होता, जनीं सर्व सुखी असा कोण आहे, विचारी मना तूचि शोधूनि पाहे। यात प्रश्न आहे की, या जगात सर्वात सुखी कोण आहे, हे मना तूच विचार करून पाहा. याच श्लोकात उत्तरही आहे की, जगात सर्वात सुखी कोण आहे? तर हे विचारी मना, तूच सुखी आहेस! जे मन विचार करतं, तेच सुखी आहे. माझं हे चिंतन ऐकून श्रीसद्गुरू हसून म्हणाले, ‘‘विचार तर काय वेडाही करतो, कैदीही करतो, दुष्प्रवृत्त माणूसही करतो. पण म्हणून काय तो सुखी असतो? तेव्हा सुख हे माणूस कोणता विचार करतो, यावर अवलंबून असतं. जो भगवंताचा विचार करतो, तोच सुखी असतो!’’ किती महत्त्वाची गोष्ट आहे ही. दिवसरात्र भौतिकातच गढलेली, भौतिकाच्याच चढउतारात अडकलेली, भौतिकाबरोबरच फरपटणारी बुद्धी ही मला जगण्याचं वास्तव रूप जाणवून देऊ शकत नाही.  परमात्मकेंद्रित सद्बुद्धीच मला भानावर आणू शकते. जोवर ही सद्बुद्धी जागी होत नाही तोवर जीवनाला खऱ्या अर्थानं परिपूर्णता नाही. जिथे परिपूर्णता नाही, अर्थात अपूर्णता आहे तिथे दु:ख आहेच! आता गंमत पाहा, सद्बुद्धी प्रत्येकात आहे, तरीही ती दुर्लभ मानली जाते. कारण ती स्थूल देहबुद्धीच्या ढिगाऱ्याखाली दबली आहे. सद्गुरू जेव्हा जीवनात प्रवेश करतात तेव्हाच सद्बुद्धीवरील हे थर किंचित निघू लागतात. ‘मी’पणा निघू लागला की ‘जुने ठेवणे’ आकळू लागतं. हृदयाला प्रसन्नतेचा अनुभव जसजसा येऊ लागतो तसतशी दु:खाच्या ओझ्यातून सुटलेली बुद्धी परमात्मरूपात केंद्रित होऊ लागते.