एकखांबी तंबूला वेळेवर टेकू लावले नाहीत तर तो डळमळीत होतो. पण त्या तंबूला सावरणारा खांब मात्र आपल्याच तोऱ्यात उभा असतो. मग दुरुस्तीलाही पुरेसा वेळ मिळत नाही, आणि जे व्हायचे, ते होते. त्यामुळे एक तर एकाच खांबाला पेलवेल एवढाच तंबूचा डोलारा असला पाहिजे, किंवा कोणत्याही वादळवाऱ्यात तंबू सहजपणे तग धरेल एवढे टेकू तरी उभे केले पाहिजेत. हा व्यवहारातील नियम आहे. म्हणूनच राजकारणातील एकखांबी तंबू डळमळीत झालेले दिसतात. असे काही तंबू महाराष्ट्रात मोठय़ा दिमाखात उभे राहिले आणि त्यामध्ये राजकीय कसरतीचे खेळही सुरू झाले. लोकांना काही काळ या खेळांची भुरळ पडली. पण तोच तोच खेळ पाहून कंटाळा येऊ लागल्यावर लोकांनी पाठ फिरवली. तंबू सुनासुना झाला आणि तंबूत बसून जनाधाराची प्रतीक्षा करणाऱ्यांनाही कंटाळा येऊ लागला. मग ‘खेळती हवा’ हवीहवीशी वाटू लागली आणि बघताबघता एकखांबी तंबू रिता झाला. दुसऱ्या एका तंबूला मात्र, वेळेची गरज पाहून टेकू लावले जात होते. त्या तंबूत नवा खेळ सुरू होताच लोकांची गर्दी तिकडे वळली आणि एकखांबी तंबूतील रिकामटेकडय़ांचे डोळे चमकले. इथे एखादा खेळ सादर करून लोकांच्या टाळ्या मिळविता येतील अशा अपेक्षेने रिकाम्या एकखांबी तंबूतूनच त्यांनी या भरलेल्या तंबूकडे नजरा लावल्या. आता नव्या तंबूत नवा झेंडा खांद्यावर घेऊन काही जण ‘मन’शक्तीचे नवे प्रयोग करण्यास उत्सुक असले, तरी अगोदरच खचाखच भरलेल्या त्या तंबूत जाऊन बसलेल्या अनेकांच्या मनात धाकधूक सुरू झाली आहे. जुन्या, एकखांबी तंबूतील उरल्यासुरल्या जागेला मोकळेपणा आला असला, तरी नव्या तंबूतील गर्दी आता अनावर होणार, अशी भीतीही काही जुन्यांना वाटू लागली. ..हे चित्र केवळ एका वास्तवाचे आहे. ते कोणत्याही चौकटीत घट्ट बसविता येऊ शकते. राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतून बाहेर पडून भाजपवासी झालेले तीन माजी आमदार आणि त्यांच्या अनुयायांच्या भाजपच्या प्रदेश कार्यालयात पार पडलेल्या स्वागत सोहळ्याच्या ताज्या चित्राशी हे चित्र तंतोतंत मिळतेजुळते आहे. प्रवीण दरेकर, वसंत गीते आणि रमेश पाटील या तिघा माजी मनसे आमदारांना भाजपमध्ये प्रवेश मिळाला. त्यांनी कोणतीही अपेक्षा व्यक्त केलेली नाही, असे भाजपच्या प्रदेशाध्यक्षांनी ठणकावून सांगितले, तेव्हा या तिघांचा आपल्या चेहऱ्यावरील भाव लपविण्याचा प्रयत्न मात्र लपून राहिला नसेल. एकेकाळी भाजपच्या प्रत्येक नेत्याच्या वक्तव्यात राष्ट्रवाद, भारतमाता, भय-भूक-भ्रष्टाचारमुक्ती असे शब्द तरी पेरलेले असत. आता एक कोटी सदस्य संख्येवर प्रदेश भाजपचा ‘ध्येयवाद’ स्थिरावला आहे. परवाच्या असंतुष्ट मनसैनिकांच्या पक्षप्रवेशातून सदस्य नोंदणी ध्येयपूर्तीचे नवे स्वप्न भाजपच्या काही नेत्यांना सुखावू लागले असले, तरी आता आपले काय होणार या चिंतेने तंबूत अगोदरपासून स्थिरावलेल्यांना अस्वस्थ वाटू लागले आहे. या तंबूखाली आलेल्या साऱ्यांना सावली देण्यासाठी आता नवे टेकूही शोधावे लागतील. एकीकडे एक तंबू टेकूअभावी डळमळीत झाला आहे, तर दुसरीकडे दुसऱ्या तंबूला भार असह्य़ झाला आहे. यातून सावरण्याची कसरत हाच या दोन्ही तंबूतील आगामी खेळ असणार असे दिसत आहे. कोणता खेळ अधिक प्रेक्षणीय ठरतो, ते पाहायला प्रेक्षक उत्सुक आहेत.