आपले महाराज चमत्कार करीत नाहीत आणि त्यामुळे त्यांना लोक मानणार तरी कसे, अशी सुप्त खंत एका साधकानं स्वामी स्वरूपानंद यांच्याकडे कशी व्यक्त केली, हे आपण गेल्या भागात पाहिलं. गंमत पाहा, ती खंत व्यक्त करताना पहिल्याच वाक्यात त्या साधकानं स्वामींचा अर्थात सद्गुरूंचा सर्वात मोठा, शाश्वत आणि खरा चमत्कार सांगितला! या साधकाचं पहिलं वाक्यच होतं की, ‘‘आपला अनुग्रह घेतल्यापासून मला अंत:समाधान खूप लाभलं आहे, पण..’’ या ‘पण’नंच हा चमत्कार झाकून टाकला. हा चमत्कार म्हणजे ‘अंत:समाधान’! आपली सारी धडपड बाहेरून चांगलं होण्याची, चांगलं दिसण्याची, चांगलं वाटण्याची आहे. आत? आत सगळा गोंधळ आहे, अस्वस्थता आहे, असमाधान आहे. मग आतच  जर असमाधान आहे तर बाहेरून किती काळ समाधान ‘दाखवता’ येईल? तेव्हा भौतिकाच्या ओझ्याखाली पूर्ण दबलेल्या जिवाच्या आतून समाधानाचा प्रवाह निर्माण करणं, त्याला अंत:समाधानाचा अर्थात आंतरिक समाधानाचा अनुभव देणं आणि तो टिकवणं, हा काय सामान्य चमत्कार आहे? ही प्रक्रिया काही सोपी नसते. ती अगदी सूक्ष्म आणि संथ असते. आज बी पेरलं तर दुसऱ्याच दिवशी काही डेरेदार वृक्ष उगवत नाही. इथे तर आसक्तीच्या डेरेदार वृक्षाला पुन्हा शुद्ध बीजात रूपांतरित करायचं आहे! पंधराव्या अध्यायातला पहिला श्लोक आठवतो. ‘उध्र्वमूलमध:शाखम्..’  वर मुळं आणि खाली फांद्या असलेला वृक्ष! गीतेतला आणि ज्ञानेश्वरीतला या श्लोकाचा अर्थ वेगळा आहे, पण का कोण जाणे, या रूपकाचा अर्थ नेहमी वेगळाच भासतो. आपण पाहातो ते वृक्ष कसे असतात? तर मुळं जमिनीत आणि जमिनीवर डेरेदार वृक्ष. इथे वर मुळं आणि खाली झाड म्हटलं आहे. हा ‘वर’ म्हणजे डोकं! डोक्यात मुळं असतात. आसक्तीची मुळं. अमुक करावं, तमुक व्हावं, आवड-निवड आणि त्यानुरूप कृतीचा विचार, हे सारं काही वर डोक्यात असतं. त्या आसक्तीनुरूप, विचारानुरूप मग प्रपंचाचा अर्थात आसक्तीचा दृश्यरूप असा वृक्ष खाली पसरत जातो. माझ्या ज्ञानेंद्रियांमार्फत, कर्मेद्रियांमार्फत होणारी सारी र्कम ही जणू त्या वृक्षाचा विस्तार असतो.  मग डोक्यात जर परमतत्त्वाचं चिंतन रुजलं तर? मग तिथली मुळंही शुद्ध चिंतनाचा रस शोषू लागतील. मग खाली जो विस्तार होईल तोही अनासक्त भक्तीचा, सेवेचा, सद्गुरूबोधानुरूप जगण्याचाच असेल ना? ज्याच्या डोक्यातली मुळं आसक्तीचाच रस शोषून घेत आहेत आणि त्यानुसारच डवरत आहेत त्यांना अनासक्तीचा रस द्यायचा आणि त्यानुसारच अनासक्त जीवनाचा आदर्श उभा करायचा, ही प्रक्रिया मग किती दीर्घ, किती व्यापक असेल! ही प्रक्रिया पार पाडण्याचं कर्म जो अखंडपणे, सहजतेनं साधत असतो तो सद्गुरू प्रत्यक्षात कर्तेपणाचा लेशमात्र भाव न चिकटलेला अखंड कर्ता, धर्ता, त्राता आणि हर्ताही असतो. आसक्तीत गुंतलेल्या जिवाला अंत:समाधानाप्रत नेण्याची त्याची ही जी प्रक्रिया आहे, ती किंचित जाणण्याचा प्रयत्न करू. त्यासाठी आपल्या कर्माकडेही थोडं पाहावं लागेल.